Next
‘समाजमनाची वैचारिक स्वच्छता हे गाडगेबाबांचे स्वप्न’
राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात प्रा. तेज निवळीकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 03:25 PM
15 0 0
Share this story

डावीकडून प्रकाश जवळकर, प्रकाश रोकडे, प्रा. वसंत सपकाळ, प्रा. तेज निवळीकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अशोककुमार पगारिया, बबनराव भेगडे व डॉ. अशोक शिंदे.

पुणे : ‘संत गाडगेबाबा हे कृतीशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार परखड असले, तरी त्यांना फारसा विरोध झाला नाही. कारण त्यांच्या विचारात आणि आचारात एकवाक्यता होती. आपल्या भोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबरच समाजमनाची स्वच्छता व्हावी, हे गाडगेबाबांचे स्वप्न होते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते आणि गाडगेबाबांचे अभ्यासक प्रा. तेज निवळीकर यांनी केले.

भोसरी येथील प्रीतम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. साहित्यातून सामाजिक सुधारणेचा विचार पुढे नेण्यासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. ललिता सबनीस, मुख्य संयोजक डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे, प्रीतम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, बंधुता प्रतिष्ठानचे प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, व्याख्याते प्रा. निवळीकर यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’, तर पीपल्स बॅंकेचे चेअरमन बबनराव भेगडे यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’ डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या वेळी बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, ‘संविधानाचा विचार सगळीकडे पोहोचविण्यासाठी बंधुता हे मूल्य अतिशय आवश्यक आहे. आर्थिक श्रीमंतीपेक्षाही वैचारिक श्रीमंती अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे बंधुतेचे हे तत्वज्ञान श्रीमंतांपर्यंत पोहोचवायला हवे. आज समाजात अशांतता असण्याचे कारण हे बंधुतेचा अभाव आहे. स्वातंत्र्य, समता यासह बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांनाही आपण प्राधान्य दिले पाहिजे. माणसांच्या मनातील भेद जाळण्यासाठी बंधुता मनात रुजायला हवी.’

रोकडे म्हणाले, ‘बंधुतेचा विचार घेऊन गेली २० वर्षे समाजात जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेतून राष्ट्रीय बंधुता संमेलने घेतली जात आहेत. रा. ग. जाधव यांच्यापासून डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यापर्यंत अनेक मान्यवर साहित्यिकांनी या संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ही परंपरा यापुढेही अशीच चालू राहील.’

या वेळी २१व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया यांची निवड करण्यात आली. बबनराव भेगडे, डॉ. अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब जवळकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link