Next
रत्नागिरी नगर परिषदेच्या दामले विद्यालयाला इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा
असा मान मिळविणारी रत्नागिरी जिल्ह्यातील मराठी माध्यमाची पहिली शाळा
BOI
Monday, March 11, 2019 | 12:21 PM
15 1 0
Share this article:रत्नागिरी :
वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा असा नावलौकिक असलेल्या रत्नागिरीतील दामले विद्यालयाला (नगर परिषद शाळा क्रमांक १५) इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा मिळाला आहे. या विद्यालयाला येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतररराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (एमआयईबी) अस्थायी संलग्नता प्राप्त होणार आहे. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळवून इंटरनॅशनल स्कूलचा मान मिळविणारी ही मराठी माध्यमाची जिल्ह्यातील पहिली शाळा बनली आहे. शाळेच्या शताब्दी वर्षात हा बहुमान प्राप्त झाल्याने अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

मुलांना इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळेत घालण्याकडे पालकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १३ ओजस शाळांची निवड करण्यात आली आहे. तसेच १०० तेजस शाळांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. यानुसार निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व निकषांची पूर्तता केल्याने दामले विद्यालयाला तेजस शाळेचा बहुमान प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीद्वारे नुकत्याच झालेल्या पहिल्या टप्प्याच्या निवड प्रक्रियेत दामले विद्यालयाला अस्थायी संलग्नता देण्यात आल्याचे पत्र नुकतेच देण्यात आले. यानुसार पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शाळेत पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या वर्गांना हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम तयार होईपर्यंत पाचवीच्या पुढील वर्गांना महाराष्ट्र शासनाचाच अभ्यासक्रम सुरू राहणार आहे. टप्प्याटप्प्याने या शाळेत दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यंदा शाळा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्यात तेजस शाळा म्हणून मान्यता मिळाल्यामुळे दामले विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एका यशाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यालयाने आतापर्यंत आपली गुणवत्ता कायम राखली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेचे २००हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ही शाळा कायम अग्रेसर असते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असूनही, तज्ज्ञ आणि मेहनती शिक्षकांमुळे शाळेने नाव कमावले आहे.

मुख्याध्यापक प्रकाश जाधव म्हणाले, ‘रत्नागिरी नगर परिषदेचे दामले विद्यालयाला सातत्याने लाभणारे सहकार्य, कायमच शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा पालकवर्ग, मेहनती आणि सृजनशील शिक्षकवृंद आणि गुणी विद्यार्थी यांचा सुंदर मिलाफ झाल्यानेच शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची अस्थायी मान्यता मिळाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकता येणार आहे.’ 

शाळेची गुणवत्ता टिकविण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

(दामले विद्यालयाच्या एक विलक्षण दिवस या उपक्रमाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal. Gramopadhye About 163 Days ago
Will this enterprise receive regular , yearly , update ?
0
0

Select Language
Share Link
 
Search