Next
‘जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, July 31, 2019 | 01:04 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : ‘राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे, दिलेले काम कुठल्याही परिस्थितीत करायचे हे त्यांचे तत्त्व आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डोंबिवली येथे जगन्नाथ पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार संजय केळकर, किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, बालाजी किणीकर, जगन्नाथ पाटील यांच्या पत्नी पुष्पा पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘पाटील यांनी आपली प्रत्येक जबाबदारी निष्ठने पार पाडली आहे. नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचे त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांच्या मुलीने लिहिलेले ‘कळसाचा पाया’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी पारदर्शी काम केले. उत्पादन शुल्कमंत्री असताना त्यांनी एमआरपी प्रणाली आणली. चांगले वक्तृत्व असल्यामुळे ते सभागृहात प्रत्येक विषयावर बोलायचे त्यातून आम्हालाही शिकायला मिळाले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिल्यामुळे ते आजपर्यंतचा हा प्रवास करू शकले.’


पालकमंत्री शिंदे म्हणाले, ‘पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक विचारधारा घेऊन काम केले. त्यांच्या कार्याचा अनुभव आम्हाला नेहमीच कामात उपयोगी पडतो. अविरतपणे त्यांनी ठाणे जिल्ह्यात काम केले आहे.’

रायगडचे पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘जगन्नाथ पाटील हा विचार महाराष्ट्राने पाहिला आहे. कुठलाही कार्यक्रम यशस्वी कसा करावा हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत. ठाणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.’ 

जगनाथ पाटील म्हणाले, ‘हा सत्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आयुष्यात मी अनेक चढउतार पाहिले. मी १९६१ साली माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा मी जसा होतो तसा आजही आहे.’  

जगन्नाथ पाटील यांची कन्या डॉ. जया पाटील यांनी लिहिलेले ‘कळसाचा पाया’ हे पुस्तक व ‘आगरी दर्पण’ या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. जगन्नाथ पाटील यांच्यातर्फे समर्थ भारत व्यासपीठ, परिवर्तन महिला संस्था आणि हिंदू सेवा संघ या संस्थांना मदतीचा धनादेशही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर कुलकर्णी यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search