Next
‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’
BOI
Sunday, August 12, 2018 | 12:45 PM
15 1 0
Share this article:

शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे, की जी कधी क्षणात श्रीमंती देते, तर कधी तितक्याच वेगाने देशोधडीलाही लावू शकते. शेअर बाजाराच्या या ‘किमये’बद्दलचे काही गमतीशीर आणि काही धडे देणारे स्वानुभव सांगत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
............
सन १९८४ ते १९९४ अशी दहा वर्षे मी पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात, आधी शिक्षण आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने कार्यरत होतो. राहायलाही कॉलेजच्या परिसरातच होतो. मोठा आनंदाचा काळ होता तो. तिथल्या एका विभागात (ड्रॉइंग, ड्राफ्टमन्स, फोटोग्राफी) कुलकर्णी नावाचे एक कलाकार होते. काम करता करता ते सदैव बँकेची ‘भरणापत्रे’ भरत असायचे. कंपन्यांचे डिव्हिडंड्स, व्याज इत्यादींचे चेक्स! आपल्या सहकाऱ्यांना ते नेहमी सांगायचे, की ‘शेअर्समध्ये पैसे गुंतवा. खूप फायदेशीर आहे;’ मात्र फारसे कोणी त्या ‘नादा’ला लागले नाहीत. हे कुलकर्णीसुद्धा तिथे ‘कँपस’वरच राहायचे. पुढे शेअर्समधील उत्पन्नावर त्यांनी सहकारनगरमध्ये बंगला बांधला.

जगातील सगळे ज्ञान आपल्याला असावे आणि नाना प्रकारचे उद्योग (धंदे) आपण करून बघावेत, अशी तीव्र ‘लालसा’ असल्यामुळे मी १५-२० जणांना एकत्र करून  (१९९३मध्ये) शेअर्सची खरेदी-विक्री सुरू केली. अर्थात छोट्या प्रमाणात. दरमहा आम्ही १०० रुपये जमा करायचो. नव्याने भांडवल उभारणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये विचारपूर्वक (!) पैसे गुंतवत होतो. ‘रिलायन्स’चा १० रुपयांचा शेअर १० रुपयांनाच लोकांना मिळाला होता. स्टेट बँक, कोलगेट, एल अँड टी, टाटा स्टील, हिंदुस्तान लिव्हर अशा अनेक आघाडीच्या कंपन्या होत्या. काहींचा उदय आणि उत्कर्ष नंतरच्या काळात झाला. बोनस शेअर्समुळे कित्येक जण लक्षाधीश (आता कोट्यधीश) होत होते. ‘यूटीआय’चे मास्टर प्लस, मास्टरगेन वगैरे फंड त्याच काळात आले. साहजिकच त्या विषयाचा अभ्यास सुरू झाला. त्याची परिणती म्हणजे, नोकरी सोडून आपण सब-ब्रोकर व्हावे, या विचाराने ‘घर’ केले. लगेच त्या दिशेने पावले वळली. सदाशिव पेठेत भाड्याने जागा घेतली आणि काम सुरू केले. कॉलेजतर्फे निरोप समारंभ झाला. संचालकांनी (तेही गुंतवणूक करत असत) प्रेमाने शुभेच्छा दिल्या. ‘उद्या श्रीमंत झालात तरी आमची ओळख ठेवा,’ असे मित्रांनी आवर्जून सांगितले. ‘श्रीमंत’ झालो नाही तरी त्या मित्रांनी माझ्याशी आजही ओळख ठेवलेली आहे बरे!

‘पुणे स्टॉक एक्स्चेंजच्या’ दोन-तीन ब्रोकर्समार्फत मी शेअर्सची खरेदी-विक्री सुरू केली. लक्ष्मी रोडवरील एका प्रसिद्ध दलालाने (पूर्वीच) असा सल्ला दिला होता की, ‘तुम्ही व्यवसाय म्हणून काम करणार असाल, तर स्वत:साठी कधीही खरेदी-विक्री करू नका. मोह होतो, पण तो टाळा!’ मित्रपरिवार मोठा असल्याने व्यवहार होत होते. ज्ञान हेच आपले भांडवल! बाकी आर्थिक बाजू म्हणजे स्वत:चे भांडवल जेमतेमच होते. एखादा शेअर वाढू लागला, की तो कितीपर्यंत जाईल किंवा नेमका कितीपर्यंत घसरेल हे कोणीही सांगू शकत नाही, भलेभले अनुभवी दलालसुद्धा! ‘वरच्या’ पातळीवरून, ठरवून भाव वर-खाली केले जातात, हे ऐकून होतो. कोणत्या बातमीमुळे बाजार चढेल किंवा कोसळेल, हेसुद्धा गौडबंगालच होते. पंतप्रधानांना सर्दी झाली, उत्तर कोरियाने अणुस्फोट घडवला, मंगळावर अमेरिकेचे यान जाऊन पोहोचले किंवा जागतिक तापमानात वाढ, परदेशी बाजारांची स्थिती इत्यादी घटनांमुळे दर वर-खाली होत होते - आणि इकडे आमची छाती! बंगला बांधण्याचे स्वप्न नव्हते, परंतु त्या व्यवसायाची एक धुंदी होती.

आघाडीच्या दलालांची कामगिरी कळत होतीच. पुण्यातील एक जण असा होता की, एकाच वेळी पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली स्टॉक एक्स्चेंजमधून व्यवहार करायचा. त्या त्या ठिकाणी समजा एखाद्या शेअरच्या दरात चार-पाच रुपयांचा फरक असेल, तर कमी दराच्या ठिकाणी १००० शेअर्स खरेदी करून दुसरीकडे १००० विकायचा. त्याची स्वत:ची स्थिती चांगली असल्यामुळे प्रत्यक्ष शेअर्सही त्याच्याजवळ असत. त्या वेळी ‘ऑनलाइन’ व्यवहार सुरू झाले नव्हते. व्यवहार पूर्ततेच्या वेळी दर शेअरच्या खरेदी-विक्रीतील फरकानुसार ‘डिलिव्हरी’ द्यावी लागे किंवा घ्यावी लागे. जे काही देणे-घेणे असेल, तितकी रक्कम भरणे किंवा दलालाकडून चेकने घेणे, अशी पद्धत होती, तुम्हाला समजा एखाद्या कंपनीच्या ५०० शेअर्सची ‘डिलिव्हरी’ द्यायची असेल आणि तुमच्याकडे ती नसेल, तर बाजारातून चढ्या दराने विकत घेऊन व्यवहार पूर्ण करावा लागे. केवळ उदाहरणादाखल या गोष्टी सांगत आहे.

१९९५ साल आठवा. मुंबईचा हर्षद मेहता ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ करत होता. अचानक मंदीची वावटळ आली. रुपये १०० किंमत असलेला शेअर १०-२० रुपयांवर आला. त्या वेळी बँकेकडून शेअर्सवर (एकूण किमतीच्या ७०-७५ टक्के) कर्ज मिळत असे. बाजार गडगडल्यामुळे कित्येक बँका संकटात सापडल्या. काही बुडाल्यासुद्धा. संपूर्ण भारतात हजारो दलाल-उपदलाल जीवनातून उठले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. वर उल्लेख केलेला, एका वेळी अनेक शेअर बाजारांत व्यवहार करणारा दलाल रातोरात गायब झाला. त्याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. त्याच्या हाताखाली/मार्फत व्यवहार करणारे उपदलाल लाखो रुपयांना बुडाले. मी फारच छोटा ‘उद्योजक’ असल्याने त्या ‘भाग्यवंतां’च्या यादीत नव्हतो; परंतु थोडाफार फटका बसायचा तो बसलाच.

व्यवसाय लगेच बंद झाला असे नाही. त्या वेळी मी मुंबईतील एका मोठ्या दलालामार्फत व्यवहार सुरू केले होते. रोज फोनवरून सकाळी ‘ऑर्डर’ द्यायची आणि झालेल्या व्यवहारांची माहिती संध्याकाळी घ्यायची. पोस्टाने/कुरियरने स्टेटमेंट नंतर येत असे. (तो दलाल पुढे काही काळ तुरुंगात गेला.) आणि ‘मोह’ व्हायचा तो झालाच! स्वत:साठी खरेदी-विक्री सुरू केली. त्या काळी २५०-३०० कंपन्यांचे शेअर्स नावावर असत. पुढे त्यातले बरेचसे विकावे लागले आणि फारच थोडे शिल्लक राहिले. खरोखर, फक्त ग्राहकांसाठी व्यवहार केले असते, तर हक्काचे दीड-दोन टक्के मिळत राहिले असते. शिवाय चांगल्या कंपन्यांच्या ‘फिक्स्ड डिपॉझिट’वर बऱ्यापैकी कमिशन मिळत असे. लोकांचा विश्वास होता. तिकडे हर्षद मेहताला अटक झाली. त्याचे स्थावर-जंगम जप्त होऊन, बँकांमधील खाती गोठवली गेली. पुढे तुरुंगातच असताना तो वारला. माझा लेखन-प्रकाशन व्यवसाय (मंदीत का होईना)चालू होता.      

मुंबई बाजाराचा (BSE) ‘सेन्सेक्स’ (Sensitive Index) आणि राष्ट्रीय बाजाराचा (NSE) ‘निफ्टी’ (National Fifty) असे निर्देशांक त्या वेळी सुरू होते. १९९४-९५मधील तेजीच्या काळात सेन्सेक्स चार हजारपर्यंत गेला आणि मंदी आल्यावर हजार-बाराशे अंकांनी घसरला. ‘सेन्सेक्स’ आघाडीच्या ३० कंपन्यांच्या दरांवर आधारलेला आहे, तर ‘निफ्टी’ ५० कंपन्यांच्या कामगिरीवर. आजचा सेन्सेक्स ३७,४०० (आधार वर्ष १९८६ = १००) आणि निफ्टी ११,३८० (आधार वर्ष १९९५ = १०००) आहे. माझ्या मते, या निर्देशांकांची आता पुनर्रचना केली पाहिजे. (३७,००० आणि ११,००० ला खरोखर काय अर्थ आहे!) बाजाराची स्थिती समजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिकडे लक्ष ठेवायचे असते; पण रोजच्या व्यवहारांमध्ये त्याला फार महत्त्व नसते. मी व्यवसाय सुरू केला, तेव्हा ‘एक्स्चेंज’मध्ये दलालांचे तोंडी व्यवहार होत. त्याची नोंद केली जाई आणि संध्याकाळी त्यांच्या ‘काँट्रॅक्ट नोट्स’ बनत. समजा, दिवसभरात एखाद्या शेअरचा ५० रुपये ते ६० रुपये असा चढ-उतार झाला. आपल्याला शेअर्स विकायचे आहेत. दलालाने ते ५५ रुपयांप्रमाणे विकले, तरी आपल्याला ५० किंवा ५२ रुपयांनी विकले असे तो सांगू शकत होता. तीच गोष्ट खरेदीची. ५५ रुपयांना घेतले, पण आपल्याला ५८ किंवा ६० रुपये सांगितले. म्हणजे सगळे व्यवहार विश्वाषसावरच चालत. आता संगणकावरून सर्व व्यवहार होत असल्यामुळे फसवणुकीची संधी नाही.

शेअर बाजाराचे अधिकृत सदस्य (मुख्य दलाल) असतात. ही सदस्यता सहजी उपलब्ध होत नाही. मी काम करत असताना, मुंबई शेअर बाजाराचे सदस्य होण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त ‘डिपॉझिट’ ठेवावे लागत असे. पुण्याला तीच रक्कम अंदाजे १० लाखांपर्यंत होती. एखाद्या सदस्याला आपले ‘पद’ सोडायचे असेल, तर संबंधित स्टॉक मार्केटच्या संमतीने तसे करता येते. १९९५मध्ये पुणे स्टॉक एक्स्चेंजने नवीन सदस्य घेण्यासाठी जाहिरात दिली. त्यासाठी स्पर्धा परीक्षेसारखी लेखी परीक्षा होती. ‘डिपॉझिट’ची रक्कम २१ लाख रुपये ठरविण्यात आली होती. ते २१ लाख कुठून येणार, हे मला ठाऊक नव्हते; परंतु परीक्षेची मला काळजी नव्हती. आवश्यक पुस्तकांचा अभ्यास करून उत्तीर्ण होणे अवघड नव्हते. मी अर्जासह कागदपत्रांची पूर्तता केली. एका मित्राकडून ‘डिपॉझिट’साठी रकमेचे आश्वा सन मिळाले. ठरलेल्या दिवशी परीक्षा दिली. माझी निवडही झाली. काही कारणांनी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. मीही त्यासाठी फार खटपट केली नाही आणि त्या ‘मोहा’तून मी सुटलो (असे आता म्हणतो). 

मराठी माणूस कर्जाला फार भितो. आपली मानसिकताच तशी आहे. कर्जामुळे आपली झोप उडते (आणि निष्कर्जी असले की शांत झोप लागते, अशी एक समजूत). या परिस्थितीत हल्ली खूप बदल झालेला आहे. लग्नाच्या बाजारात ‘मी दोनदा दिवाळे काढले,’ ही उपवराची जमेची बाजू काही समाजात मानली जाते. मराठी माणूस कर्जबाजारी झाला की, जणू त्याने एखादा खून केला असावा किंवा (निदान) एखाद्या महिलेशी गैरवर्तन केले असावे, अशा दृष्टीने लोक त्याच्याकडे बघतात. तुम्हाला नवीन घर घ्यायचे असेल किंवा तुम्ही आजारी पडलात तर लोक कितीही पैसे देतात; परंतु व्यवसायासाठी भांडवल उभारणे कठीण जाते. हे सगळे लिहिण्याचे प्रयोजन म्हणजे, शेअर व्यवसायाच्या काळात मी तसे अनुभव घेतले. कर्जाची चिंता ही सर्जनशीलतेला मारक ठरते. त्यातून बाहेर पडण्यासाठी कित्येक वर्षे वाया जातात. उमेदीचा काळ निघून जातो.

एक उदाहरण बघा. व्यवसाय चालू असताना आपण अनेक गोष्टी करत असतो. त्याचे यश-अपयश, चांगले-वाईट हे नंतर ठरत असते. एकदा मी एका मित्राकडून काही शेअर्स ‘उसने’ घेतले. दरमहा त्यासाठी व्याज द्यायचे ठरले. अर्थात, त्या वेळच्या बँकेच्या दरापेक्षा ते बरेच अधिक होते. व्याज नियमित देणे जमले नाही. समजा, त्या शेअरचे त्या वेळचे बाजारमूल्य १०० रुपये होते. शेअर्स होते २००. म्हणजे एकूण २० हजार रुपये झाले. पुढे मी उद्योग बंद केला. देणे तसेच राहिले. दोन वर्षांनी त्या कंपनीने एकास एक शेअर बोनस म्हणून दिला. आता २००चे ४०० शेअर्स झाले. किंमत थोडी खाली (७५ रुपये) आली. तरी ३० हजार रुपये झाले. व्याज वेगळेच. दरम्यान तो शेअर ४० रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजे १६ हजार रुपयांत ४०० शेअर्स घेता आले असते; पण ते शक्य झाले नाही. पुन्हा एकदा एकास एक बोनस जाहीर झाला. म्हणजे ८०० शेअर्स! सांगण्याचा मुद्दा हा, की वेळेवर व्यवहार पूर्ण केले किंवा लोकांनी अडचण लक्षात घेऊन (थोडा धोका पत्करून) मदत केली असती, तर त्यातून बाहेर पडता आले असते. काहींनी मदत केलीही. लोकांच्या चांगुलपणामुळे, मनाच्या मोठेपणामुळे कुठल्याही प्रकारचे फार मोठे ‘संकट’ आले नाही, हे सुदैव! असो.

शेअर्समध्ये पैसे मिळतात. त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी काय, तर... १) स्वत:चे भरपूर भांडवल (सध्या कोटीच्या घरात) हवे. २) अत्यंत सावधगिरीने, त्रयस्थपणे विचार करून व्यवसाय केला पाहिजे. ३) मर्यादित धोका पत्करायला हरकत नाही. परंतु त्यात नुकसान झाल्यास व्यवहाराची पूर्तता करता आली पाहिजे. ४) हिशेब आणि कागदपत्रे चोख, वेळच्या वेळी तयार पाहिजेत. ५) हा व्यवसाय पूर्ण वेळाचा आहे. सहज जाता जाता करण्यासारखा नाही. ६) शक्यतो स्वत:साठी खरेदी-विक्री करू नये. ७) गरज पडल्यास जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. इत्यादी इत्यादी.

हे माझे अनुभव आहेत. परंतु ते प्रातिनिधिक आहेत. त्या उद्योगाला आता २० वर्षे उलटून गेली. अजूनही त्याची ‘धग’ बाकी आहे. जे व्यवहार अपूर्ण राहिलेले आहेत, त्यांची पूर्तता करायचीच अशी प्रामाणिक इच्छा आहे. ‘सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर!’ तोच त्यात यश देईल, ही ‘साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!’

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search