Next
संतूरने गाजविला चौथा दिवस
BOI
Sunday, December 17, 2017 | 11:26 AM
15 0 0
Share this article:

अभय रुस्तुम सोपोरी
पुणे : यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील चौथा दिवस (१६ डिसेंबर) रसिकांसाठी पर्वणी ठरला. मधुर गायन, सुरेल वादन आणि त्यानंतर ग्रेसफुल नृत्य, अशा तीन भिन्न कलाकृतींचा आस्वाद त्यांना लागोपाठ घेता आला. या तीन कलांचा मिलाफ व सोबत रात्री १२ वाजेपर्यंत महोत्सव सुरू ठेवण्याच्या परवानगीची प्रशासनाने दिलेली भेट असा हा दुग्धशर्करा योग्य होता. रसिकांना दिवसभरात एकूण सहा कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेता आला; मात्र नऊ तास कधी निघून गेले हे कोणाच्या लक्षातही आले नाही. 

या दिवशी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली, तरी संतूरवादनाने खऱ्या अर्थाने दिवस गाजविला असे म्हणता येईल. प्रसिद्ध काश्मिरी संतूरवादक पं. भजन सोपोरी यांचे सुपुत्र अभय सोपोरी यांनी रसिकांवर स्वरांची अक्षरशः बरसात केली. त्यांनी छेडलेल्या तारा, त्यांचा वादनाचा वेग आणि एकूणच त्यातून निर्माण होणारा नाद हा सर्वांनाच भुरळ पाडेल असाच होता. त्यांना पखवाजवर साथसंगत करणाऱ्या ऋषीशंकर उपाध्याय या तरुण कलाकारानेदेखील आपल्या कलेचा अप्रतिम नमुना ‘सवाई’च्या स्वरमंचावर पेश करत श्रोत्यांना थक्क करून सोडले. शेवटच्या टप्प्यात तबला, पखवाज व संतूर यांच्या जुगलबंदीने श्रोत्यांना भारावून टाकले. राग भीममधील रचना सादर करून त्यांनी वादनाला सुरुवात केली. याच रागात त्यांनी द्रुत तालातील रचना सादर करून उपस्थितांना थक्क केले. वडील पं. भजन सोपोरी यांनी रचलेली काश्मिरी रचना सादर करून सोपोरी त्यांनी आपल्या सादरीकरणास विराम दिला. इतक्या जबरदस्त सादरीकरणांनातर त्यांना टाळ्यांच्या कडकडाटासह ‘स्टँडिंग ओव्हेशन’ही मिळाले. 

तुषार दत्तादिवसाची सुरुवात किराणा घराण्याचे गायक तुषार दत्ता यांच्या गायनाने झाली. गौडसारंग रागातील ‘गोरी तोरे नेन’ ही बंदिश सादर करून त्यांनी गायनास प्रारंभ केला. त्यानंतर शिवरंजनी रागातील ‘बिन देखे तो छनन आये रे’ ही बंदिश त्यांनी सादर केली. ‘दिल की चोटों ने कहीं चैन से रहने ना दिया,’ हा दादरा सादर करून त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. ‘मन भाया रे सावरिया’ या भजनाने मैफलीला भक्तिमय टप्प्यावर नेऊन त्यांनी शेवट केला. दत्ता यांना प्रशांत पांडव (तबला) व अविनाश दिघे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. 

संतूरवादनानंतर पंडित उपेंद्र भट यांनी स्वरमंच ताब्यात घेतला. त्यांनी दुर्गा रागाने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. त्यानंतर ‘अवघा आनंदी आनंद’ हा अभंग गात त्यांनी दाद मिळविली. मनोज भांडवलकर (पखवाज), विवेक भालेराव (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी), दिलशाद खां (सारंगी) यांनी पंडित उपेंद्र भट यांना साथसंगत केली. 

प्राची शहा
उत्तरार्धात आरती अंकलीकर-टिकेकर यांनी रसिकांना स्वरानंद दिला. राग रागेश्रीतील ‘सुमिरन करत राम’  या बंदिशीने अंकलीकर यांनी गायनाची सुरुवात केली. लडिवाळपणे आलापी आणि ताना घेत त्यांनी रागाचा विस्तार केला. याच रागात त्यांनी तराणा आणि तिल्लाना हे संगीतप्रकार सादर केले. लालगुडी जयरामन यांनी हिंदीत रचलेला ‘म्हारो मुकुंद मुरारी’ हा टप्पा सादर करून त्यांनी मैफलीचा शेवट केला. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ या अभंगाने त्यांनी सुरेल शेवट केला. सुयोग कुंडलकर (संवादिनी), विभव खंडोळकर(तबला), पखवाज (सुजित लोहोर), माऊली टाकळकर (टाळ) यांनी त्यांना साथसंगत केली.

त्यानंतर प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री प्राची शहा यांच्या नृत्याने रसिकांची वाहवा मिळवली. त्यांनी आपल्या नृत्यातून त्रितालातील विलंबित थाट, फर्माईशी चक्रधरमध्ये पैर की उठान, अंक की उठान, तिहाई, चक्रधर परन, द्रुत तोडा, पंचमुखी तत्कार असे विविध प्रकार सादर करून जयपूर घराण्याची कथक शैली उलगडली. त्यांनी सादर केलेल्या ‘काहे गए घनश्याम’ या अभिनय पक्षातील ठुमरीने टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळवली. त्यांना गुरू गणेश हिरालालजी (पढंत व हार्मोनियम), श्रबोणी चौधरी (गायन), किशोर पांडे (तबला), मृणाल उपाध्याय (पखावज), संदीप मिश्रा (सारंगी) आणि सिबटे हसन खाँसाहेब (सतार) यांनी साथसंगत केली.  

पद्मा तळवलकरदिवसाचा शेवट ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांनी केला. त्यांनी भूप राग आळवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ऋग्वेद देशपांडे (तबला), श्रीराम हसबनीस ( हार्मोनियम), ओंकार दळवी (पखवाज) व रसिक गरुड, अंकिता दामले, श्रुती आठवले (तानपुरा) यांनी त्यांना साथ केली.

(चौथ्या दिवसाच्या सादरीकरणाची झलक दर्शविणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search