Next
आता ‘हिरकण्या’ चालवणार एसटी बस; १५० जणींची निवड
वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर होणार रुजू
BOI
Saturday, August 03, 2019 | 06:20 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : दुचाकीपासून चारचाकीपर्यंत आणि रेल्वेपासून विमानापर्यंतच्या कोणत्याही वाहनाचे... इतकेच कशाला तर अगदी चांद्रयानाच्या मोहिमेचे सारथ्यही महिला लीलया करू शकतात, हे आपण पाहिले आहे. असे असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस चालवण्याची संधी मात्र अजूनपर्यंत महिलांना मिळाली नव्हती. आता ती मिळणार असून, राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने चालक-वाहक म्हणून १५० महिलांची भरती केली आहे. वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर त्या कामावर रुजू होणार आहेत. 

निवड झालेल्या या महिलांचे एका वर्षाचे प्रशिक्षण ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाले आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होणार आहेत. सध्या एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सुरू असून, यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. 

पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी होती; मात्र ही अट शिथिल करून महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एका वर्षाचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यानुसार महिलांनी अर्ज केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी १५० महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांना अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एका वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील. आतापर्यंत एसटीच्या काही बसचे नावच हिरकणी असे होते; पण आता प्रत्यक्ष हिरकण्याच एसटी बस चालवणार आहेत.

बेस्ट बसची चालक म्हणून निवड झालेली प्रतीक्षा दासया महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावर एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महामंडळामार्फत आदिवासी युवतींसाठी ‘वाहन चालक प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. यातून आतापर्यंत २१ आदिवासी युवतींना एसटी महामंडळामार्फत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

‘बेस्ट’मध्येही महिला चालक
दरम्यान, मुंबईतील बेस्ट बस सेवेतही आता महिला चालक दिसणार आहेत. प्रतीक्षा दास ही २४ वर्षीय युवती बेस्ट बस चालवणारी पहिली महिला ठरली आहे. लहानपणापासून गाड्यांची आवड असलेल्या प्रतीक्षाची काही महिन्यांपूर्वीच ‘बेस्ट’मध्ये निवड झाली असून, सध्या तिचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर ती प्रत्यक्ष सेवेत रुजू होणार आहे. 

महिला चालकांसाठी अबोली रंगाच्या रिक्षा
परिवहन विभागामार्फत रिक्षा आणि टॅक्सीसाठी देण्यात येणारे परवाने मुक्त करण्यात आले आणि मागील पाच वर्षांत सुमारे दोन लाख ४० हजार परवाने देण्यात आले. हे परवाने देताना महिलांचाही विचार करण्यात आला. महिला रिक्षाचालकांना ‘अबोली’ रंगाच्या रिक्षा देण्यात येतात. आतापर्यंत एक हजार १०८ रिक्षा महिला चालकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे आदी शहरांमध्ये महिला चालक या रिक्षा चालविताना दिसत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search