Next
स्वरदा ढेकणे अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Tuesday, July 31, 2018 | 02:06 PM
15 0 0
Share this story

‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. रेखा राजू, शिक्षणतज्ज्ञ अर्चना नेगिनहाल, डॉ. स्वाती दैठणकर, डॉ. पप्पू वेणुगोपाल, स्वरदा ढेकणे, पराग पिंपळे आणि वर्षा पिंपळे.

पुणे : विविध रचनाकारांनी रचलेल्या काही वैविध्यपूर्ण जावळींचा अर्थ, विवेचन आणि पार्श्वभूमी मराठी भाषेतून समजून घेण्यासाठी नृत्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध विद्वान आणि साहित्यिक डॉ. पप्पू वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आणि संकलन असलेले ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले.

पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड येथे हा कार्यक्रम झाला. लेखिका आणि ब्लॉगर स्वरदा ढेकणे हिने अनुवादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला सुप्रसिद्ध विद्वान आणि साहित्यिक डॉ. पप्पू वेणुगोपाल राव, ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना व गुरु डॉ. स्वाती दैठणकर, शिक्षणतज्ज्ञ अर्चना नेगिनहाल, सुप्रसिद्ध मोहिनीअट्टम् नृत्यांगना व गुरु डॉ. रेखा राजू, प्रकाशक असलेल्या बुकमार्क पब्लिकेशन्सचे पराग पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात स्वरदा ढेकणे यांनी समर्पण या भरतनाट्यम् नृत्याद्वारे जावळींचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रार्थना सदावर्ते आणि श्रावणी सेन यांनी केले.  

या वेळी बोलताना डॉ. पप्पू वेणुगोपाल राव म्हणाले, ‘नाट्यशास्त्र असो किंवा तशाच संस्कृत ग्रंथांचा अर्थ सर्वसामान्य कलाकारापर्यंत पोहचत नाही. तसेच, अशा ग्रंथांचे चांगले अनुवाद नसल्यामुळे सर्वसामान्य कलाकारापर्यंत जावळीसारखे नृत्यप्रकार पोहचविण्यासाठी हे पुस्तक मराठी भाषेत लिहिणे आवश्यक होते.’

‘प्रादेशिक भाषांमध्ये चांगल्या पुस्तकांचा अनुवाद होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वरदा ढेकणे यांना मी माझ्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यास परवानगी दिली. जे प्रत्यक्षात नाहीत, ते भावना़ंचे रस प्रेक्षकांना अनुभवयाला लावणे म्हणजे अभिनय; परंतु संपूर्ण नाट्यशास्त्रात नृत्य हा शब्द नसून, त्यासाठी त्यांनी वेगळी रचना केली आहे,’ असे डॉ. राव यांनी सांगितले.

डॉ. दैठणकर म्हणाल्या, ‘ज्याप्रमाणे स्वाती नक्षत्रातील पावसामुळे शिंपल्यामध्ये मोती तयार होतात; तसेच गुरूंनी ज्ञानाचा पाऊस पाडून स्वरदामध्ये नृत्याचा आणि ज्ञानाचा मोती तयार केला आहे. तामिळनाडूपासून महाराष्ट्रापर्यंत या नृत्याची भाषा पोहचविण्यासाठी अनुवादाचा सेतू हा स्वरदाने बांधला आहे. बालपणापासून स्वरदाने माझ्याबरोबर क्लासमध्ये येऊन नृत्याचे धडे घेतले. ज्याप्रमाणे अभिनय शिकवून येत नाही, तो भाव हृदयातूनच यावा लागतो; तसेच जावळीचे देखील आहे. पुण्यामध्ये मी अनेक वर्षे राहत असून पदम, तिल्लाना किंवा वर्णम याचेच सादरीकरण बहुतेक नर्तक करतात; परंतु जावळी ही पुण्यामध्ये क्वचितच पाहायला मिळाली. कारण जावळीची भाषा वेगळी असल्यामुळे मातृभाषेत करता आल्यास ते नृत्यकलाकारांच्या दृष्टिने सोपे होणार आहे. म्हणूनच नृत्यकलाकारांसाठी स्वरदा ढेकणे यांनी केलेला अनुवाद संदर्भ ग्रंथ ठरणार आहे.’

या पुस्तकाच्या अनुवादाच्या कल्पनेबाबत सांगताना स्वरदा म्हणाल्या, ‘परिमल फडके या गुरूंकडून शिकताना मला या अनुवादाचे महत्त्व खर्‍या अर्थाने समजले. अभिनयाची रचना, रंगमंचावरील सादरीकरण, नृत्यदिग्दर्शन हे सर्व करताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये ‘फ्रॅगरन्स ऑफ पदम्स’ व ‘बंच ऑफ जावळीज’ ही दोन पुस्तके माझ्या वाचनात आली; परंतु जावळीची भाषा, उच्चार आणि अर्थ कलाकारांना माहित नसते, हे त्यावेळी माझ्या लक्षात आले. अशी पुस्तके मराठीत असणे आवश्यक आहे हे ध्यानात घेऊन मी प्रथमच ब्लॉगवर मराठीत जावळीचे वर्णन देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. यातूनच मी डॉ. पप्पू वेणूगोपाल राव यांच्या ‘बंच ऑफ जावळीज’ या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यासाठी परवानगी मागितली. जावळीतील रचना नायक, नायिकांवर आधारित असतात; परंतु त्यासाठीच्या व्याख्या, भाषा या नाट्यशास्त्रानुसार असाव्यात. हे पुस्तक संपूर्ण अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण झाले पाहिजे याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यामुळे पुस्तकात मी फूटनोट व अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देखील दिले आहे. या पुस्तकामध्ये पट्टावीर रामय्या यांच्या पहिल्या १५ जावळी असून, त्यामध्ये नृत्यदिग्दर्शनावर आधारित माहिती मिळणार आहे. त्यामधून आपल्या संपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते.’ नृत्यशास्त्रावरील अशी आणखीही पुस्तके अनुवाद करण्याची माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.  

डॉ. रेखा राजू म्हणाल्या, ‘जावळी म्हणजे दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक रचनाप्रकारांपैकी एक. दक्षिणी भाषेतून त्या काळातील संस्कृती, समाज व दैनंदिन जीवनाचे दर्शन घडविणारी व शृंगार रसाची अनुभूती देणारी ही रचना. १९ व्या शतकात दक्षिणेकडील अनेक राजांनी व कवींनी असंख्य जावळी रचना लिहिल्या ज्या संगीत व नृत्याद्वारे आज आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत.’

या वेळी शिक्षणतज्ज्ञ अर्चना नेगिनहाल, बुकमार्क पब्लिकेशन्सचे पराग पिंपळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link