Next
कभी किसी को मुकम्मल...
BOI
Sunday, March 25, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

अभिनेत्री नंदा यांचा आज (२५ मार्च) स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या, त्यांच्यावर चित्रित झालेल्या आणि जणू काही त्यांचीच भावना व्यक्त करणारे वाटावे अशा गीताचा... कभी किसी को मुकम्मल...
...........
आज २५ मार्च. एक महिन्यापूर्वीच्या २५ तारखेलाही रविवारच होता आणि रविवारची सकाळ उदास बनवणारी बातमी कानावर आदळली होती, ती म्हणजे श्रीदेवी यांच्या निधनाची. ती बातमी ऐकताच पटकन आठवली मधुबाला, मीनाकुमारी आणि अभिनेत्री नंदाही! या काही अभिनेत्रींच्या जीवनात काही कमतरता होती. कशाची? कोणाची? आता श्रीदेवींच्या निधनाला महिना झाला, तरी त्यांच्या मृत्यूबद्दल तर्कवितर्क चालूच आहेत! एकटेपण माणसाला खायला उठते! गाडी, बंगला, पैसा, नावलौकिक या सगळ्यांपेक्षा माणसाला हवे असते प्रेम, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा! या काही अभिनेत्रींच्या जीवनात नेमकी कशाची कमतरता होती, या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळेल असे वाटत नाही.

यांच्यापैकी अभिनेत्री नंदाचा आज (२५ मार्च) स्मृतिदिन! मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते मा. विनायक यांची तृतीय कन्या म्हणजे नंदा! ती सहा-सात वर्षांची असताना तिला ‘मंदिर’ या चित्रपटात काम करायला लागले होते. सिनेमात काम करण्याची तिची इच्छा नव्हती; पण नाईलाजाने हे पहिले व शेवटचे काम म्हणून तिने ते काम केले.

माणूस ठरवतो एक व घडते दुसरेच! या ‘मंदिर’ चित्रपटानंतर थोड्याच दिवसांत मा. विनायकांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्यावर प्रचंड कर्ज होते. नंदाचे, तिच्या बहिणींचे व आईचे वैभवाचे दिवस संपले. घरखर्च चालवण्यासाठी आपल्याला चित्रपटात काम करणे आवश्यक आहे, हे समजदार नंदाने ओळखले. ‘पंढरीचा पाटील’, ‘कृष्ण-सुदामा’, ‘जग्गू’, ‘अंगारे’ अशा चित्रपटात बेबी नंदा दिसून आली. छोट्या छोट्या भूमिका करणारी नंदा अल्प कालावधीत ‘शेवग्याच्या शेंगा’ चित्रपटाची नायिका झाली. चित्रपट चालला. ती १३-१४ वर्षांची असताना व्ही. शांताराम यांनी तिला हिंदी चित्रपटाची नायिका बनवले. तो चित्रपट होता ‘तूफान और दिया’!

तिच्या अभिनयसामर्थ्याने तिला नंतर आग्रा रोड, काला बाजार, भाभी, कानून, बडी बहन अशा चित्रपटांत भूमिका मिळत गेल्या. परंतु तिचे अडनिडे वय आणि निरागस चेहरा यामुळे तिला बहिणीच्याच भूमिकेसाठी निवडले जात होते. ‘काला बाजार’ हिट झाला; पण त्यानंतर अन्य चित्रपटांत बहिणीच्या रोलसाठी मागणी येताच तिने त्या मागण्या नाकारल्या. कारण तिला साचेबंद भूमिकेतून बाहेर पडायचे होते. राज कपूरच्या ‘आशिक’ चित्रपटात तिने त्याच्या पत्नीचा रोल केला. तिचा त्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. मीनाकुमारीनंतर एक सोबर चेहऱ्याची, भावनाप्रधान भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून नंदाकडे पाहिले जाऊ लागले. नंतर ‘हम दोनों’मध्ये देव आनंदने तिला घेतले; पण त्यानंतर तिने ‘साइड रोल’ न करण्याचा निर्णय घेतला. 

नर्तकी, उसने कहा था, आज और कल, कानून अशा काही चित्रपटांत तिला नायिकेच्या भूमिका मिळाल्या व नंदाने त्या समरसून केल्याही. परंतु ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी ठरले नाहीत. बदलत्या चित्रपटसृष्टीप्रमाणे नंदाने हळूहळू स्वतःच्यातही बदल केले व ‘मेहंदी लगे मेरे हाथ’ या चित्रपटात तिने कॉलेज तरुणीची भूमिका केली. या चित्रपटात शशी कपूर तिचा नायक होता. तो चित्रपट हिट झाला. त्यामुळे शशी कपूर व नंदा ही यशस्वी जोडी समजून निर्मात्यांनी ‘जब जब फूल खिले’, ‘मोहब्बत इसको कहते है’, ‘नींद हमारी ख्वाब तुम्हारे’, ‘जुआरी’, ‘राजासाब’, ‘रूठा ना करो’ असे एकेक चित्रपट काढले आणि त्यातील गीतेही मधुर होती.

अशा अनेक चित्रपटांच्या नादात नंदाचे लग्न बाजूला राहिले. तिला कोणी भावले नाही? तिला कोणी मागणी घातली नाही? हे प्रश्न प्रश्नच राहिले व नंदा एकटीच राहिली! प्रौढावस्थेत ती निर्माता दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याबरोबर विवाह करणार होती, असे कानावर आले होते; पण ते घडण्याआधीच काळाने मनमोहन देसाईंना नेले. एकाकी नंदाने प्रौढावस्थेत काही निवडक भूमिका केल्या! ‘शोर’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘मजदूर’, ‘प्रेमरोग’ हे ते चित्रपट होते. ‘भाभी’ आणि ‘आँचल’ या चित्रपटांसाठी तिला फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला.

काम मिळवण्यासाठी तिने कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. नावलौकिक, पैसा, यश, प्रसिद्धी हे सर्व काही तिने स्वतःच्या हिमतीवर मिळवले; पण प्रेम? नंदाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेगळा चेहरा असावा, असे वाटते; पण तो जगापुढे कधीच आला नाही. तिचे दुःख तिच्याबरोबरच संपले. तिने त्याचा उच्चारही केला नाही. तिच्या जीवनाच्या या बाजूचा विचार करता ‘आहिस्ता आहिस्ता’ चित्रपटातील निदा फाजली यांचे गीत तिच्या भावना व्यक्त करणारेच आहे, असे वाटते. काय म्हणतो कवी त्या काव्यात?

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता 

एक परिपूर्ण असे यश अथवा जग कधीच कुणाला मिळत नाही. (अर्थात काही अधुरेपण त्यात असतेच.) कोठे जमीन तर कोठे आकाश मिळत नाही. (अर्थात सर्व काही मिळत नाही.)

जिसे भी देखिये वो अपने आप में गुम है
ज़ुबाँ मिली है मगर हमज़ुबा नहीं मिलता

ज्याला पाहावे तो जो तो आपापल्या विश्वात गुंग आहे. (आम्हाला) जीभ/वाणी मिळाली आहे; पण (ज्याच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलावेत, जो आपल्याशी सहमत असेल असा) मित्र मिळत नाही (हे आमचे दुर्दैव).

बुझा सका है भला कौन वक़्त के शोले
ये ऐसी आग है जिसमें धुआँ नहीं मिलता

काळाने पेटवलेल्या ज्वाळा कोण विझवू शकतो (अर्थात प्रारब्धातील दुःख कोण चुकवू शकतो?) (एकाकीपणाची, माझ्या दुःखाची) ही एक अशी आग आहे, की जिचा धूर दिसत नाही (पण चटका बसतो.)

तेरे जहाँ में ऐसा नहीं की प्यार न हो
जहाँ उम्मीद हो इस की वहाँ नहीं मिलता

(हे परमेश्वरा) तुझ्या या दुनियेत प्रेम नाही असे नाही रे; पण (आम्ही) ज्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून ते मिळत नाही ना! (काय म्हणावे या प्रारब्धाला?)

एक अत्यंत अर्थपूर्ण, आशयसंपन्न अशी ही गझल आहे. गझल काही शेर एकत्र येऊन बनते. प्रत्येक शेर दोन ओळींचा असतो. आणि गझलेचा प्रत्येक शेर हे एक स्वतंत्र काव्यही असते. या सर्व दृष्टीने ही गझल परिपूर्ण आहे. संगीतकार खय्याम यांनी त्यासाठी दिलेली चाल व संगीत नियोजन अत्यंत साजेसे आहे. ही गझल आशा भोसलेभूपेंद्र यांनी स्वतंत्रपणे गायली आहे. दोघांचेही स्वर कवीच्या शब्दांना न्याय देतात. चित्रपटात ज्या पार्श्वभूमीवर हे गीत येते, तो प्रसंगही त्यामुळे मनाला भिडतो. गीत ‘सुनहरे’ असण्याचे सारे निकष हे गीत पूर्ण करते. आणि त्याचबरोबर मीनाकुमारी, नंदा, मधुबाला, श्रीदेवी यांसारख्या अभिनेत्रींचे दुःखही समर्थपणे मांडते.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link