Next
‘‘व्हर्च्युअल’ गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान’
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्ता’मध्ये सायबर सुरक्षेवर राष्ट्रीय परिषद
BOI
Friday, September 13, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेवेळी (डावीकडून) शैलेश कासंडे, जयराम पायगुडे, डॉ. संजय चोरडिया, संभाजी कदम, संदीप गादिया व  अॅड. राजस पिंगळे.

पुणे : ‘फक्त इंटरनेट आणि कॉम्प्युटरची गरज असल्यामुळे सध्या ‘फिजिकल’ गुन्हेगारीपेक्षा ‘व्हर्च्युअल’ गुन्हेगारी वाढत आहे. आपले प्रोफाइल हॅक होऊ नये, यासाठी आपल्याला येणारे फसवे मेल आणि मेसेजवर करडी नजर ठेवावी. ऑनलाइन शॉपिंगवेळी आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती चोरली जाऊ शकते. याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येकाने इंटरनेट आणि सोशल साइट्स वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे मत सायबर सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

‘राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सायबर सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय झाला आहे. सायबर हल्ल्यांविषयी प्रगत राष्ट्रांनाही चिंता वाटत आहे. सीमा आणि शास्त्रांशिवाय असलेला हा लढा गंभीर आहे. इथे शत्रू ओळखण्यास वेळ लागतो. भविष्यात युद्ध झालेच, तर ते सायबर आणि स्पेसच्या माध्यमातून होईल. ‘सायबर वॉर’ची अनेक उदाहरणे आपण याआधीही पाहिली आहेत. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनीही निरनिराळे गॅजेट आणि संगणक प्रणालीचा काळजीपूर्वक वापर करायला हवा. त्याचे चांगले-वाईट उपयोग आहेत समजून घ्यावेत. एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या उपलब्धी असताना, हॅकर्सचेही आव्हान आपल्यासमोर आहे,’ असे प्रतिपादन एअरमार्शल भूषण गोखले यांनी केले.

सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेवेळी शैलेश कासंडे, भूषण गोखले, अॅड. प्रशांत माळी, दत्तात्रय शेकटकर, सुषमा चोरडिया व  डॉ. संजय चोरडिया.

‘सुर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या राष्ट्रीय परिषदेवेळी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, सायबर सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा, सायबर कायदेतज्ज्ञ अॅड. राजेश पिंगळे, सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी, संदीप गादिया, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, संचालक डॉ. शैलेश कासंडे, कॅप्टन शालिनी नायर, व्यवस्थापक सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. या वेळी संभाजी कदम, प्रशांत माळी, संदीप गादिया यांना ‘सूर्यदत्ता नॅशनल सायबर इंटेलिजन्स अॅवाॅर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

दत्तात्रय शेकटकर म्हणाले, ‘वाढती सायबर गुन्हेगारी आव्हानात्मक बनली आहे. विविध सोशल साइट्स, मोबाइल अॅप्समुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण त्याच्या आहारी जात असून, इंटरनेट बंद पडले की आपले सर्व काम थांबते, अशी स्थिती आहे. येत्या काळात मोबाइल फोन हे मानवापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. काही मुलांकडे दोन-तीन मोबाइल असल्याचे दिसते. हे चुकीचे असून, इंटरनेटचा गरजेपुरता वापर व्हावा. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करून अभ्यास-वाचन करण्यावर भर दिला पाहिजे.’

डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा म्हणाले, ‘भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ सायबर अभियान राबवणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीची सजगताच आपल्या सर्वाना सुरक्षित ठेवू शकते.’

प्रशांत माळी म्हणाले, ‘मोबिफिया नावाचा रोग सध्या जोमात आहे. सतत मोबाइल हातात असणे, त्याचा वापर करत राहणे, यामुळे हा रोग झाला आहे. 

संदीप गादीया म्हणाले, ‘मोबाइल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डिजिटल फूटप्रिंट उमटलेल्या असतात. नासासारख्या जागतिक संस्थानाही सायबरचा फटका बसला आहे. रशियाच्या हॅकरने त्यांच्या सॅटेलाइटची दिशा बदलली होती. त्यामुळे सायबर धोका किती मोठी आहे याची प्रचिती येते.’
 
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘लहानथोर सगळेच मोबाइल, इंटरनेटच्या आहारी गेल्याचे आपण पाहतो. त्यातून घडणाऱ्या घटना पाहिल्यावर मन विषण्ण होते. त्यामुळे प्रगत तंत्राचा वापर करताना नेमकी काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आणि समाजाला व्हावे, या उद्देशाने सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search