नागपूर : रायगड जिल्हयातील रखडलेल्या खनिजविकास निधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी आज (१३ जुलै) सभागृहात पहिली वहिली लक्षवेधी मांडली. जिल्ह्याच्या महसूलाच्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिला जातो. यावर्षीचा जिल्हा खनिजनिधी तयार करण्यात आला असून, हा विकासनिधी नागपूर येथे न देता जिल्हा स्तरावर व्यवस्थापकीय समितीकडे मंजूरी करता उपलब्ध करून देण्यात यावा, असे पत्र १७ एप्रिल २०१८ रोजी देण्यात आलेले आहे. याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने रायगड जिल्ह्यातील विकासकामे रखडली आहेत ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
‘जिल्ह्यातील खनिजनिधीच्या अंतर्गत किती निधीची मागणी महामंडळाकडे करण्यात आली आहे, तसेच उद्योगविभागाचे १७ एप्रिल २०१८ च्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य खनिजविकास निधीअंतर्गत मंजूर विकासनिधी कामांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे; परंतु अजूनही विकासकामांबद्दल कोणतीही कारवाई शासनामार्फत करण्यात आलेली नाही हे खरे आहे का, तसेच माणगाव तालुक्यातील खरवली, सुरव, मोरवा या रस्त्यासाठी मंजूर १८ लाख रूपयांचा निधी कधी उपलब्ध करून देण्यात येईल,’ असे प्रश्न अम्डत तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केले.
या लक्षवेधीवर उत्तर देताना उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांनी ‘दोन वर्षांचा निधी उपलब्ध करून देणार असून, याबाबत पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांच्या समस्या सोडवल्या जातील,’ असे आश्वासन दिले.