Next
तरुणाईच्या पुस्तक महोत्सवात रसिकांची मांदियाळी
आकाश गुळाणकर
Thursday, March 29, 2018 | 03:08 PM
15 0 0
Share this storyपुणे :
रसिकांची, वाचकांची रेलचेल असलेल्या पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये नुकताच ‘शट अप अँड रीड’ (Shut up and Read) हा पुस्तकांचा महोत्सव पार पडला. इंग्रजी पुस्तकांच्या या महोत्सवात पुस्तकांच्या विक्रीसोबतच, लेखकांच्या मुलाखती, वेगवेगळी चर्चासत्रे आदींचे आयोजन करण्यात आले होते. हँडिक्राफ्ट्स, बुकमार्क्स, पेंटिंग यांसारख्या अन्य स्टॉल्समुळेही महोत्सवाला वेगळीच रंगत आली. २४ व २५ मार्चला झालेल्या या महोत्सवात जुन्या प्रस्थापित लेखकांसोबतच नव्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले. पुणेकरांनीही महोत्सवाला मनापासून चांगला प्रतिसाद दिला.

चैतन्य गुब्बालाया महोत्सवाची कल्पना व त्याची सुरुवात याबाबत मुख्य आयोजक चैतन्य गुब्बाला याच्याशी संवाद साधल्यावर त्याने सगळा प्रवास सांगितला. साधारण २१-२२ वर्षांचा असलेला चैतन्य ‘एमआयटी’मध्ये इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. त्याच्या स्वतःच्या नावावर एक पुस्तक आहे. ‘१९८७ - दी इयर इट ऑल बिगॅन’ असे त्याच्या पुस्तकाचे नाव आहे. लेखन व वाचनाची स्वतःला असलेली आवड यातूनच त्याने आपला मित्र अरीश शेख याच्यासोबत ‘शट अप अँड रीड’ या स्टार्टअप कंपनीची सुरुवात केली. त्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष होते. 

चैतन्य गुब्बाला याचे पुस्तकमहोत्सवाबाबत बोलताना चैतन्य म्हणाला, ‘आम्ही दर महिन्याला ‘बुक क्लब मीट’ घेत असतो. त्यातूनच महोत्सवाची कल्पना पुढे आली आणि आम्ही मागील वर्षी सुरुवात केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा महोत्सव मोठा झाला. नवीन लेखकांना पुस्तके बाजारात आणण्यासाठी व ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळे अशा लेखकांना या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून देणे, हाही आमच्या फेस्टिव्हलचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. लोकांना पुस्तकांच्या जवळ आणणेदेखील मला महत्त्वाचे वाटते. पुस्तके आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारे मदत करत असतात.

कोणत्याही प्रायोजकांशिवाय चैतन्य व त्याच्या टीमने हा महोत्सव घडवून आणला, ही कौतुकाची गोष्ट होय. केवळ स्टॉल्सच्या माध्यमातून आलेले पैसे व कंपनीचे काही पैसे या जोरावर हा फेस्टिव्हल उभा राहिला. अमित रावत हे त्याचे या सर्व प्रक्रियेतील सल्लागार असल्याचे तो सांगायला विसरला नाही.

अश्विन सांघी यांच्यासारख्या प्रस्थापित लेखकांना फेस्टिव्हलला बोलावण्याच्या अनुभवाबाबत तो म्हणाला, ‘त्याबाबत सुरुवातीला शंका होती; पण ते लोक नंतर तयार झाले. अश्विन सांघीनेही आम्हाला सुरुवातीपासूनच सहकार्य केले. तो अतिशय नम्र असल्याचेही मला या निमित्ताने कळाले. त्याने आमच्या महोत्सवाच्या व्यासपीठावर त्याच्या एका नव्या पुस्तकाचेही अनावरण केले.’

फेस्टिव्हलमधील पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर आपल्या आवडीची पुस्तके घेण्याकरिता वाचकांनी चांगलीच गर्दी केली होती. ‘मला फेसबुकच्या माध्यमातून या फेस्टिव्हलबद्दल समजले. मी स्वतः खूप वर्षांपासून पुस्तके वाचते आणि पुस्तकांसोबत एक चांगली संध्याकाळ व्यतीत करणे केव्हाही चांगले,’ असा साधा सरळ विचार मनात ठेवून फेस्टिव्हलला उपस्थित राहिल्याचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असलेल्या स्नेहा रंजन यांनी सांगितले.

लेखक विक्रम विरुलकर (मध्यभागी) आणि नुझात खान (उजवीकडे)

फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले नवे लेखक :
विक्रम विरुलकर – 14000 and above
‘तरुणांच्या जवळचा विषय असलेले प्रेम आणि मैत्री यांबद्दलची ही कथा आहे. त्याचबरोबर देशभक्तीसारख्या भावनेचादेखील यात काही भाग आहे. ही कथा कोणत्याही एका जॉनरमध्ये बसणारी नाही, तर अनेक जॉनर्सचे मिश्रण आहे, असे मी म्हणेन. लडाख व हिमालयाच्या पार्श्वभूमीवर याची बरीचशी कथा घडते. ती वाचल्यावर ‘१४०००’चा नक्कीच उलगडा होईल,’ असे विक्रम म्हणाला. जून महिन्यात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही विक्रमने सांगितले.
 
नुझात खान – Bird in the open cage
या पुस्तकाची कथाही प्रेमाभोवती फिरते. यातील मुख्य पात्र असलेली सिम्रत ही एक किशोरवयीन मुलगी आहे. तिच्या मनात स्वतःबद्दल असलेला न्यूनगंड व त्यानंतर प्रेमात पडल्यावर तिच्या आयुष्याने घेतलेले अनपेक्षित वळण अशी ही कथा पुढे जाते. आर्मीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या नुझात खान पहिले पुस्तक प्रकाशित करण्याच्या ‘स्ट्रगल’बद्दल बोलताना म्हणाल्या, ‘शक्य तितक्या प्रकाशकांपुढे मी प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. जवळपास १२ महिने वेगवेगळ्या लोकांशी संपर्क केल्यानंतर मला एकदाचे प्रकाशक मिळाले आणि अखेरीस पुस्तक प्रकाशित झाले.’
 
यश काळे – The troll king
नुकताच दहावी पास झालेल्या यशने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी एक छोटेखानी कादंबरी लिहिण्याची किमया केली आहे. बालशिक्षण या वेगळ्या धाटणीच्या शाळेतून मागच्या वर्षी दहावी पास झालेल्या यशने शाळा संपताच आपल्यातील लेखकाची चुणूक दाखवून दिली. या पुस्तकाच्या लेखनप्रक्रियेबद्दल बोलताना यश म्हणाला, ‘या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात मी आठवीत असतानाच केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करत दहावी झाल्यावर पुस्तक लिहून झाले. घरात आई लेखिका असल्यामुळे लहानपणापासूनच माझा आणि पुस्तकांचा खूप जवळचा संपर्क होता. त्याचा खूप फायदा लिखाण करताना झाला.’ यशचे हे पुस्तक म्हणजे काल्पनिक कथा असून, त्याचे आणखी दोन भागदेखील प्रकाशित करण्याचा मानस असल्याचे त्याने बोलून दाखविले.

महोत्सवाला उपस्थित रसिक वाचक

काही उल्लेखनीय :
महोत्सवातील चित्रकला वर्कशॉपच्या स्टॉलनेदेखील चांगलीच गर्दी खेचून घेतल्याचे दिसत होते. दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास सात हजार जणांनी फेस्टिव्हलला हजेरी लावली. प्रसिद्ध लेखक अश्विन सांघी यांनी ‘कीपर्स ऑफ दी कालचक्र (Keepers of the Kalchakra) या त्यांच्या नव्या पुस्तकाचे अनावरण या महोत्सवात केले आणि अनेक चाहत्यांना त्याच्या पुस्तकांवर स्वाक्षऱ्याही दिल्या. या महोत्सवात अनेक दुर्मीळ पुस्तके १० ते १०० रुपये किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. या योजनेलाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

चित्रकला वर्कशॉप स्टॉलवर झालेली गर्दी
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link