Next
‘महानिर्वाण’च्या पुनरुज्जीवनाची पर्वणी
BOI
Saturday, February 24, 2018 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

महानिर्वाण नाटकातील एक क्षण

पुण्यातील मानाच्या थिएटर फेस्टिव्हलपैकी एक असलेल्या विनोद दोशी मेमोरियल थिएटर फेस्टिव्हलचे दहावे पर्व १९ ते २३ फेब्रुवारी २०१८दरम्यान पार पडले. पुण्यातील ‘नाटक कंपनी’तील कलाकारांसोबत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी या महोत्सवाच्या निमित्ताने ‘महानिर्वाण’ या नाटकाचे पुनरुज्जीवन केले. मुंबईतील तमाशा थिएटर व आरंभ प्रॉडक्शन्स यांनी आपली नाटके सादर केली. बेंगळुरूमधील जागृती थिएटर व नवी दिल्लीतील काटकथा पपेट आर्टस् या दोन ग्रुपनी अनोख्या धाटणीची नाटके सादर करून रसिकांची मने जिंकली. या महोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांचा आकाश गुळाणकर यांनी लिहिलेला हा वृत्तांत...

..............
मृत्यू... काय आहे मृत्यू? माणसाचा अक्षरशः थरकाप उडविण्याची ताकद असलेली एक गोष्ट; पण हाच मृत्यू त्या मृत व्यक्तीशिवाय त्याच्याशी संबंधित असलेल्या इतरांच्या आयुष्यावरदेखील तितकाच परिणाम करणारा असतो. शिवाय त्या मृत्यूभोवती असलेल्या अनेक चमत्कारिक वृत्ती, त्यांच्या वर्तनातील काही विशिष्ट गमतीजमती असं सगळंच विस्मयकारक असतं. याच गोष्टींवर ‘महानिर्वाण’ या सतीश आळेकर लिखित-दिग्दर्शित नाटकातून प्रकाश टाकण्यात आला. १९७४ साली लिहिलेल्या या नाटकातील आजही ताजे वाटणारे संदर्भ हेच त्या लिखाणाचे यश म्हणावे लागेल.

एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर ती ‘व्यक्ती’ राहत नाही, तर केवळ ‘बॉडी’ बनते. इथपासूनच त्या व्यक्तीच्या एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात होते. मग ती ‘बॉडी’ घेऊन जाण्यासाठीची ताटी बांधण्यापासून ते कवटी लवकर फुटण्यासाठी काय करावे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन ‘तज्ज्ञ’ मंडळी उपस्थित असतात. त्यांच्या दृष्टीने हे फार मोठे काम असते, शिवाय पुढच्या पिढीतील ‘तज्ज्ञ’ बनविण्याची तालीमही... (कारण अशी संधी नेहमी थोडीच येणार असते!) अशातच या सबंध प्रक्रियेदरम्यान झालेल्या गडबडींमधून आपण मार्ग कसा काढला, याचे किस्से बनविण्यास उत्सुक असलेल्या महाभागांचीही अंत्यविधीदरम्यान वेगळी धावपळ असते; पण हे सर्व असूनही प्रत्यक्षात जबाबदारी घेण्याचे काम पुढे आल्यानंतर हीच मिरविणारी मंडळी झटकन पळ काढतात, हे त्यातलं दुर्दैव! आपल्या मृत्यूनंतरचा हा सर्व प्रकार पाहण्याची (आणि आपल्याला सांगण्याची) संधी आळेकरांनी नाटकाचे सूत्रधार असलेल्या भाऊंना दिली आहे. ‘मी आता या जगात नाही, मी स्वतः एक मृत व्यक्ती आहे,’ असे सांगत भाऊ रसिकांशी संवाद साधण्यास सुरुवात करतात. एकंदरीत सुरुवातीपासूनच नाटकात एक प्रकारचा तिरकसपणा दिसून येतो. ‘ब्लॅक कॉमेडी’ प्रकारात मोडणारे हे नाटक ‘मृत्यू’वर चपखल भाष्य करते. ‘नाटक कंपनी’मधील नव्या कलाकारांसोबत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी १०व्या विनोद दोशी महोत्सवाच्या निमित्ताने या नाटकाचे अनेक वर्षांनंतर पुनरुज्जीवन केले. त्यामुळे आजच्या पिढीसोबतच मागच्या पिढितील रसिकांसाठीदेखील ही पर्वणी ठरली. कीर्तन किंवा आख्यानाच्या बाजातील वैशिष्ट्यपूर्ण मांडणी हे ‘महानिर्वाण’चे आणखी एक वैशिष्ट्य होय.

‘वर्डस् हॅव बीन अटर्ड’ नाटक सादर करताना कलाकारमहोत्सवातील दुसरा दिवस रसिकांकरिता एक वेगळ्या धाटणीचा परफॉर्मन्स घेऊन आला. ‘वर्डस् हॅव बीन अटर्ड’ हे सपन सारन व इरावती कर्णिक लिखित व सुनील शानबाग दिग्दर्शित नाटक दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आले. सादरीकरणापेक्षा वाचनावर जास्त आधारित असलेले हे नाटक डिस्सेंट (dissent) म्हणजेच मतभेदावर भाष्य करणारे होते. जगभरात अनेक देशांमध्ये, प्रांतांमध्ये, संस्कृतींमध्ये या ना त्या कारणाने नेहमीच बंड होत आलेली आहेत. काही वेळा हे बंड यशस्वी ठरले, तर काही वेळा ते मोडून काढण्यात आले. त्यामुळे कोणत्याच बंडाचे महत्त्व काही कमी होत नाही; पण त्यातून साधला जाणारा परिणाम व जनसामान्यांवर त्याचा पडलेला प्रभाव, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. अनेक देशांमधील, विशेषतः कलाकारांनी केलेल्या बंडांचे संपादित स्वरूपातील वाचन यात करण्यात आले. मुंबईतील तमाशा थिएटर या ग्रुपने याचे सादरीकरण केले. गॅलिलिओपासून ते गो. पु. देशपांडेंच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ नाटकातील प्रवेशापर्यंत अनेक प्रसंगांच्या माध्यमातून जवळपास चार शतकांमध्ये विविध ठिकाणी, निरनिराळ्या माध्यमातून झालेल्या बंडाचे प्रातिनिधिक चित्रण या सादरीकरणातून मांडण्यात आले.

‘बंदिश’ नाटकातील एक क्षणआजवर कलेच्या माध्यमातून कलाकार नेहमीच काही ना काही प्रयोग करत आलेले आहेत. त्यांना असलेला लोकाश्रय किंवा लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची क्षमता पाहता सामाजिक बदलांमध्ये किंवा चळवळींमध्ये त्यांचे एक वेगळ्या प्रकारचे योगदान राहिलेले आहे; पण अशा बंडखोर (?) कलाकारांना शासनाकडून कायमच दबावाची वागणूक मिळालेली आहे. भारताच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षे पूर्ण झालेली असताना, १९४७पासून ते आजवर अनेक कलाकारांच्या सादरीकरणांवर सरकारने बंदी घातली. त्यांना त्यांच्या कलेपासून व रसिकांना त्याच्या रसास्वादापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व बऱ्याचदा असुरक्षिततेच्या भावनेतूनच करण्यात आले आहे. आज सत्तर वर्षांनंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही. उलट फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाने यातील सर्वसामान्यांचा सहभाग वाढविला आहे व चिथावणी देण्यास एक व्यासपीठ निर्माण करून दिल्यासारखे झाले आहे. ‘पद्मावती’ सिनेमाच्या बाबतीत घडलेल्या घटना हे त्याचे सर्वांत जवळच्या काळातील उदाहरण म्हणावे लागेल. हाच मुद्दा ‘बंदिश २० ते २०००० हर्ट्‌झ’ या नाटकातून मांडण्यात आला.

स्वातंत्र्याची सत्तर वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. तिथे जुन्या पिढीतील दोन व नव्या पिढीतील दोन कलाकारांची ग्रीनरूममध्ये भेट होते. त्या वेळी कार्यक्रमात अनेक अडचणी येऊ लागतात. यूथ आयकॉन असलेल्या त्या तरुण कलाकारावर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू होते व त्याला परफॉर्म करणे केवळ अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत ते काय करतात, त्यांना रंगमंचावर जाता येते का, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे नाटक जरूर पाहायला हवे. त्यातील मुन्नू हे पात्र अनेक प्रश्नांवर खोचक भाष्य करून विशेष भाव खाऊन जाते. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन पूर्वा नरेश यांनी केले आहे, तर ‘आरंभ मुंबई प्रॉडक्शन्स एलएलपी’ या ग्रुपने ते सादर केले. ‘या नाटकाच्या संगीतासाठी व लिखाणामागील अभ्यासासाठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांनी केलेली मदतही मोलाची आहे,’ असे पूर्वा नरेश म्हणाल्या.

एकंदरीत कलाकार व कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करणारी नाटके पहिल्या तीन दिवसांत सादर झाली. कीर्तन-आख्यानासारख्या बाजापासून अभिवाचनासारखा प्रयोग आणि तांत्रिकदृष्ट्या जबरदस्त सादरीकरण अशा मोठ्या स्पेक्ट्रमची नाटके रसिकांना पहिल्या तीन दिवसांत पाहायला मिळाली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search