Next
‘युवा पिढीने नियमित व्यक्त होणे गरजेचे’
ब्लॉगलेखन कार्यशाळेत जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे मार्गदर्शन
प्रेस रिलीज
Monday, December 31, 2018 | 04:46 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मराठी साहित्याला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समृद्ध, सजस व अजरामर करण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यासाठी युवा पिढीने नियमितपणे विविध सामाजिक-राजकीय विषयांवर परखडपणे व्यक्त होणे गरजेचे आहे,’ असे मत जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मांडले.

येथील साहित्य सेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) यांच्या संयुक्त ब्लॉगलेखन कसे करावे याची माहिती मिळण्यासाठी पुण्यात नुकतीच ‘ब्लॉगलेखन कार्यशाळा’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून सर्व वयोगटांतील नागरिक सहभागी झाले होते.

जेष्ठ पत्रकार तोरसेकर म्हणाले, ‘ब्लॉग लिहिताना सुटसुटीत लिहिता येणे महत्त्वाचे आहे. आपले लेखन अलंकारिक भाषेत नसावे. समोरचा माणूस वाचताना वेळ देत असतो, म्हणून लिहिताना गंभीरपणा आवश्यक आहे. लिहिण्यात काही उदाहरणे, गोष्टी, दंतकथा यांचा उपयोग करावा. आपल्या ब्लॉगचे शीर्षक लक्षवेधी असावे.’

साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितीज पाटुकले म्हणाले, ‘साध्ये, सोपे लिहिणे हे यशस्वी लेखकाचे वैशिष्ट्य आहे. आजचा काळ वाचककाळ आहे. ब्लॉग हे व्यक्त होण्याचे एक आधुनिक, प्रतिभेच्या प्रवाहाला गती देणारे माध्यम आहे. यामुळे आता प्रत्येकाला सृजनशील निर्मिती शक्य झाली आहे. इथे लेखक आणि वाचक यांचा तात्काळ संवाद शक्य आहे. सध्या व्यवहारिक साक्षरता करणे गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती, जिच्यामध्ये द्वंद, अस्वस्थता असेल ती ब्लॉग लिहू शकते. काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर आपण ब्लॉग लिहू शकता.’

‘ब्लॉग लेखनातून आपण पुस्तके, किंडल कॉपी, ऑनलाइन जाहिराती, स्वतःच्या उत्पादनाची विक्री आदीद्वारे अर्थार्जन देखील करू शकतो. तुम्हाला लिहिण्याचा छंद आणि ज्ञान असेल, तर तुम्ही नक्की प्रयत्न करावा. कारण आपण सगळ्यांना संधी देतो, पण स्वतःला देत नाही, स्वतःची क्षमता ओळखत नाही. मराठी ब्लॉगलेखन म्हणजे स्वतः चुका करण्याचे आणि त्या दुरुस्त करण्याचेही हक्काचे व्यासपीठ आहे,’ असे प्रा. पाटुकले यांनी सांगितले.

इनमराठी डॉटकॉमचे संस्थापक ओंकार दाभाडकर म्हणाले, ‘सध्या सार्वत्रिक ओरड आहे वाचन कमी होत आहे; पण तसे अजिबात नाही. वाचनाची पद्धत बदलत आहे. वर्तमानपत्र, टीव्ही याऐवजी लोक सोशल मीडियाकडे वळली आहेत आणि हे प्रमाण अजून वाढणार आहे हे निश्चित. तुम्ही ब्लॉग लिहिताना त्यांचा फॉरमॅट ठरवा की कोणत्या स्वरूपाची माहिती त्यामध्ये असेल, त्याची नियमितता म्हणजे आठवड्यात किंवा दिवसाला किती वेळा ब्लॉग पोस्ट करणार, ब्लॉगचे मार्केटिंग सोशल मीडिया, ई-मेलवरून करू शकता. ब्लॉग मराठी असला, तरी त्यातील लेखाचे नाव टाइप करताना आठवणीने इंग्रजीमध्ये करावे म्हणजे तो युजर्सकडून लवकर शोधला जाऊ शकतो. इंग्रजी साहित्य, चित्रपट याची माहिती आपण मराठी ब्लॉगवर लिहू शकता.’

अनुभव सांगताना ब्लॉगलेखक व्यंकटेश कल्याणकर म्हणाले ‘ब्लॉग लिहिण्यापूर्वी ब्लॉगचा उद्देश, प्रकार ठरविणे, तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे, ब्लॉग सतत अपडेट ठेवण्याची तयारी, ब्लॉगची जाहिरात करण्याची तयारी आदी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तांत्रिक गोष्टींमध्ये ऑडिओ, आणि व्हिडिओ संकलन शिकणे गरजेचे आहे. ब्लॉग अपडेट ठेवण्यासाठी सातत्याने लेखन आणि लेखनामध्ये बहुमाध्यमांचा वापर करावा.’

ब्लॉगर म्हणून व्यावसायिकरित्या करिअर करण्यासाठी ब्लॉगलेखन कार्यशाळा ही अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत सहभागींनी व्यक्त केले. प्रा. अनिकेत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link