Next
थरथरणाऱ्या हातांनी रंगवला भारताचा नकाशा
पार्किन्सन्सच्या रुग्णांच्या सर्जनशीलतेचा आविष्कार
BOI
Saturday, August 03, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : पार्किन्सन्समुळे थरथरणारे त्यांचे हात मुक्तपणे रंगाविष्कार घडवत होते... आणि कॅनव्हासच्या छोट्या छोट्या चौकोनांवर साकारत होता भारताचा नकाशा.. ते पाहताना आनंदाने, आत्मविश्वासाने त्यांचे डोळे लकाकत होते...सुरकुतलेल्या चेहऱ्यांवर हास्य फुलत होते... हे दृश्य होते पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटीच्या (पीडीएमडीएस) आवारात रंगलेल्या ‘ऑल कॅन आर्ट’ या अनोख्या उपक्रमादरम्यानचे.


पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या फेव्हिक्रिल या कला आणि हस्तकला क्षेत्रातील आघाडीच्या ब्रॅंडतर्फे ‘ऑल कॅन आर्ट’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘फ्लुइड आर्ट’चा वापर करून विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी छोट्या छोट्या कॅनव्हासवर साकारलेल्या भारताच्या नकाशाचे वेगवेगळे भाग एकत्र जोडून सर्वांत मोठा नकाशा साकारण्याचा विक्रम नोंदवण्यात येणार आहे. लिम्का बुकमध्ये या विक्रमाची नोंद व्हावी, असे ध्येय फेव्हिक्रिलने ठेवले आहे. या उपक्रमाची सुरुवात ‘पीडीएमडीएस’मधील पार्किन्सन्सच्या रुग्णांपासून झाली. साठहून अधिक रुग्णांनी यात भाग घेतला. त्यांनी ‘फ्लुइड आर्ट’ तंत्राचा वापर करून कॅनव्हासवर रंग भरून आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले. 

या उपक्रमाचा दुसरा भाग शुक्रवारी, दोन ऑगस्ट रोजी मालाड येथील ‘एमकेईएस’ स्कूलमध्ये पार पडला. तीनशेहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. त्यानंतर शहरातील विविध कंपन्यांचे अधिकारी, संचालक या उपक्रमात सहभागी होणार असून, तेदेखील छोटे छोटे कॅनव्हासेस तयार करून देणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये हे सर्व कॅनव्हासेस एकत्र आणून भारताचा सर्वांत मोठा नकाशा साकारला जाणार आहे. 


‘फ्लुइड आर्ट’ तंत्रामध्ये कोणत्याही व्यावसायिक कौशल्याची आवश्यकता नसल्याने पार्किन्सन्सग्रस्त रुग्णांनाही कॅनव्हासवर चित्रकलेचे प्रयोग करणे सहज शक्य झाले. हालचालींवर बंधन आणि प्रशिक्षण नसल्याची खंत यामुळे आपल्यातील कलाकौशल्याला वाव देऊ न शकणाऱ्या या व्यक्तींनी या तंत्रांचा वापर करून कॅनव्हासवर रंग लावण्याचा आनंद लुटला. 

पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी (पीडीएमडीएस) ही स्वयंसेवी संस्था पार्किन्सन्स या आजाराने ग्रस्त असलेल्यांना समुदाय आधारित मदत केंद्रांमध्ये ‘मल्टिडिसिप्लीनरी थेरपी’ देते. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मारिया बरेटो म्हणाल्या, ‘पार्किन्सन्सग्रस्त लोकांना मुक्त शारीरिक हालचाली आणि समन्वय यांची अडचण भासत असते. त्यावर उपचार म्हणून या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो. पार्किन्सन्सग्रस्त रुग्णांच्या भावनिक आरोग्यासाठी आणि एकंदरीत कल्याणासाठी चित्रकला अतुलनीय योगदान देऊ शकते. त्यामुळे आमच्या रुग्णांना ‘ऑल कॅन आर्ट’ या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आमच्या पार्किन्सन्स साह्य गटाच्या सदस्यांनी या सत्राचा पुरेपूर आनंद लुटला. पूर्वी कधीही न अनुभवलेली कौशल्ये शोधण्याचा हा प्रयोग खरोखरीच अवर्णनीय होता.’ 

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू भांजा म्हणाले, ‘फ्लुइड आर्ट’ तंत्राचा वापर करून कौशल्य आणि परिपूर्णतेच्या कल्पनांच्या पलीकडे प्रत्येकाला कलेसाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. सर्वसाधारणपणे रंग व चित्रकला यांच्याविषयी तांत्रिक माहिती नसल्याने लोक कॅनव्हासवर आपली कल्पना मांडण्यास टाळाटाळ करतात; परंतु ‘फ्लुइड आर्ट’मुळे लोकांना मुक्तपणे पेंटिंग करण्याची आणि आपली सर्जनशीलता दाखवून देण्याची संधी मिळते. पार्किन्सन्ससारख्या आजारांमुळे शारीरिक समस्यांना सामोरे जाण्याचे आव्हान असूनही, या रुग्णांना त्यांच्यात लपलेल्या कलाकौशल्याला वाव देणे शक्य झाले.’ 

‘सर्जनशील मन असणारी कोणतीही व्यक्ती आता सहजपणे पेंटिंग करू शकेल व स्वतःमधील जादू दाखवू शकेल, हे आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून सांगायचे आहे. त्यासाठी औपचारिक प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. ‘फ्लुइड आर्ट’च्या मदतीने हौशी कलाकारदेखील सरावाने मोठ्या कलाकृती घडवू शकतील. ‘पीडीएमडीएस’मधील रुग्णांनी या कार्यशाळेचा अनुभव घेतल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे आणि अशा प्रकारच्या सहकार्याचीच आम्हाला अपेक्षा आहे,’ असेही ते म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search