Next
‘सुख, शांती, समाधान हीच खरी संपत्ती’
डॉ. विकास आबनावे यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, July 17, 2019 | 04:09 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘माणसाकडे साधन संपत्ती किती आहे, त्यापेक्षा त्याच्याकडे सुख, समाधान आणि शांती आहे का? हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपत्तीच्या मोहात न पडता सुख, समाधान आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या डोळ्यांना जे दिसते ते खरे असलेच असे नाही, त्यामुळे सर्वांनी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संस्थेच्या अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जडावबाई दुग्गड विद्यालय, महर्षी वाल्मिक विद्यालय, आबनावे कला महाविद्यालय, दुग्गड माध्यमिक विद्यालय आदी शाखांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. टिळक रस्त्यावरील अशोक महाविद्यालयातील सि. धो. आबनावे सभागृहात झालेल्या या समारंभावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुमन घोलप, उपाध्यक्षा पी. डी. आबनावे, सहसचिव प्रकाश आबनावे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. विकास आबनावे यांनी ‘सत्य, संभ्रम, भास, आभास आणि विरोधाभास, या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. विकास आबनावे म्हणाले, ‘भास आणि सत्य यातील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. समाजात दिसणाऱ्या इतर लोकांच्या मागे न लागता आपण स्वःत कसे आहोत, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतात;परंतु ज्याप्रमाणे वृक्षाची पानगळ होते, त्याप्रमाणे वाईट दिवस गळून जातील आणि वृक्षाला येणाऱ्या बहराप्रमाणे आयुष्यात चांगले दिवस येतील, हे तत्व लक्षात ठेवून जगण्याची उमेद आपण ठेवायला हवी. आपण सुंदर दिसावे, यासाठी भिंतीवरचा आरसा साफ करतो. मात्र, त्याचबरोबर आपण आपल्या मनाच्या आरशात स्वतःला पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते.’

सुमन घोलप म्हणाल्या, ‘शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, तर गुरु शिष्याला जगण्याची दिशा दाखवतो. त्यामुळे शिक्षक आणि गुरु यांच्यात असलेले छोटेसे अंतर आपण समजून घेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह घडविण्यावर भर दिला पाहिजे.’ 

पी. डी. आबनावे म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षकांनी आपले विचार, आचार याचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवायला हवा.’ 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभा आबनावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती हिरे यांनी केले. आभार शीतल आबनावे यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search