Next
पुण्यात घुमणार ‘स्वरझंकार’
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजन
BOI
Saturday, December 29, 2018 | 02:30 PM
15 0 0
Share this storyपुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व व्हायोलिन अकादमीतर्फे १० ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत कोथरूड येथील एमआयटीच्या मैदानावर स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७० वर्षांच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा लाभलेल्या व्हायोलिन अकादमीतर्फे आयोजित या महोत्सवाचे हे १० वे वर्ष आहे,’ अशी माहिती अकादमीचे पंडित अतुलकुमार उपाध्ये व ‘एमआयटी’चे राहुल कराड यांनी दिली.

‘एमआयटी’ आणि ‘व्हायोलिन’ यांच्या सहयोगाने होत असलेल्या या महोत्सवातून भविष्यात निश्चित शास्त्रीय संगीत भरीव कामगिरी होईल,’ असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वर्षी महोत्सवामध्ये उगवते तारे, आपल्या गायन, वादन शैलीने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले गुणी आघाडीचे गायक-वादक, बुजुर्ग वादक व अभिजात शास्त्रीय संगीतातील फ्युजन, तसेच ठुमरी, गजल या सर्वांचा सुरेख मिलाफ रसिकांना अनुभवालया मिळणार आहे. यामध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतात विशेष नाव केलेल्या कलकत्याच्या लोकप्रिय गायिका इंदाणी मुखर्जी, किराणा घराण्याचे लोकप्रिय युवा गायक जयतीर्थ मेऊंडी, इटावा घराण्याची परंपरा असलेले व नुकतेच कालवश झालेले उस्ताद इर्शाद खाँ यांचे चिरंजीव व शिष्य, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद निशाद खाँ, व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार, सिंथेसायझरवादक अभिजात पोहनकर यांचे शास्त्रीय फ्युजन, पतियाळा घराण्याच्या आघाडीच्या लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवती, रामपूर सह्स्वान घराण्याचे लोकप्रिय ज्येष्ठ गायक उस्ताद राशीद खान, जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान, तसेच गजल सम्राट पंडित हरिहरन यांच्या गजल गायनाचा आनंद गान रसिकांना अनुभवावयास मिळणार आहे.

कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार असून, एका दिवशी शक्यतो एक गायक व एक वादक असे नियोजन असल्याने कलाकारांचे गायन पूर्णत्वाने ऐकण्याचे समाधान मिळत असल्याने अल्पकाळात पुण्यातील रसिकांमधील हा महोत्सव लोकप्रिय झाला आहे. गेली नऊ वर्षे सलग रमणबाग प्रशालेमध्ये होणारा हा महोत्सव या वर्षी कोथरूड येथील ‘एमआयटी’च्या प्रशस्त मैदानात बंदिस्त मंडपामध्ये आयोजित केला आहे. सदाशिव, नारायण पेठ, टिळक रोड, औंध, पिंपरी-चिंचवड, वाकड, तसेच शहरातील विविध भागांतून या सर्व ठिकाणाहून येणाऱ्या रसिकांसाठी हे सोयीचे ठिकाण असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यंदाच्या दशकपूर्तीनिमित्याने अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘स्वरमैफली’च्या माध्यमातून शहरातील विविध भागात संगीत बैठकांमधून नवोदित तसेच ज्येष्ठ गायक, वादकांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, देशातील गायन, वादन क्षेत्रातील तरुण आश्वासक कलाकारांना ‘स्वरमणी’ सन्मानाने गौरविण्यात येणार आहे; तसेच त्यांचे कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहेत. काही ज्येष्ठ कलाकारांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करणार असून, ‘स्वरझंकार’प्रमाणेच लोकप्रिय झालेल्या ‘स्वरमल्हार’चे ही कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध भागांत आयोजित केले जाणार आहेत.

अकादमीतर्फे निर्मित शालेय मुलांसाठी लोकप्रिय झालेला सांगीतिक उपक्रम राबविण्यात येत असलेल्या १० विद्यालयांना सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाची मान्यता असलेल्या या उपक्रमातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी संगीताचे प्रशिक्षण व आनंद घेत आहेत. या सर्वांना मोफत प्रवेशिका दिल्या जातील. या वर्षात काही दिग्गज कलाकारांची सप्रयोग व्याख्याने, कार्यशाळांचे आयोजनही केले जाईल. रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ पुरस्कारही या वेळी प्रदान केले जातील.

‘लिजंड लाइव्ह इन कॉन्सर्ट’मध्ये आठ फेब्रुवारी २०१९ रोजी पंडित निलाद्रीकुमार यांचे सतारवादन व सोबत उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जादुई तबलावादनाचा आनंदही रसिकांना लुटता येईल. या वर्षी ‘व्हायोलिन’चा एक चेंबर ऑर्केस्ट्रा निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या वर्षीचा हा महोत्सव अकादमीचे हितचिंतक व महाराष्ट्राचे बहुआयामी व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘पुलं’ना, तसेच जागतिकस्तरावर योगाचा प्रसार करून पुण्याचे नाव जागतिक नकाशावर ठळकपणे उमटविणाऱ्या व अकादमीच्या यशस्वितेचा अविभाज्य घटक असलेल्या योगाचार्य बीकेएस अय्यंगार गुरुजी यांच्या जन्मशताब्दीपूर्तीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीस अर्पण केला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका १८ डिसेंबर २०१८ पासून ‘बुक माय शो’वर (Book my show) उपलब्ध आहेत. प्रवेशिकांचे मूल्य सीझन प्रीमिअर चेअरचे दोन हजार रुपये, चेअरचे एक हजार, मर्यादित चेअरचे ५०० रुपये असे असून, भारतीय बैठकीचे मूल्य २५० रुपये आहे.
                    
संपर्क क्रमांक : ९०११५ १०४५१ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link