Next
गदिमा, पुलं आणि बाबूजींच्या आठवणींनी रंगली दिवाळी पहाट
‘गदिमा’, ‘बाबूजी’, ‘पुलं’ना सांस्कृतिक गानवंदना
प्रेस रिलीज
Tuesday, November 06, 2018 | 12:22 PM
15 0 0
Share this storyपुणे : ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांच्या शब्दांची लय, पु. ल. देशपांडेंचा (पुलं) अजरामर विनोद आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या अवीट चाली यांच्या साथीने पुणेकरांनी सुरेल दिवाळी पहाट अनुभवली. निमित्त होते ते त्रिदल, पुण्यभूषण फाउंडेशन, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तिहाई’ या कार्यक्रमाचे.

महाराष्ट्राला मोहवणाऱ्या ‘गदिमा’, ‘बाबूजी’, ‘पुलं’ या त्रयीच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील बालगंधर्व रंगमंदिरात पुण्यभूषण दिवाळी पहाट कार्यक्रमादरम्यान आशय सांस्कृतिकतर्फे ‘तिहाई’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात ‘गदिमां’चे सुपुत्र आनंद माडगूळकर, ‘पुलं’चे भाचे दिनेश ठाकूर, ‘बाबूजीं’चे मानसपुत्र मानले जाणारे सूर्यकांत पाठक यांनी आभाळाइतक्या उंचीच्या व्यक्तिमत्त्वांच्या  ह्रदयस्पर्शी आठवणी सांगून तो मंतरलेला काळच जणू जागा केला. यानिमित्त शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या पाच संस्थांचा ‘पक्के पुणेकर सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात पुणे नगर वाचन मंडळ, डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, आर्य संगीत प्रसारक मंडळ (श्रीनिवास जोशी), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, अखिल मंडई मंडळ (अण्णा थोरात), डेक्कन कॉलेज या संस्थांचा समावेश होता.

या कार्यक्रमादरम्यान ‘गदिमा’, ‘पुलं’ आणि ‘बाबूजी’ या त्रयीच्या दुर्मिळ ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या; तसेच ‘बाबूजीं’च्या आवाजातील ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे गीत ऐकविण्यात आले.

संजीव मेहेंदळे, स्वरदा गोखले, मंजिरी जोशी यांनी गीते गायली. या वेळी ‘सांग तू माझा होशील का’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘त्या तिथे पलिकडे’, ‘विकत घेतला श्याम’, ‘का रे दुरावा’, ‘कौसल्येचा राम’, ‘एका तळ्यात होते’, ‘जाळीमंदी पिकली करवंद’ अशा अनेक सुरेल गीतांची बरसात रसिकांवर झाली. गीतरामायणातील ‘राम जन्मला’, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही गीतेही या वेळी सादर करण्यात आली. रमाकांत परांजपे, राजू जावळकर, काटे, माधवी करंदीकर, मंदार यांनी त्यांना साथसंगत केली. त्यानंतर नेहा मुथीयान यांच्या कथक पाठशालाच्या विद्यार्थिनींनी ‘ज्योती कलश छलके’, ‘इथेच टाकू तंबू’ या गीतावर नृत्य सादर केले.

डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. काका धर्मावत, मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी यांनी निवेदन केले. या वेळी कृष्णकुमार गोयल, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, लायन्स क्लबचे रमेश शहा उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link