Next
वाचता वाचताच ‘सँडविच’च्या मोहात पाडणारं पुस्तक!
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, March 27, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this article:

मराठी माणसाच्या स्वयंपाकघरात भारतातल्या इतर अनेक राज्यांतल्या पदार्थांनी शिरकाव केला असला, तरी ज्या ब्रिटिश पदार्थाने हक्काचं स्थान पटकावलंय तो पदार्थ म्हणजे ‘सँडविच’! पुण्याचे शेफ विराज आठवले यांनी त्यांच्या दीर्घ अनुभवातून ९८ ब्रुशेटा आणि १६३ प्रकारच्या सँडविचेसच्या पाककृतींचं ‘शेफ स्पेशल सँडविचेस’ हे देखणं पुस्तक सँडविच-प्रेमींसाठी आणलं आहे. त्या पुस्तकाचा परिचय...
.......
‘शेफ स्पेशल सँडविचेस’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतमध्ये डॉ. सुरुची पांडे यांनी ब्रेडचा इतिहास सांगताना, ख्रिस्तपूर्व २५४३ ते २४३५ दरम्यानच्या एका शिल्पाकृतीमध्ये एक व्यक्ती मेजाजवळ बसली असून मेजावर छान कापलेला ब्रेड ठेवला असल्याच्या शिल्पाचा उल्लेख केलाय. 

पूर्वी ‘ब्रेड अँड मीट’ किंवा ‘ब्रेड अँड चीज’ या नावांनी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थाला ‘सँडविच’ हे नाव कसं पडलं, त्याची कथाही मजेशीर! केंटमधल्या सँडविच परगाण्याच्या लॉर्ड सँडविच ऊर्फ लॉर्ड जॉन माँटेग्यू या उमरावाला पत्त्यांचे डाव खेळायचा विलक्षण शौक. इतका, की खाण्यासाठी ‘ब्रेक घेणं’सुद्धा त्याच्या जिवावर येई. एक दिवस त्याने आपल्या व्हॅलेला आज्ञा दिली, ‘जा, मला ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये मांसाचा काप घालून खायला आण’! म्हणजे स्वारीच्या पत्ते खेळण्यात बाधा नको, शिवाय त्या कोरड्या पदार्थामुळे हात न बरबटल्यामुळे पत्तेही खराब होणार नाहीत! त्याची ही युक्ती बरोबरच्यांना पसंत पडून त्यांनीही ऑर्डरी दिल्या, ‘सेम अॅज सँडविच!’ म्हणून!... आणि पुढे ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये काहीना काही घालून खाणे यालाच ‘सँडविच’ असं नाव रूढ झालं. सुरुवातीला अमीर-उमरावांकडे खाल्ला जाणारा हा पदार्थ, त्याच्या सुटसुटीतपणामुळे, खायला आणि न्यायला सोयीस्कर असल्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्गामध्ये आणि त्यांच्यामुळे सर्वदूर लोकप्रिय होत गेला.

कमीत कमी दोन ब्रेड्स वापरून बनणाऱ्या सँडविचचे शेफ आठवले यांनी, प्लेन, ग्रिल्ड, टोस्ट, डबल डेकर, ट्रिपल डेकर, रॅप्स अँड रोल्स, हॉट डॉग, बर्गर, ओपन फेस असे आठ-नऊ प्रकार सांगितले आहेत. पाककृतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांचं प्रमाण हे टी-स्पून बरोबरच ग्रॅम आणि मिलिलिटरमध्ये दिलंय हे पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य!

पुस्तकाच्या सुरुवातीला पाककृतीत वापरल्या जाणाऱ्या २३ विविध प्रकारच्या जिन्नसांची खूप रंगतदार माहिती आणि पाठोपाठ सिंगल ब्रेडच्या ब्रुशेटा (किंवा ब्रुस्केटा) या इटालियन पदार्थाचे तब्बल ९८ प्रकार (व्हेज/नॉन व्हेज) आपल्यासमोर येतात. 

पुढच्या प्रकरणांमधून ७६ व्हेज सँडविचेस आणि ७१ नॉनव्हेज सँडविचेसच्या पाककृती वाचताना आपण हरखून जातो.
 
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे शेफ आठवले यांनी वाचकांच्या मदतीसाठी काही काही पाककृतींच्या शेवटी खास तळटीपा दिल्या आहेत, त्या लक्षणीय अशाच आहेत! त्याव्यतिरिक्त काही खास पाककृतींच्या शेजारी ‘शेफ रेकमेंडेड रेसिपीज’ची खास खूण दिली आहे. त्याही वाचकांनी आवर्जून ट्राय कराव्यात अशाच!
अगदी शेवटी शेफ आठवले यांनी १६ देशांची खासियत असणाऱ्या स्पेशल सँडविचेसच्या पाककृती देऊन वाचकांना खूश केलं आहे. (आणि त्या त्या देशाचं वैशिष्ट्य असणाऱ्या सुप्रसिद्ध स्थळाचं छोटेखानी चित्र नावाशेजारी देऊन गंमत आणली आहे.)

पाककृतींच्या पुस्तकांच्या जगात निश्चितच वेगळा बाज घेऊन आलेलं ‘शेफ स्पेशल सँडविचेस’ हे शेफ विराज आठवले यांचं देखणं पुस्तक अवश्य स्वयंपाकघरात हाताशी ठेवावं असंच!

पुस्तक : शेफ स्पेशल सँडविचेस
लेखक : शेफ विराज आठवले 
प्रकाशक : मेनका प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०   
संपर्क : ९६०४० ९७९७९    
पृष्ठे : २०५  
मूल्य : २९९ ₹
 
(‘शेफ स्पेशल सँडविचेस’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search