Next
बोला, अनेक भाषा बोला!
BOI
Monday, May 07 | 06:45 AM
15 0 0
Share this story

एकापेक्षा जास्त भाषा बोलण्यात थेट आर्थिक फायदा होतो, असे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अलीकडच्या अहवालात सोदाहरण स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्वभाषेचा अभिमान बाळगतानाच अन्य भाषा अवगत करणे, याला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. मायभाषेच्या प्रेमापोटी जर आपण अन्य भाषांचा दुस्वास करत असू, तर आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणार आहोत. या अहवालाचा अन्वयार्थ सांगणारा विशेष लेख...
..............
भाषा आपल्या मेंदूला इंधन पुरवतात. आपल्या विचारांना आकार देतात आणि गुंतागुंतीचा संवाद शक्यतेच्या पातळीवर आणून ठेवतात. आपल्या भाषेतील शब्द, वाक्प्रयोग आणि खाचाखोचा यावरून मुख्यतः आपण जगाकडे कसे बघतो आणि जगाला कसे समजून घेतो हे ठरते. आपण जेव्हा केवळ एक भाषा बोलतो किंवा शिकतो, तेव्हा या प्रक्रियेला खूप मर्यादा असतात. एका भाषेपुरते मर्यादित होऊन राहणे हे कालबाह्य ठरत आहे. इंग्रजीसारख्या विश्वव्यापी किंवा फ्रेंच अथवा स्पॅनिश यांसारख्या प्रभावशाली भाषा बोलणाऱ्यांचाही हाच अनुभव आहे. 

...मात्र आज जेव्हा भौगोलिक सीमा अर्थहीन होत आहेत आणि संपर्क साधने जगड्व्याळ होत आहेत, जेव्हा ‘गुगल ट्रान्स्लेट’ तुम्हाला एका क्षणात ७०पेक्षा अधिक भाषांमध्ये मजकूर आणून देत असेल, तेव्हा अन्य भाषा शिकण्याची तोशीस कोण घेणार? आज कुठल्याही भाषेचा मजकूर कुठल्याही भाषेमध्ये बऱ्यापैकी अचूकतेने वाचता येऊ शकतो. लवकरच एका भाषेतून बोललेले आपल्याला स्वभाषेत ऐकण्याची सोय उपलब्ध होणार आहे. अशा वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा बोलणे हे कौशल्य किती गरजेचे आहे? त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे का, मुख्य म्हणजे आपल्याला अधिक वेतन (पैसे) मिळणार आहे का, आपले आयुष्य आणखी सुखकर होणार आहे का, हे प्रश्न फक्त आपल्यालाच नव्हे, तर अनेक तज्ज्ञांनाही पडले आहेत. अन् या विद्वानांनी एका सुरात या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले आहे. 

बालपणीच दोन किंवा अधिक भाषा शिकण्याने मेंदूतील वस्तू ओळखण्याची क्षमता, वेगवेगळी कामे करण्याची, अत्यंत व्यग्र वातावरणातही एकाग्र होण्याची, तसेच वस्तू वा गोष्टी लक्षात ठेवण्याची मेंदूची क्षमता वाढते, असे अनेक संशोधनांतून दिसून आले आहे. ज्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त भाषा येतात, ती समोरच्या वक्त्याचे बोलणे अधिक अचूकरीत्या समजून घेते, असेही संशोधनातून दिसून आले आहे. 

हे झाले भाषा शिकण्याचे सामाजिक फायदे. परंतु याच्या पलीकडे भाषा शिकण्याचे आरोग्याच्या दृष्टीनेही लाभ आहेत. शरीराच्या अन्य कोणत्याही अवयवांप्रमाणे मेंदूलाही व्यायामाची गरज असते आणि दोन किंवा जास्त भाषा शिकणे, हा मेंदूला व्यायाम घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये एकच भाषा बोलणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत अल्झायमर हा विकार सरासरी पाच वर्षे उशिरा होतो. अगदी निरक्षर असलेल्या व्यक्तींमध्येही हे निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे.

 अन् या सर्वांपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा बोलण्यात थेट आर्थिक फायदा होतो, असे सिद्ध झाले आहे. विश्व आर्थिक मंच (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) या जागतिक संस्थेने अलीकडेच या विषयावर एक लेख प्रकाशित केला आहे. यात स्वित्झर्लंड, ब्रिटन, कॅनडा आणि भारत या देशांमध्ये केलेल्या अनेक पाहण्यांचा हवाला देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये केवळ इंग्रजी भाषेचा आग्रह धरणे आणि अन्य भाषा शिकण्यासाठी गुंतवणूक न करणे यामुळे देशाला दर वर्षी ४८ अब्ज पाउंड एवढे नुकसान होते, असे एका पाहणीत आढळले आहे. ही रक्कम ब्रिटनच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ३.५ टक्के एवढी आहे. कॅनडामध्ये २०१० साली झालेल्या एका पाहणीत आढळले होते, की द्विभाषक कर्मचाऱ्यांना एकभाषक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तीन ते सात टक्के अधिक वेतन मिळते.  अमेरिकेत परदेशी भाषा शिकल्यास ३.८ टक्के अधिक वेतन मिळण्याचा अंदाज आहे. भारतात इंग्रजी अवगत असणाऱ्यांना अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत दर ताशी सरासरी ३४ टक्के अधिक वेतन मिळते, असे निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे. 

सुदैवाने, आपण भारतीय नेहमीच बहुभाषक राहिलो आहोत. मूल एकापेक्षा जास्त भाषांच्या वातावरणात राहिले, तर ते गोंधळलेले, निर्बुद्ध आणि अगदी स्किझोफ्रेनिक शुद्ध होऊ शकते, असे युरोप आणि अन्य पाश्चिमात्य देशांमध्ये मानले जात होते. याच्या उलट भारतात नेहमीच मुलांना लहानपणापासून वेगवेगळ्या भाषेचे संस्कार मिळत होते – अगदी अभावितपणे. लहानपणी म्हटलेले संस्कृत श्लोक, चित्रपटांतून आदळणारी हिंदी गाणी, माध्यम व चर्चांतून होणारे इंग्रजीचे संस्कार, आजूबाजूचे स्थानिक वातावरण आणि कोसागणिक बदलणारी भाषा यामुळे प्रत्येक मूल भाषेच्या दृष्टीने समृद्ध होत होते. या देशात अनेक भाषा सुखाने एकमेकांसोबत नांदत होत्या, याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतात. 

सम्राट अशोकाचे शिलालेख हा आपल्याकडचा सर्वांत प्राचीन पुरातत्त्वीय पुरावा मानला जातो. अशोकाचे शिलालेख चार वेगवेगळ्या लिप्यांमध्ये सापडतात. अफगाणिस्तानात सापडलेल्या शिलालेखांवर अरामाईक आणि ग्रीक लिप्या आहेत, तर उत्तर भारतापासून दक्षिणेतील म्हैसूरपर्यंतच्या प्रदेशात खरोष्टी आणि ब्राह्मी या लिप्या आढळतात. आपल्या मराठीतील पहिले वाक्य म्हणून म्हटले जाणाऱ्या गोमटेश्वर येथील शिलालेखावर मराठीतील वाक्यासोबतच संस्कृत आणि कन्नड भाषेतही वाक्ये आहेत. हे असे होते म्हणूनच केरळमधील शंकराचार्य काश्मीरपर्यंत जाऊन वादविवाद करू शकत होते. शतकानुशतके लोक रामेश्वरममधील समुद्राचे पाणी गंगासागरात व गंगासागरातील पाणी रामेश्वरमच्या समुद्रात ओतून पुण्य मिळवत होते. वाराणसीतील पंड्यांकडे जवळपास प्रत्येक नागरिकाची वंशावळ जपून ठेवण्यात येत होती. पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी कर्नाटक आणि आंध्रसारख्या प्रदेशातूनही वारकरी जमत होते व आहेत. या सर्व व्यवहारांमध्ये भाषा ही कधीही अडचण ठरली नाही.  

पाश्चिमात्य जगाला हे बहुभाषकत्व आत्ता आत्ता उमजू लागले आहे. ‘सुपर चाइल्ड’ नावाची एक संकल्पना अलीकडेच जोरात असून, आपल्या मुलांना अनेक कौशल्ये व क्षमता आणि परिपूर्ण करण्याने पालकांना झपाटले आहे. त्यासाठी बहुभाषकत्व ही जादूची छडी आहे, असे मानून अनेक पुस्तके आणि अन्य साहित्याची निर्मिती झाली आहे. ब्रिटनमधील आधुनिक भाषांबाबत सर्वपक्षीय संसदीय गट (ऑल पार्टी पार्लमेंटरी ग्रुप ऑन मॉडर्न लँग्वेजेस) ही एक समिती आहे. या समितीने जुलै २०१४मध्ये भाषांबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात म्हटले आहे, ‘एकविसाव्या शतकात केवळ इंग्रजी बोलणे हे इंग्रजी बिलकुल न बोलण्याइतकेच अडचणीचे ठरणार आहे, असे आधुनिक संशोधनातून सिद्ध झाले आहे.’ शिक्षण व कौशल्य, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण तसेच सामुदायिक संबंध यांसाठी अन्य भाषा शिकणे महत्त्वाचे आहे, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. 

त्यांना ज्या गोष्टी आवर्जून कराव्या लागत आहेत, त्या आपल्याला स्वाभाविकपणे मिळालेल्या आहेत. आपल्याकडे कोणतीही व्यक्ती जन्मतः दोन ते तीन भाषांनी भरलेल्या वातावरणातच वाढते. स्वभाषेचा अभिमान बाळगतानाच अन्य भाषा अवगत करणे, याला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. मायभाषेच्या प्रेमापोटी जर आपण अन्य भाषांचा दुस्वास करत असू, तर आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणार आहोत. विश्व आर्थिक मंचाच्या अहवालातून आपण एवढा धडा घेतला तरी पुरेसे आहे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link