Next
‘ऑडिओ बुक्सची लोकप्रियता वाढेल’
BOI
Wednesday, December 27 | 02:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आजवर आपण छापील पुस्तके केवळ वाचण्याचाच आनंद घेत होतो; परंतु तंत्रज्ञानाने घडवलेल्या क्रांतीमुळे श्राव्यपुस्तकेही (ऑडिओ बुक्स) झपाट्याने लोकप्रिय होत असून, आगामी काळात पुस्तके ऐकण्याचे प्रमाण लक्षणीय वाढणार आहे,’ असे प्रतिपादन ऑडिओ बुक्स स्ट्रिमिंग क्षेत्रातील आघाडीच्या स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी येथे केले.

स्टोरीटेल या युरोपातील अग्रगण्य व लोकप्रिय ऑडिओ बुक सेवेने भारतात यशस्वी पदार्पण केले असून, इंग्रजीसह हिंदी व मराठी या भाषांमध्ये ऑडिओ बुक्स उपलब्ध करून द्यायला सुरवात केली आहे. या सेवेची माहिती चोखंदळ वाचक-श्रोत्यांना करून देण्यासाठी कंपनीतर्फे येथील पत्रकार भवन सभागृहात ‘हॅपी लिसनिंग’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते उदय सबनीस, लेखक ऋषिकेश गुप्ते, संजय सोनवणी आदी मान्यवर उपस्थित होते.

कथाकथन आणि कथाश्रवणाची भारतातील परंपरा अत्यंत प्राचीन आहे, असे सांगून योगेश म्हणाले, ‘छापील पुस्तकांचा प्रसार होण्याआधी समाज मनोरंजक आशय श्राव्य माध्यमांतूनच मिळवत होता. एखादी कहाणी ऐकण्याची उत्सुकता बालवयापासूनच आपल्या सर्वांच्या मनात असते आणि ती गरज ऑडिओबुक्स पूर्ण करतात. या श्राव्यपुस्तकांमधील कथा कुशल निवेदकांनी आपल्या प्रभावी आवाजात सादर केलेल्या असल्याने त्या मनाला भिडतात. आजकाल लोकांचे प्रवास करण्याचे प्रमाण वाढत आहे. श्राव्यपुस्तके प्रवासात आनंद देतात. अगदी सकाळचा व्यायामही हे पुस्तक ऐकत करता येतो आणि गृहिणींना घरकाम करताना ही पुस्तके ऐकणे विरंगुळा ठरते. ज्यांना छापील पुस्तके वाचण्याइतकाही वेळ मिळत नाही किंवा ज्यांना एखादी भाषा लिहीता-वाचता येत नाही; मात्र बोलून-ऐकून समजते अशांना श्राव्यपुस्तकांमधून त्या भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा आनंद घेता येतो. भारतातील पुस्तक बाजारपेठेचा सर्वाधिक हिस्सा छापील पुस्तकांचा असला तरी श्राव्य पुस्तके ही छापील पुस्तकांना पर्याय किंवा स्पर्धक नसून उलट पूरक आहेत.’

‘हॅपी लिसनिंग’ कार्यक्रमात बोलताना  अभिनेते उदय सबनीस. शेजारी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक ऋषिकेश गुप्ते, संजय सोनवणीश्राव्य पुस्तकांच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत माहिती देताना योगेश म्हणाले, ‘भारतात गेल्या दोन वर्षांत स्मार्टफोन्सचा प्रचंड प्रसार झाला आहे. शिवाय हाय-स्पीड मोबाईल इंटरनेट सेवाही किफायती दरात उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईलवर संगीत ऐकणे किंवा चित्रपट पाहणे, असा मनोरंजन आशयाचा आनंद हवा तेव्हा, हवा तेथे फावल्या वेळात मिळवण्याकडे नव्या पिढीचा कल आहे. या कारणांमुळे श्राव्य पुस्तकांनाही प्रतिसाद वाढत चालला आहे. आम्ही इंग्रजी आणि हिंदीपाठोपाठ आमची सेवा सादर करण्यासाठी मराठी भाषा निवडली, कारण २००९च्या नॅशनल यूथ रीडरशिप सर्व्हेमधून असे आढळले, की मराठी ही विरंगुळ्यासाठी वाचली जाणारी दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी भाषा आहे. इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये आम्ही आतापर्यंत उत्तम साहित्य श्राव्यपुस्तकांच्या माध्यमातून देत आलो आहोत आणि लवकरच आम्ही देशातील अन्य प्रादेशिक भाषांकडेही वळणार आहोत. ही पुस्तके आम्ही स्टोरीटेल प्लिकेशनद्वारेही देऊ केली आहेत. तेथे ती कितीही वेळा डाऊनलोड करता येतात; पण त्यांची कॉपी करता येत नाही. यात बुकमार्किंग आणि स्पीड रीडिंग (आवाजाचा वेग कमी-जास्त करणे) अशा सुविधा आम्ही दिल्या आहेत.’

स्टोरीटेल ग्रुप हा स्ट्रिमिंग ऑडिओबुक्स व पब्लिशिंग क्षेत्रांतील जागतिक आघाडीचा समूह असून आहे. स्ट्रिमिंग ही वर्गणीआधारित (सशुल्क) सेवा आहे, ज्यामध्ये स्टोरीटेल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑडिओ बुक्स व ई-बुक्स उपलब्ध करून दिली जातात. भारताखेरीज ही सेवा स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड, पोलंड, हॉलंड, रशिया व स्पेन या आठ देशांत यशस्वी सुरू आहे. सध्या स्टोरीटेल अ‍ॅपवर २५०हून अधिक मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. बहुतेकशी ही पुस्तके ऑडिओ स्वरूपात नव्हती व त्याचे ऑडिओ स्वरूपात रूपांतर आम्ही केले आहे. पुढील वर्षी ही संख्या ५००पर्यंत नेण्याचे आमचे ध्येय आहे,’ असे ते म्हणाले.

‘हॅपी लिसनिंग’ कार्यक्रमात ‘मृत्यूंजय’ व ‘कृष्णा किनारा’ या पुस्तकांचे अभिवाचन अनुक्रमे संकेत म्हात्रे व अनुपमा टाकमोघे यांनी केले. उदय सबनीस व चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांचा अनुभव सांगितला. आवाजामागचे कलाकार ऋषिकेश गुप्ते व संजय सोनवणी यांनी मनोगत व्यक्त केले. लेखकांचा सत्कार होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रास्ताविकात ‘स्टोरीटेल’च्या परंपरेविषयी माहिती देऊन ‘स्टोरीटेलची स्टोरी’ हे सादरीकरण करून ‘स्टोरीटेल’चा भारतातील आतापर्यंतचा प्रवास विषद करण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link