Next
मोटके-पाटलांचे डिजिटल गो संगोपन
BOI
Tuesday, October 31 | 11:45 AM
15 0 0
Share this story


गवत कापणे, वैरण बारीक करणे, पिण्याच्या पाण्याची सोय, गायीचे दूध काढणे ही सगळी कामे यंत्राद्वारे करून, गायीच्या शेणापासून वीज व खतनिर्मिती, मिल्किंग पार्लर सिस्टीमद्वारे सकस व पौष्टिक दूध निर्मितीचा डिजिटल प्रकल्प कोल्हापुरातील युवा शेतकरी आकाश मोटके-पाटील यांनी उभारला आहे. या अनोख्या प्रकल्पाची माहिती देणारा मोटके-पाटील यांचा लेख ‘शेती प्रगती’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. तो येथे देत आहोत. 
...........

आकाश मोटके - पाटीलमाझे वडील हरहुन्नरी शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक प्रकारचे उद्योग केले आहेत. गड्याचा गवंडी कसा होतो, त्या प्रत्येक टप्प्यातून ते गेले आहेत. त्यांनी १७ वर्षांपूर्वी गो-पालनाला सुरुवात केली. आदर्श गोठा व्यवस्थापन कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आज आमचे सारे कुटुंब या व्यवसायात काम करते आहे. त्याची प्रेरणा आमचे वडील आहेत. तेच आमचे खरे आयडॉल आहेत. 

मी आणि माझ्या भावाने या व्यवसायाशी संबंधित काहीही शिक्षण घेतलेले नाही. मी स्वतः इंजिनिअर आहे; पण मला लहानपणापासून शेतीचे आणि गोठा व्यवस्थापनाचे धडे व संस्कार मिळाले होते. एका क्षणी मी शेती करायचे ठरविले. या व्यवसायाचा पाया तयार होता. गोठ्यावर जनावरं होती. तो व्यवसाय अधिक पुढे न्यावयाचा हे ठरवून मी यामध्ये लक्ष घातले. बाबांचा १७ वर्षांचा व्यवसायाचा अनुभव होता. त्यांच्यापुढे मी काहीच नव्हतो; पण त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यातून मी घडत गेलो. गेली चार वर्षे मी या व्यवसायात आहे. 

आपल्याकडे डॉक्युमेंटशनला फार कोणी महत्त्व देत नाही. आम्ही तर गोठ्यावरच्या प्रत्येक गायीच्या, म्हशीच्या कालवडींचा इतिहास नीट नोंद करून ठेवायला सुरुवात केली. बारीक-सारीक नोंदी करीत राहिलो. त्याची संगणकावरून नीट मांडणी केली. मी स्वतः इंजिनीअर असल्याने यामध्ये मला चांगली गती होती. त्याचा यामध्ये मला खूप उपयोग झाला. 

अत्याधुनिक मशीनद्वारे शेतातील गवत कापणे, वैरण बारीक करणे, पिण्याच्या पाण्याची सोय, गाईचे दूध काढणे, गायीच्या शेणापासून वीज व खतनिर्मिती प्रकल्प यशस्वी केला. सध्या आमच्याकडे ३०० संकरित गायींचा मुक्त गोठा उभारला आहे. या गोठ्यामध्ये गायींच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार त्यांचे वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळ्या जागी ठेवण्यात येते. वर्गीकरणाच्या जागेत गायीच्या गरजेएवढे फूड बॅलन्सिंग केलेले खाद्य पुरविण्यात येते. त्याचबरोबर २४ तास सायफन पद्धतीने पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याच्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याच्या फॉगर सिस्टीमद्वारे संपुर्ण गोठ्यामध्ये शीतलता निर्माण करण्यात आली आहे. 
गायींसाठी शेतामधील ओला चारा कापून आणण्याकरिता मनुष्यबळाऐवजी ब्रश कटर मशीनचा वापर केल्याने कमी वेळेत जास्त गवत, वैरण कापली जाते. कापलेला चारा अत्याधुनिक चाफकटर (कडबाकुट्टी) यंत्राद्वारे बारीक करण्यात येतो. बारीक केलेल्या चाऱ्यामुळे गायींची ताकद चर्वण क्रियेसाठी वाया जात नाही. पचनक्रिया चांगली राहते. दूध देण्याचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढते. हिरव्या चाऱ्यामध्ये बऱ्याचशा पोषक द्रव्यांची कमतरता असते. यामुळे मिनरल मिक्श्चर म्हणून व्हिटॅमिन व इतर पोषकद्रव्ये चाऱ्याबरोबर देण्यात येतात. 

टोटल मिक्स रेशन (टीएमआर) मशीनद्वारे ओला चारा, वाळलेला (सुका) चारा, पशुखाद्य, मिनरल मिक्श्चर, आदी पोषकद्रव्ये एकत्र करून वर्गीकरण केलेल्या गायींच्या ठिकाणी खाण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे पुरविण्यात येतो. यामुळे वैरणीची सकसता टिकते व वैरणीच्या सर्वांत लहान भागाचाही उपयोग होत असल्याने ती वाया जात नाही. 

गायीचे दूध काढण्यासाठी बकेट मिल्किंग मशीनचा वापर करण्यात येतो. यामुळे गायीला त्रास न होता दूध काढण्याची प्रक्रिया होते. दूध येताना पारदर्शी क्लस्टरमधून दिसते. दूध काढण्यास कमी वेळ व मनुष्यबळही कमी लागते. सध्या आमच्याकडे तीन हजार लिटर दुधाचे उत्पन्न मिळते. ते सध्या तरी आम्ही गोकुळ दूध संघाला पाठवतो आहोत. भविष्यात दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि नियोजन आहे. 

या प्रकल्पामध्ये दररोज सुमारे तीन टन शेणखत उपलब्ध होते. ते छोट्या हातगाडीच्या साह्याने मजुरांमार्फत गोळा केले जाते. गोळा केलेले शेणखत तयार केलेल्या शेणकुंडीत टाकण्यात येते. गोठा धुतलेले पाणीही त्या कुंडीत सोडण्यात येऊन मिश्रण तयार केले जाते. तयार झालेला बायोगॅस पीव्हीसी पाइपमधून ५५ घनमीटरच्या रबरी फुग्यात जातो. तेथून हा गॅस दोन लोखंडी टाक्यांमध्ये सोडण्यात येतो. एका टाकीत पाणी असते. तेथे कार्बनडायॉक्साइड स्क्रबिंग होते. दुसऱ्या टाकीत लोखंडी किस असतो. तेथे हायड्रोजन सल्फाइड स्क्रबिंगची प्रक्रिया घडते. त्यानंतर शिल्लक राहणारा मिथेन गॅस जनरेटरकडे पाठवून ऊर्जानिर्मिती करण्यात येते. आमच्याकडे दररोज १५० युनिट वीज तयार होते. आमच्या गोठ्यासाठी, घरासाठी, तसेच आमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरात हीच वीज वापरली जाते आहे. आमच्या गोठ्याला आता १७ वर्षे झाली असली, तरी मी गोठा व्यवस्थापनात येऊन चार वर्षे झाली. मी जेव्हा या व्यवसायात आलो, तेव्हा यातील काही-काही गोष्टी सुरू होत्या. त्याला अधिक गती देण्याचे काम मी केले आहे.

अशा अत्याधुनिक पद्धतीने शेतीपूरक गो-पालन, संगोपन, दूध उत्पादन, बायोगॅस निर्मिती, शेणखत निर्मितीचा हा अनोखा प्रकल्प आम्ही उभारला आहे. आज आमच्याकडे २.५० कोटी रुपयांचे भांडवल गोठ्यावर उभे आहे. १८० गायी आहेत. त्यामध्ये १२६ इम्पोर्टेड कालवडी आहेत. यातील ७० ते ८० टक्के गायी आमच्या गोठ्यावर तयार झालेल्या आहेत. 

आमच्याकडे मुक्त गोठा असल्याने गायींच्या ठिकाणी जाऊन दूध काढण्याकरिता लागणारा वेळ, मनुष्यबळ, वाहतूक व वातावरणाशी आलेल्या संपर्कामुळे दुधाचा दर्जा राखणे कष्टदायक ठरते. या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर मिल्किंग पार्लरची सोय केली आहे. दूध काढण्याची वेळ झाली की गायी आपोआप त्यांच्या-त्यांच्या जागी येऊन उभ्या राहतात. मशीनद्वारे त्यांचे दूध काढले जाते. त्याला मानवी स्पर्श होणार नसल्याने, तसेच हवेशीही संपर्क येणार नसल्याने दुधातील बॅक्टेरिया वाढत नाहीत. यामुळे अत्यंत सकस व पौष्टिक दूध ग्राहकांपर्यंत पोहोवण्याचे काम या मिल्किंग पार्लर सिस्टीमद्वारे केले जाते. 

कोणत्याही गोठ्यातील कालवडी हे त्या गोठ्याचे वैभव असते. त्यावर आम्ही अतिशय बारकाईने काम करतो आहोत. परदेशातून आयात केलेल्या सिमेनद्वारे गायींची गर्भधारणा केली जाते. त्यातील शंभर टक्के ब्रीड यशस्वी करून सुदृढ वासरांची निर्मिती केली जाते. अशा प्रकारचे वासरू संगोपन करून आम्ही गोठा व्यवस्थापनात भरीव असे काम केले आहे. आज आमच्याकडे अशा १३० इम्पोर्टेड कालवडी आहेत. हे आमचे या व्यवसायातील मुख्य भांडवल आहे, असे आम्ही मानतो आहोत. 

नऊ गाई आणि नऊ म्हशींपासून सुरू झालेला आमचा गोठा आता महाराष्ट्रातील एक अग्रेसर गोठा म्हणून आळखला जातो. यामध्ये माझ्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. दररोज तीन हजार लिटर दूध ‘गोकुळ’ला पाठविले जाते. आमच्या गायीला दोनदा ‘गोकुळश्री’चा सन्मान मिळाला आहे. सर्वाधिक ४२.५ लिटर प्रतिदिन दूध देणारी गाय आम्ही विकसित केली आहे. याचा आम्हाला विशेष असा अभिमान वाटतो. 

आमच्या गोठ्याची वैशिष्ट्ये 
- संपूर्ण डिजिटल गो-संगोपन, राज्यातील पहिला प्रयोग.
- सध्या गोठ्यात १८० गायी, १३० इम्पोर्टेड कालवडी.
- एका वेतात (४०० दिवसांत) नऊ ते १२ हजार लिटर दूध.
- ८० टक्के जनावरं स्वतःच्या गोठ्यावर तयार झालेली.
- हवामानबदलामुळे जनावरांवर येणाऱ्या ताणावर नियंत्रण आणण्यात यश.
- शेणापासून वीजनिर्मिती, जैविक सेंद्रिय खतनिर्मिती

संपर्क : आकाश अण्णासाहेब मोटके-पाटील,
मु. पो. जांभळी, नांदणी रोड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
मोबाइल : ९८२२४ १८२२४
.............
(हा लेख कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या ‘शेती प्रगती’ या मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. हा अंक दुग्ध व्यवसाय विशेषांक आहे. नावाप्रमाणेच हे मासिक शेतीला वाहिलेले असून, शेतीच्या तांत्रिक ज्ञानापासून शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथांपर्यंतचं वाचनीय साहित्य या मासिकात प्रसिद्ध होतं. रावसाहेब पुजारी हे ‘शेती प्रगती’चे संपादक आहेत. अंकासाठी संपर्क : (०२३१) २६५३३७२, ९८८१७ ४७३२५) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link