Next
पुलं येतायत भेटीला... चार जानेवारीला..
‘भाई-व्यक्ती की वल्ली’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज
BOI
Thursday, December 20, 2018 | 05:44 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘वायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ चित्रपट येत्या चार जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीमध्ये दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट असून, याचा उत्तरार्ध आठ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

घोषणेपासूनच उत्सुकतेचा विषय असलेल्या या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ‘वायकॉम १८’च्या मराठी एंटरटेनमेंट विभागाचे व्यवसाय प्रमुख निखिल साने, दिग्दर्शक महेश मांजरेकर, पुलंची भूमिका साकारणारे अभिनेते सागर देशमुख आणि विद्याधर जोशी यांनी नुकतीच पुण्याला भेट दिली आणि चित्रपटाबद्दल माध्यमांशी संवाद साधला. 

चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांनी लिहिली असून, संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत. संगीत अजित परब यांचे आहे. चित्रपटामध्ये इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, ‘मी बायोपिक पहिल्यांदाच दिग्दर्शित केला, आणि तोसुद्धा महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वावर आधारीत असलेला. पु. ल. देशपांडे यांची ओळख विनोदी लेखक म्हणून जरी असली तरी त्यांनी कलेचे बहुतेक सर्व प्रांत गाजवलेले आहेत. पुलंनी निर्माण केलेल्या वल्ली आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत, पण त्यापलीकडे जाऊन पुलं हे प्रत्यक्ष आयुष्यात कसे होते त्याचं चित्रण मी या चित्रपटात करायचा प्रयत्न केला आहे. सुनीताबाईंचं पुलंच्या आयुष्यात असलेलं महत्त्व, मित्रांच्या संगतीत रमणारे पुलं, त्यांचं दातृत्व असे अनेक पैलू चित्रपटात पाहता येतील. पुलंचं संगीतावर विशेष प्रेम होतं, त्यामुळे चित्रपटातही गाण्यांना विशेष स्थान आहे आणि त्याचं चित्रणही जुन्या आठवणींना उजाळा देईल, असे आहे.’ 

भाई-व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता सागर देशमुख, विद्याधर जोशी, निखिल साने आदी मान्यवर

आपल्या भुमिकेबद्दल बोलताना सागर देशमुख म्हणाले, ‘एक नट कायमच वाट बघत असतो अशा एखाद्या भूमिकेची ज्यात त्याला त्याचं सर्वस्व ओतता येईल आणि मला अशा व्यक्तीची भूमिका मिळाली ज्यांना अवघ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतले. इतक्या उदंड प्रेम मिळालेल्या माणसाला साकारायचं कसं हा एक मोठा पोटात गोळा आणणारा प्रश्न माझ्यासमोर होता. मी पुन्हा एकदा त्यांची पुस्तके वाचायला लागलो. त्यांच्याबद्दल लिहिलेले आणि त्यांनी इतरांबद्दल लिहिलेले जास्त वाचले. स्क्रिप्ट मिळाल्यानंतर त्यांच्या वयाचे टप्पे ओळखले. त्यांच्या आयुष्यातील घटना समजून घ्यायचा प्रयत्न केला. पण, त्यांचा आवाका प्रचंड मोठा आहे. एक माणूस लिहितो, दिग्दर्शन करतो, सिनेमा बनवतो, पेटी वाजवतो, कथाकथन करतो, टागोर बंगालीतून वाचता यावा म्हणून शांतीनिकेतनमध्ये जाऊन तळ ठोकतो. हे सगळे केवळ अविश्वसनीय होते. आयुष्याच्या अशा टप्प्यावर मला ही भूमिका मिळावी हे मी माझं भाग्य समजतो. त्यांना साकारताना मी स्वत: खूप धमाल केली आहे. मला आशा आहे प्रेक्षकांनाही आमचा सिनेमा आवडेल.’

या वेळी बोलताना निखिल साने म्हणाले, ‘पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रदर्शित होणारा हा बहुदा पहिलाच मराठी चित्रपट असेल. मराठी चित्रपटाच्या संकल्पना अभिनव असतात. त्याची साहित्यातून निर्मिती होते, त्यामुळे इतर चित्रपटांच्या तुलनेत वेगळेपण बघायला मिळते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search