Next
‘नवभारताच्या निर्माणात पुण्यासह महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल’
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, December 19, 2018 | 01:17 PM
15 0 0
Share this article:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रो लाईन-तीनचे भूमिपूजन झाले. या वेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : ‘पुण्यातील पहिल्या दोन टप्प्यातील मेट्रोचे काम वेगाने सुरू असून, पुढच्या वर्षी १२ किलोमीटर पर्यंत मेट्रो पुण्यात धावेल. माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार असल्याने भविष्यात हे शहर जागतिकस्तरावर ओळखले जाईल. मेट्रो देशातील शहरांची ‘जीवन वाहिनी’ बनत असून, ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असणार आहे. या नवभारताच्या निर्माणात महाराष्ट्र आणि पुण्याचे मोठे योगदान असेल’,असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १८ डिसेंबर) पुणे मेट्रो लाईन-तीनचे भूमिपूजन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, खासदार अनिल शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘पुणे शहराची ओळख सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर अशी असून, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पुण्याने मोठी प्रगती केली आहे. हिंजवडी हे माहिती तंत्रज्ञानाचे हब असून, या‍‍ ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी देशाला नवी ओळख दिली आहे. या ठिकाणी होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे या ठिकाणी काम करत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. या मेट्रो मार्गामुळे वाहतुकीचा आणि प्रगतीचा वेग वाढणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्राचे आणि राज्याचे विशेष लक्ष आहे. देशातील गावे-शहरे एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे. देशाच्या कोणत्याही भागात फिरताना या कामाचा वेग सहज लक्षात येईल.’


‘विकासाच्या महामार्गापासून कोणीही वंचित राहू इच्छित नाही. त्यासाठी देशभरातील अनेक शहरांतून मेट्रोचे प्रस्ताव केंद्राकडे आले आहेत. देशात ५०० किलोमीटरचे मेट्रोचे काम पूर्ण झाले असून ६५० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मेट्रोची सुरूवात झाली. त्यांच्या काळातच दिल्लीच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले. गावांपासून शहरांपर्यंत पायाभूत सुविधांवर भर देण्याचे सरकारचे धोरण आहे. सार्वजनिक - खाजगी भागिदारी धोरणाचा पुरस्कार केंद्राने केला असून त्या माध्यमातून देशातील पहिला मेट्रो प्रकल्प पुण्यात साकारत आहे. या नव्या धोरणामुळे मेट्रोच्या विकासाला गती मिळणार आहे. मेट्रो - रेल्वेचे चांगले धोरण केंद्र सरकारने विकसित केले असून, केंद्राच्या आणि राज्याच्या व्यापकदृष्टीचा हा परिणाम आहे’,असेही त्यांनी नमूद केले. 

‘इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ डुईंग’ हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगत, मोदी म्हणाले, ‘पुण्यासह महाराष्ट्रातील नऊ शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत १५०० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून, ३५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्याच बरोबर देशात स्वच्छता आणि गरिबांना घरे देण्याबाबत मोठे काम सुरू असून, रस्ते, वीज आणि पाणी यांच्याशी निगडीत अनेक प्रकल्प सुरू आहेत.’

‘सामान्य लोकांना सरकारच्या सेवा वेगाने आणि चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी डिजिटल इंडियाचे काम सुरू आहे. या माध्यमातून देशातील गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जात आहेत. लोकांसाठी सोपे आणि सुलभ नियम बनविण्याचे सरकारचे धोरण आहे. नवे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यात स्वस्त मोबाईल आणि स्वस्त इंटरनेट डेटाचा मोठा वाटा आहे. जगातला सर्वाधिक मोबाईल बनविणारा दुसरा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या साडेचार वर्षात डिजिटल व्यवहार सहा पटीने वाढले आहेत. यामुळे लोकांच्या रोजच्या गरजा वेगाने पूर्ण होत आहेत. हार्डवेअरबरोबरच स्वस्त इंटरनेट डेटा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात एक लाख एलईडी पदपथ दिवे लावण्याचे काम पूर्ण झाले असून, या माध्यमातून मोठी विजेची बचत होत आहे’, असेही त्यांनी सांगितले.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुण्याकरिता अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. आयटी हब असलेले हिंजवडी जगाला मानव संसाधन पुरवते. याच ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती केली जाते. हा भाग शिवाजीनगरशी मेट्रोच्या माध्यमातून जोडला गेल्यामुळे प्रगतीचे नवे दालन खुले झाले आहे. आयटी पार्कमध्ये लाखो लोक कामाच्या निमित्ताने येतात. प्रवासामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो.’

‘केंद्राच्या नव्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या या नव्या धोरणानूसार सर्वात पहिला मेट्रोचा प्रकल्प पुण्यात होत आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही;तसेच वेळेची बचत होऊन गतिमानता आणि कार्यक्षमता वाढून देशाचा विकास होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील; तसेच देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुणे नावलौकिक मिळवेल’, असा विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे क्षेत्र महाराष्ट्रातील विकासाचे क्षेत्र होईल’, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागात सुरू करण्यात येणाऱ्या रिंग रोड, हायटेक सिटी, इलेक्ट्रिक बसेस आदी प्रकल्पांचा उल्लेख केला. ‘पीएमआरडीएच्या माध्यमातून; तसेच लोकांच्या सहकार्यातून या भागाचा सुनियोजित विकास साधण्यावर आपला भर आहे’, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, ‘पुणे शहराबरोबर माझा जवळचा संबंध राहिला आहे. राज्यातीलच नव्हे; तर देशातले सर्वात प्रगतशील शहर म्हणून पुण्याचा विकास होत आहे. पुणे ही सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहे. स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले सुरू आहे.’

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘कमी कालावधीत पुण्यात मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. ‘पुणे मेट्रो लाईन-तीन’मुळे हिंजवडीच्या आयटी पार्कमधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या मेट्रोच्या कामामुळे प्रवासाला गती मिळणार आहे. हिंजवडी मेट्रोचा विस्तार वाढत राहणार असून, शिवाजीनगर पर्यंतची ही मेट्रो हडपसरपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. पुण्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी पुणे शहरासाठी आला आहे. स्मार्ट सिटी, जायका, मेट्रो यासारखे मोठे प्रकल्पाबरोबर १६ हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्गाची कामे होणार आहेत. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबरोबच पुरंदर येथील विमानतळाच्या कामालाही गती मिळत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search