Next
तुम ही मेरे मंदिर...
BOI
Sunday, September 24, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गीतकार राजेंद्रकृष्णगीतकार राजेंद्रकृष्ण यांचा २३ सप्टेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘तुम ही मेरे मंदिर, तुम ही मेरी पूजा’ हे गीत...
.............
सप्टेंबर महिना तसा वेगळाच! बघा ना, १२ सप्टेंबरला संगीतकार जयकिशनचा स्मृतिदिन आणि ज्या हसरत जयपुरींची अनेक गीते जयकिशननी संगीतात गुंफली त्या हसरत जयपुरींचा स्मृतिदिनही याच सप्टेंबर महिन्यात १७ तारखेला! संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी हे एकत्र आल्यावर गायक हेमंतकुमार यांच्याकडून त्यांनी काही सुंदर गाणी गाऊन घेतली. त्या हेमंतकुमार यांचा स्मृतिदिनही सप्टेंबर महिन्यात २६ तारखेला. शंकर जयकिशन, हसरत, हेमंतकुमार एकत्र आले होते तो ‘पतिता’ चित्रपट! त्याचा नायक देव आनंद! ‘देव’ची जन्मतारीख २६ सप्टेंबर! आणि याच चित्रपटात ‘मिट्टी से खेलते हो ...’सारखे सुरेल गीत गाणाऱ्या स्वरसम्राज्ञी लतादीदी यांचा जन्म २८ सप्टेंबरचा!

एकमेकांत सगळे असे गुंफलेले! एकाची आठवण आली, की सगळे आठवणारे! आणि आता लतादीदींचा उल्लेख आला, की अनेक गीतकार, संगीतकार आठवतात. त्यामध्ये एक महत्त्वाचे नाव गीतकार राजेंद्रकृष्ण! त्यांचाही या सप्टेंबर महिन्याशी संबंध आहे! २३ सप्टेंबर १९८७ ही त्यांच्या ‘गमनाची’ तारीख!

सध्याच्या पाकिस्तानातील जलालपूर या गावी ६ जून १९१९ रोजी जन्मलेल्या राजेंद्रकृष्ण यांनी राजेंद्रकृष्ण यांना आठवीत शिकत असतानाच काव्य लिहिण्याचा छंद लागला! शिक्षण पूर्ण होताच ते सिमला येथे नगरपालिकेत क्लार्क म्हणून नोकरी करू लागले; पण तरीही कविता लिहिणे, काव्य संमेलनांमध्ये जाणे चालूच राहिले. वृत्तपत्रांत ते आपल्या कविता प्रसिद्धीसाठी पाठवत असत! दिल्ली आणि पंजाब येथील वृत्तपत्रे कृष्णजन्माष्टमीनिमित्त विशेषांक काढत असत. त्याकरिता राजेंद्रकृष्ण कृष्णाबद्दलची कविता लिहून पाठवत असत! ऐन तारुण्यातील या सवयीमुळेच त्यांनी भावीकाळात मिस मेरी (१९५७), ब्लफमास्टर (१९६३), खानदान (१९६५), मालिका (१९७२) या चित्रपटांकारिता सुंदर अशी कृष्णगीते लिहिली आणि ती लोकप्रियही झाली.

१९४२मध्ये ते मुंबईत आले; पण चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवणे सोपे नव्हते. संघर्ष सुरू झाला. पोटासाठी फुटपाथवर रुमाल पायमोजे विकावे लागले. पाच वर्षे त्या संघर्षात गेली. १९४७मध्ये ‘जनता’ आणि ‘जंजीर’ या दोन चित्रपटांकारिता त्यांना गीते व संवादलेखनाचे काम मिळाले; पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही; मात्र १९४८ हे वर्ष त्यांच्यासाठी भाग्यशाली ठरले. या वर्षात प्रथम ‘आज की रात’ हा चित्रपट आला. त्यामधील दहा गीते त्यांनी लिहिली होती. आणि नंतर आला ‘प्यार की जीत!’ त्याची पटकथा आणि संवाद, तसेच चार गीते राजेंद्रकृष्ण यांनी लिहिली होती. ‘तेरे नैनो नें चोरी किया...’ या सुरैयाने गायलेल्या गीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. १९४८मध्ये झालेल्या गांधी हत्येनंतर राजेंद्रकृष्ण यांनी महात्माजींचे जीवनचरित्र सांगणारे एक दीर्घकाव्य लिहिले. ते मोहम्मद रफींनी गायले. हुस्नलाल भगतराम यांनी संगीतबद्ध केले. त्या गीताने राजेंद्रकृष्ण यांचे नाव भारतभर झाले.

आणि मग राजेंद्रकृष्ण यांची लोकप्रियता वाढत जाणारे बडी बहन (१९४९), लाहोर (श्यामसुंदर), पतंगा, समाधी, अलबेला, अनारकली (सी. रामचंद्र) असे चित्रपट येत गेले. त्यामधील आशयसंपन्न आणि अलंकारिक भाषेतील गीते ही राजेंद्रकृष्ण यांची वेगळी ओळख बनली.

सी. रामचंद्र, मदनमोहन, रवी या संगीतकारांबरोबरची राजेंद्रकृष्ण यांची गीते एवढी मधुर व अर्थपूर्ण आहेत, की त्यापैकी एकाचा उल्लेख करावा, तर त्यापेक्षा जास्त मधुर अशी त्यांचीच अन्य दहा गीते पुढे येतात. संगीतकार चित्रगुप्त, कल्याणजी-आनंदजी, आर. डी. बर्मन, हंसराज बहल अशा अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशे चित्रपटांसाठी फक्त गाणी लिहिली, तर शंभर चित्रपटांसाठी पटकथा, संवाद व गाणी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या गीतांमध्ये कोणत्या प्रकारचे गीत नव्हते, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. प्रेमगीत, विरहगीत, भक्तिगीत, बालगीत, संदेशगीत, देशभक्तिपर गीत, अंगाईगीत, हास्यगीत अशा विविध प्रकारांची गीते त्यांनी लिहिली आहेत.

आजच्या (२३ सप्टेंबर) त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेले एक गीत पाहू! खरा प्रतिभावंत कवी तोच असतो, की जो फक्त स्वतःच्या अनुभवाच्या आधारेच लिहितो असे नाही, तर अन्य व्यक्तिमत्त्वांचे भावही जाणून तो समर्पक शब्दांत उतरवतो. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे म्हणूनच म्हटले जाते! राजेंद्रकृष्ण असेच प्रतिभासंपन्न होते. त्यांनी १९६५च्या ‘खानदान’ चित्रपटासाठी लिहिलेले एक सुंदर गीत याची साक्ष देते.

पतीवर अपार प्रेम करणाऱ्या एका भारतीय पत्नीच्या मनात आपल्या पतीविषयी कोणत्या भावना असतात त्या उपमा, उपमेय यांच्या आधारे शब्दांत उतरवताना राजेंद्रकृष्ण लिहितात....

तुम ही मेरे मंदिर, तुम ही मेरी पूजा, तुम ही देवता हो तुम ही देवता 
कोई मेरे आँखों से देखे तो समझे के तुम मेरे क्या हो के तुम मेरे क्या हो

(हे प्रियकरा/पतिराजा) माझे मंदिरही तूच आहेस आणि माझी पूजाही तूच आहेस. तूच माझा परमेश्वर आहेस; माझ्या नजरेतून कोणीही तुला पाहिले, तरच त्याला कळेल की तू माझा कोण आहेस...!

तुम ही मेरे माथे की बिंदिया की झिलमिल 
तुम्ही मेरे हाथों के गजरेकी मंज़िल 
मैं हूं एक छोटी सी माटी की गुडिया 
तुम ही प्राण मेरे, तुम ही आत्मा हो

माझ्या कपाळावरील बिंदीला तुझ्यामुळेच तेज, सौंदर्य प्राप्त झाले आहे. माझ्या हातातील गजरे, त्यांचे ध्येय, ईप्सित तूच आहेस. (म्हणजेच तू आहेस म्हणून मी हा शृंगार केला आहे.) (खरे तर) मी एक मातीची छोटीशी बाहुली आहे, की ज्या बाहुलीचे प्राण व आत्मा तूच आहेस.

बहोत रात बीती चलो मैं सुला दूँ
पवन छोडे सरगम, मैं लोरी सुना दूँ
तुम्हे देखकर ये खयाल आ रहा है 
के जैसे फरिश्ता कोई सो रहा हो

खूप रात्र झाली आहे. चल मी तुला आता झोपवते. वारा सरगम छेडत आहे. मीही आता तुझ्यासाठी अंगाईगीत म्हणते ! तुला (असे हे शांत झोपलेले) बघितल्यावर असे वाटते, की कोणी देवदूतच निद्रा घेत आहे.

राजेंद्रकृष्ण यांचे हे काव्य! एका स्त्री मनाच्या भावना पुरुषाने लिहिल्या आहेत हे खरेच वाटत नाही. सतार, तबला यांचा सुंदर वापर, साजेशी चाल हे संगीतकार रवीचे कौशल्य! आणि गाणारी स्वरसम्राज्ञी! विशेषतः ‘मैं लोरी सुना दूँ’ या शब्दानंतर ‘हुं हुं हुं...’ असा स्वर गीताचा प्रभाव वाढवतो. आणि एवढ्या सुंदर गीताला पडद्यावर सादर करणारी अभिनयसंपन्न कलावंत नूतन! तिचा अभिनय, तिच्या भूमिका हा एक स्वतंत्र विषय आहे.

राजेंद्रकृष्ण यांच्या स्मृतीबद्दल हे एक वेगळे गीत! ‘चल उड जा रे पंछी’ असे सांगत ते या दुनियेतून ३० वर्षांपूर्वी गेले; पण अशा अनेक गीतांमधून ते अजूनही आपल्यातच आहेत.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(‘सुनहरे गीत’ हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search