Next
‘एआरएआय’मध्ये पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा
प्रेस रिलीज
Thursday, March 01 | 01:11 PM
15 0 0
Share this story

'एआरएआय'च्या नवीन पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा व ‘व्हर्च्युअल कॅलिब्रेशन सेंटर’चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी  एआरएआय’च्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे, विश्वजीत सहाय, एन. व्ही. मराठे, एम. आर. सराफ,

पुणे: ‘दि ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (एआरएआय) नवीन पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा व ‘व्हर्च्युअल कॅलिब्रेशन सेंटर’चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले. 

संस्थेच्या वेताळ टेकडी परिसरात असलेल्या या ‘व्हर्च्युअल कॅलिब्रेशन सेंटर’मध्ये प्रदूषणाबद्दलच्या नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने वाहनांच्या इंजिनची आभासी यंत्रणेच्या साहाय्याने जुळणी करता येणार आहे. ‘एआरएआय’च्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे, अवजड उद्योग विभागाचे सहसचिव विश्वजीत सहाय,  वरिष्ठ उपसंचालक एन. व्ही. मराठे आणि एम. आर. सराफ, एआरएआयच्या टेक्नोलॉजी विभागाच्या  महाव्यवस्थापक उज्वला कारले आणि पर्यारवरण संशोधन  प्रयोगशाळेच्या मौक्तिक बावसे​ या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना अनंत गीते म्हणाले, ‘जागतिक स्तरावरील स्पर्धेला तोंड देण्यासाठी आजमितीला उपलब्ध तंत्रज्ञान आपल्याला माहिती असणे व त्याचा उपयोग करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपणही नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असावे. भारत -६ हे वाहनांच्या प्रदूषणाविषयीचे मानक २०२० मध्ये प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्व संबंधित मंत्रालय एकत्रित काम करीत आहे, ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यादृष्टीने एआरएआयमधील या दोन सुविधा अत्यंत महत्वाच्या ठरतील.’

मेक इन इंडियाअंतर्गत आजवर सर्वाधिक गुंतवणूक वाहन उद्योगात झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘मेक इन इंडिया अंतर्गत होणारी गुंतवणूक आपल्या राज्यात यावी, यासाठी राज्यांराज्यामधील स्पर्धा ही अत्यंत स्वागतार्ह्य बाब असून, ती मेक इन इंडियाच्या यशस्वीतेकडे नेण्यास कारमीभूत ठरेल’, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.‘नव्याने येऊ घातलेल्या वाहन उद्योग धोरणामध्ये वाहन उद्योग व ग्राहक या दोघांचाही आवर्जून विचार केलेला असेल’, अशी माहिती देखील त्यांनी या वेळी दिली.

‘वायू प्रदूषणाबद्दलचे ‘भारत– ६’  हे कडक मापदंड नजिकच्या काळात येऊ घातले आहेत. हे लक्षात घेऊन ‘एआरएआय’ने हे ‘व्हर्च्युअल कॅलिब्रेशन सेंटर’ उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मापदंडांचे पालन करण्याच्या दृष्टीने वाहनाचे इंजिन व इतर यंत्रणांची जुळणी म्हणजेच ‘कॅलिब्रेशन’ जलदगतीने करता यावे यासाठी हे केंद्र काम करणार आहे. 

‘भारत- ६’ या मापदंडांनुसार वेगवेगळ्या परिस्थितीत वाहनांमधून होणाऱ्या वायू उत्सर्जनाची पातळी निर्धारित पातळीच्या आत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे इंजिन आणि वाहनातून धूर बाहेर टाकणा-या यंत्रणेचे कॅलिब्रेशन महत्वाचे ठरते. हे कॅलिब्रेशन मानवी प्रयत्नातून करताना अधिक वेळ लागतो. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी काही प्रमाणात आभासी यंत्रणेमार्फत (‘सिम्युलेशन’द्वारे) कॅलिब्रेशन केले जाऊ शकते. ही आभासी यंत्रणा ‘एआरएआय’मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात उपलब्ध होणार आहे. यात वेळ आणि आर्थिक बचतीबरोबरच कॅलिब्रेशन प्रक्रियेत होणारे ‘कार्बन डायऑक्साईड’ उत्सर्जन देखील टाळता येईल. इंजिन कॅलिब्रेशनची ६० टक्के यंत्रणा या केंद्रात आभासी पद्धतीने होऊ शकेल तसेच; या कामात ८० टक्क्यांहून अधिक अचूकता साध्य करता येईल.

नवीन पर्यावरण संशोधन प्रयोगशाळेत वाहनातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाचे मापन आणि हवेची गुणवत्ता या क्षेत्रातील उपयोजित संशोधन केले जाणार आहे. वातावरणीय हवेतील प्रदूषणाची पातळी मोजणे, प्रदूषकांची पातळी आणि त्यांचे स्त्रोत जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या सेवा या प्रयोगशाळेमार्फत पुरवल्या जाणार आहेत. पर्यायी इंधनांचा वापर केला असता वाहन कसे चालते आणि वायू उत्सर्जनावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी प्रयोगशाळेत विशेष प्रकल्पही हाती घेतले जातील. अत्याधुनिक सुविधांसह हवेची गुणवत्ता तपासणे, वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामधील प्रदूषणावर नजर ठेवणे, अनियमित प्रदूषकांचे विश्लेषण करणे, वेगवेगळ्या इंधनाचे मूल्यांकन करणे आणि वाढत्या प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ही पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा सक्षम आहे. 
 या प्रयोगशाळेमार्फत वापर करण्याजोगा कालखंड संपत आलेली वाहने आणि ट्रॅक्शन बॅटरी, तसेच या क्षेत्रातील पुनर्वापर, धुराव्यतिरिक्त सूक्ष्म कणांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण (-'टायर विअर'/ 'ब्रेक विअर' प्रदूषण ) अशा विविध गोष्टींवर नजिकच्या भविष्यात संशोधन केले जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link