Next
७० वर्षानंतर दुर्गम बुलूमगव्हाणमध्ये प्रगतीचा प्रकाश
प्रेस रिलीज
Wednesday, April 18 | 01:57 PM
15 0 0
Share this storyअमरावती : ‘आज मेळघाटातील दुर्गम बुलूमगव्हाण येथे स्वातंत्र्यानंतर वीज पोहोचणे हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ग्रामविकास परिवर्तन अभियानामुळे शक्य झाले. आता बुलूमगव्हाणमधून तरूण-तरूणी उच्चशिक्षित झाले पाहिजे. २०२२ पर्यंत मेळघाटातील प्रत्येक आदिवासी शिक्षित करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे,’ असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.

बुलूमगव्हाण या दुर्गम गावात विकास कामांचा शुभारंभ करताना उद्घाटक म्हणून उपस्थितांना ते संबोधित करीत होते. धारणीपासून २५ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलाने वेढलेल्या दुर्गम बुलूमगव्हाण या आदिवासीबहुल गावात ७० वर्षानंतर वीज पोहोचली. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमाचे ग्राम परिवर्तक आनंद जोशी या २३ वर्षीय तरूणाने अपार कष्ट करून आदिवासी परिवाराच्या आयुष्यात वीजेचा लखलखाट करून दिला.

बुलूमगव्हाण येथे एसटी बस सेवेचा शुभारंभ करताना मान्यवर.१३ एप्रिल रोजी पालकमंत्री पोटे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात वीज पुरवठ्याचे व बुलूमगव्हाण ते धारणी या एसटी बस फेरीचा शुभारंभ केला. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, एसडीएम विजय राठोड, सरपंच गोविंद कासदेकर, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गहेरवार, पंचायत समिती उपसभापती जगदीश हेगडे, ग्रामसेविका व्ही. व्ही. घवळे, पाणी फाउंडेशनचे सोशल मास्टर ट्रेनर प्रमोद निपाणे, गिता बेलपत्रे, नागोलाल पटोरकर, रामेश्वर धांडे, धारणी ‘एमएसईबी’चे उपकार्यकारी अभियंता विनय तायडे, आशिष कुंभलेकर एसडीओ मोर्शी यांची उपस्थिती होती.

देशाला स्वातंत्र्य मिळाले, तरी देखील हे गाव इतके वर्ष वीज नसल्यामुळे सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत अंधारात असायचे. गावातील १०५ कुटुंबासाठी आशेचा किरण ठरले ते म्हणजे मुख्यमंत्री ग्राम विकास परिवर्तक आनंद जोशी. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जोशी यांची बुलूमगव्हाणमध्ये ग्राम परिवर्तक म्हणून नियुक्ती करण्यात आली. गावातील मुलभूत, तसेच पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण केल्यानंतर गावकऱ्यांच्या गंभीर समस्या त्यांनी समजून घेतल्या.

बुलूमगव्हाणमध्ये वीज आणणे व धारणीसोबत दळणवळणाची सोय करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या साथीने गेल्या दहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केल्यानंतर प्रधानमंत्री मोदींच्या सहज बिजली घर घर योजना म्हणजेच सौभाग्य योजनेच्या मदतीने बुलूमगव्हाणमध्ये वीज पोहोचली, तर एसटी बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीची सोय करून विकासाचे पहिले पाऊल या गावी पडले.

या विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पोटे-पाटील व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत संपूर्ण जिल्हा प्रशासन बुलूमगव्हाण येथे आल्यावर समस्त गावकऱ्यांनी लोकनृत्य सादर करून अतिथींचे स्वागत केले. निवेदक प्रमोद निपाने यांच्या आवाहनावरून समस्त गावकऱ्यांनी ‘फुलं-फुलं-फुलं’ असे शब्दरूपी एकसुरात स्वागत केले. या प्रसंगी पालकमंत्री पोटे-पाटील यांनी ग्राम परिवर्तक जोशी यांच्या जिद्दीचे व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे जाहीर कौतुक केले.

बुलूमगव्हाणमध्ये मान्यवरांचे लोकनृत्य सादर करून स्वागत करताना ग्रामस्थ.‘ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत (व्हीएसटीएफ) धारणी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमधील २८ गावांची निवड मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या गावात परिवर्तनाचे, विकासाचे पाऊल पुढे पडत आहे. नागरिकांना मूलभूत सेवा देण्याचा शासनाचा निर्धार आहे. ‘व्हीएसटीएफ’च्या गावात ‘सीएमआरडीएफ’च्या (फेलो) माध्यमातून गावातील समस्यांची जाणीव करून घेतली जाते. समस्यांचे निराकरण करणे या योजनेचे वैशिष्ट आहे,’ असे मत जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी या वेळी मांडले.

‘महाराष्ट्रातून ‘व्हीएसटीएफ’अंतर्गत एक हजार गावांची निवड करण्यात आली असून, पहिल्या फेजमध्ये अमरावती जिल्ह्याची निवड झाली. त्यामध्ये बुलूमगव्हाणमध्ये वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आम्ही मेळघाटच्या समस्या घेऊन जातो तेव्हा ते कसेही करून मेळघाटच्या समस्या सोडवा व विकासाला प्राधान्य देण्याचे आदेश देतात. धारणी व चिखलदरातील १००-१०० गावे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत आहेत. गावकऱ्यांनी या स्पर्धेत स्वस्फूर्तीने उतरून कामे करायला पाहिजे. त्याशिवाय पाणी टंचाई दूर होऊ शकणार नाही,’ असेही जिल्हाधिकारी बांगर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद निपाणे यांनी केले. एसडीओ विजय राठोड यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link