Next
ब्रेस्ट कॅन्सर जागृतीची ‘गिनीज’मध्ये नोंद
प्रेस रिलीज
Thursday, February 15 | 02:41 PM
15 0 0
Share this storyपुणे :
दोन हजारपेक्षा जास्त महिलांनी एका छताखाली येऊन स्तनाच्या कर्करोगाविषयी समजून घेणे आणि सलग सहा मिनिटे स्तनाच्या कर्करोगाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाचे नेलपॉलिश बोटांना लावण्याचा विश्वविक्रम नुकताच झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या जनजागृती कार्यक्रमाची नोंद झाली आहे. एक हजार ९५६ महिलांनी नेलपॉलिश लावून, तर एक हजार ९१९ महिलांनी ब्रेस्ट कॅन्सरवरील मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतले.

पुण्यातील ओपन युअर आईज (ओवायई) फाउंडेशनतर्फे प्रशांती कॅन्सर केअर मिशन आणि पॉलिकॅब केबल्स यांच्या सहयोगाने नुकताच येरवडा येथील डेक्कन महाविद्यालयाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षण अधिकारी लुसिया सिनीगॅग्लियसी यांनी या दोन्हीही विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ‘ओवायई’च्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. या प्रसंगी प्रशांती कॅन्सर सेंटरच्या लालेह बुशेरी, फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सिमरन जेठवानी, आंतरराष्ट्रीय संचालिका लीला पुनावाला, उपाध्यक्षा जानकी मल्होत्रा, सचिव रेश्मा सराफ, सहसचिव लतिका साकला, खजिनदार श्वेता पाटील, सपना छाजेड आदी उपस्थित होते.

सिमरन जेठवानी म्हणाल्या, ‘स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती होतानाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विश्वविक्रम झाले आहेत. ही बाब आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंददायी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि छोट्या छोट्या गटातून महिला यामध्ये सहभागी झाल्या. दोन हजारपेक्षा अधिक महिला यात सहभागी झाल्या. जगप्रसिद्ध स्तनकर्करोगतज्ज्ञ डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगले आणि उपयुक्त मार्गदर्शन केले.’

लुसिया सिनीगॅग्लियसी म्हणाल्या, ‘जवळपास दोन हजार महिलांनी एकाचवेळी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जाणून घेत जागृती केली, असा उपक्रम जगभरात पहिल्यांदाच झाला आहे. भारतीयांनी आणि त्यातही पुणेकरांनी हा विक्रम घडवून आणला. या महिला अतिशय उत्सुकपणे आणि लक्ष देऊन सगळे समजून घेत होत्या. प्रत्येक गोष्ट मन लावून करत होत्या, हे पाहून आनंद वाटला.’

डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर म्हणाले, ‘स्तनाचा कर्करोग हा पूर्णपणे बरा होणारा आहे. वेळीच तपासण्या केल्या आणि योग्य उपचार केले, तर या आजारातून आपली सुटका होऊ शकते. या आजाराचे निदान झाल्यास घाबरून किंवा नैराश्यात न जात योग्य उपचार घ्यावेत; तसेच तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. घरातल्या इतर मंडळींनी अशा व्यक्तींना आधार दिला, तर त्यातून लवकर बाहेर पडणे सोयीचे होते.’

कर्करोगातून बर्‍या झालेल्या पाच महिलांचे अनुभव ऐकताना अनेकींचे चेहरे भावूक झाले. या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांना प्रशांती कॅन्सर केअर सेंटरमध्ये जाऊन मेमोग्राफी व इतर तपासण्या करता येणार आहेत, तसेच ‘ओवायई’ फाउंडेशनकडून सहभाग प्रमाणपत्र, अ‍ॅप्रन, बिल्ला, नेलपेंट, रिबन आदी गोष्टी देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये सुरेश जेठवानी, भरत चव्हाण पाटील, आनंद छाजेड, रविराज साकला, विनोद रोहानी यांनी मेहनत घेतली. वेळ निरीक्षणाचे काम शिवाजी माने व वैभव खरे यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link