Next
‘विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने केलेल्या कामामुळे मी भाजपमध्ये’
पक्षप्रवेशानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका
BOI
Wednesday, March 20, 2019 | 05:36 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विकासाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या कामामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे,’ असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्यातील युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी (२० मार्च) मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाषबापू पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शहाजी पवार या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते-पाटील घराण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील तरुण उमदा नेता भाजपमध्ये सहभागी झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या पक्षप्रवेशामुळे मोहिते-पाटील घराणे भाजपशी जोडले गेले आहे. राज्यातील अनेक राजकीय पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असून, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे.’

ते म्हणाले, ‘विजयसिंह मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना मांडली. विजयदादांना श्रेय मिळू नये यासाठी जुन्या सरकारमधील काहींनी ती होऊ दिली नाही. भाजप सरकारने मात्र गेल्या पाच वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मोठ्या सिंचन योजनांना निधी दिला आहे व कामाला गती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी गेल्या पाच वर्षांत दिलेला निधी हा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पूर्ण बहुमताचे सरकार या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर येईल. पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये माढ्याचा भाजपचा खासदार असेल,’ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्ष राज्यात बळकट झाला आहे. भाजपमध्ये अनेक नवे कार्यकर्ते जोडले गेले आहेत. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती अशा सर्वच निवडणुकांत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजप पूर्ण बहुमत मिळवेल. राज्यात ४८ पैकी किमान ४५ जागा भाजप-शिवसेना महायुती जिंकेल.’

रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गट-तट, पक्ष बाजूला ठेवून विकासकामांवर भर दिला. माढा मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे, रस्ते, पाणीपुरवठा, पासपोर्ट कार्यालय असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. समाजातील तळागाळातील माणसाला लाभ देण्यासाठी भाजप सत्तेचा वापर करत असल्याने मी या पक्षात प्रवेश करत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search