Next
सैबेरियातील रहस्यमय महास्फोट
११० वर्षे लोटूनही न उलगडलेले कोडे
BOI
Sunday, September 09, 2018 | 12:45 PM
15 0 1
Share this article:

सैबेरियाच्या खूप आतल्या मध्य भागात, ३० जून १९०८ रोजी वातावरणात दिवसाउजेडी एक महास्फोट झाला. लोकांना जणू अग्नीचा प्रचंड गोळा ठिकऱ्या ठिकऱ्या होताना दिसला. तो अग्निप्रकाशाचा गोळा साधारण १६० ते ३३० फूट रुंदीचा होता. त्याच्या स्फोटामुळे जंगलाचा हजारो चौरस किलोमीटर भाग बेचिराख झाला. आठ कोटी झाडे जमीनदोस्त झाली. ११० वर्षे झाली तरी त्यामागचे रहस्य उलगडलेले नाही. ज्येष्ठ अनुवादक-लेखक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात आज लिहीत आहेत त्या महास्फोटाबद्दल... 
................
सैबेरिया हा रशियाचा एक फार मोठा प्रांत आहे. त्याला युरेशिया आणि उत्तर आशिया असेही म्हटले जाते. त्याचे क्षेत्रफळ एक कोटी ३१ लाख चौरस किलोमीटर आहे. त्याच्या पश्चियमेला उरल पर्वत, उत्तरेकडे आर्क्टिक महासागर, पूर्वेकडे पॅसिफिक महासागर आणि दक्षिणेला कझाकस्तान, मंगोलिया व चीन आहे. लोकसंख्या अंदाजे तीन कोटी ६० लाख. कडाक्याच्या थंडीसाठी (जानेवारीत उणे २५ सेल्सियस) सैबेरिया प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळात भारतात कैद्यांना जन्मठेपेसाठी अंदमानला पाठवले जायचे. रशियाचे क्रूरकर्मा नेते तिथल्या लाखो निरपराध लोकांना सैबेरियाला छळछावण्यांत रवाना करायचे. त्यात शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, शिक्षक, कलाकार या सर्वांचा समावेश असे. फारच थोडे लोक तिथून जिवंतपणे परत येऊ शकत.

सैबेरियाचा इतिहास इथे बघावयाचा नसून, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्या भागात जो प्रचंड उत्पात घडला, त्याची ही कहाणी आहे. दिवस होता ३० जून १९०८. राज्याच्या खूप आतल्या मध्य भागात, आज ज्याला क्रास्नोयार्स्क म्हणतात, पण त्या काळातील ‘पॉडकामेनया तुंगस्का’ नदीच्या वर, वातावरणात सकाळी दिवसाउजेडी एक महास्फोट झाला. लोकांना तो जणू अग्नीचा प्रचंड गोळा ठिकऱ्या ठिकऱ्या होताना दिसला. काही क्षणांतच ते अनर्थनाट्य संपले; पण आता जगाचा शेवटच होणार, असे सर्वांना वाटू लागले. भोवताली सगळा दूरवर पसरलेला वन विभाग होता. तो अग्निप्रकाशाचा गोळा साधारण १६० ते ३३० फूट रुंदीचा होता. त्याच्या स्फोटामुळे जंगलाचा हजारो चौरस किलोमीटर भाग बेचिराख झाला. आठ कोटी झाडे जमीनदोस्त झाली आणि शेकडो रेनडियर प्राणी ठार झाले. धरणीकंप झाला, जवळच्या एका खेड्यामध्ये ३५ किलोमीटर अंतरावर खिडकीची तावदाने फुटली. तिथपर्यंत उष्णतेची धग पोहोचली. काही जण तर जमिनीवरून उंच उडाले.

सगळा प्रदेश अत्यंत विरळ वस्तीचा असल्यामुळे, सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. आकाशातून वेगाने काही अज्ञात गोष्ट खाली आली आणि तिचा महास्फोट झाला. त्याची तीव्रता तीन कोटी टन ‘टीएनटी’च्या स्फोटाएवढी होती, असा अंदाज नंतर शास्त्रज्ञांनी केला. हिरोशिमाच्या अणुस्फोटापेक्षा १८५ पट ऊर्जा आणि उष्णता त्यामुळे निर्माण झाली. त्या घटनेला आज ११० वर्षे होऊन गेली. परंतु तो स्फोट कशामुळे झाला याचा रहस्यभेद अद्याप झालेला नाही. अंदाज मात्र अनेक व्यक्त झाले. एखाद्या भूकंपाची नोंद जशी दूरदूरच्या देशांमध्ये होते, त्याचप्रमाणे इंग्लंडपर्यंत त्या स्फोटाच्या लहरी जाऊन पोहोचल्या होत्या. वर्षाचे आठ महिने बर्फात लपेटलेल्या त्या प्रदेशात घडलेल्या निसर्गाच्या प्रकोपाची इतर जगाला मात्र कल्पनाही आली नाही.

झाडांचा विध्वंसत्यातल्या त्यात जवळच्या प्रादेशिक वृत्तपत्रात एका बातमीदाराने लिहिले : ‘आकाशातून एक भयाण अतिविशाल अग्नीचा गोळा अचानक सकाळच्या वेळी धरतीवर येऊन कोसळला. प्रचंड वेगामुळे त्याची व्याप्ती किंवा आकार कळणे अशक्य होते... आजूबाजूच्या खेड्यांमधील लोकांना मात्र क्षितिजावर एक प्रचंड उडता गोळा दिसला. त्याच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या, की आकाशाचे दोन विभाग झाल्यासारखे वाटले.’ स्फोटाचा आवाज भयावह होता आणि जमिनीला मोठ्या भूकंपाप्रमाणे हादरे बसले. ‘लोकांना असे वाटले, की पृथ्वी दुभंगली असून, त्यात सर्व काही गडप होणार! त्याचे कारण कळू न शकल्यामुळे, देवाच्या कोपासारख्या अंधश्रद्धायुक्त गोष्टी सगळीकडे पसरल्या,’ असा बातमीचा शेवट होता. जगातील दाट वस्तीच्या कुठल्याही भागात हा अनर्थ घडला नाही, हे सुदैव! कोसळलेल्या झाडाखाली सापडून एका धनगराचा मृत्यू झाला, एवढीच माहिती मिळाली. प्राण्यांचा विनाश मात्र मोठ्या प्रमाणात झाला. इतक्या भयानक, शतकानुशतकात क्वचितच घडणाऱ्या घटनेवर हॉलिवूडने एखादा ‘अरिष्टपट’ कसा काढला नाही, ही आश्चपर्याची गोष्ट आहे.

पुढील १२ वर्षे तरी त्या दूरवरच्या जागेचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी एकही पथक तिकडे गेले नाही. सन १९२१मध्ये सेंट पीटर्सबर्ग संग्रहालयाचे संचालक लिओनिड कुलिक यांनी तिकडे पहिली मोहीम काढली. उल्का आणि लघुग्रहांवर त्यांचा अभ्यास होता. सैबेरियातील प्रतिकूल हवामानामुळे ते प्रत्यक्ष जागेवर पोहोचू शकलेच नाहीत. पुढे १९२९मध्ये त्यांची मोहीम यशस्वी झाली. त्या वेळी त्यांनी अनेक छायाचित्रे घेतली; लोकांच्या मुलाखती घेतल्या. ते काम अवघड होते. कारण प्रत्यक्षदर्शी लोक मोकळेपणाने बोलायला तयार नव्हते. दैवी प्रकोपाशिवाय अशा घटना घडूच शकत नाहीत, अशी लोकांची समजूत होती. त्याशिवाय लाखो झाडे आणि निरपराध प्राणी नष्ट कसे होतील?

परंतु ज्या जागी ती दुर्घटना घडली - सुमारे २१०० चौरस किलोमीटरचा भूभाग - तोच बोलका होता. जमिनीवर कोसळलेल्या अगणित वृक्षांचे भौमितिक आकृतिबंध बनले होते. उल्का वर्षाव किंवा विवरांचे कोणतेही चिन्ह मात्र तिथे दिसत नव्हते. पुढे वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ आणि विचारवंतांची अनेक स्पष्टीकरणे पुढे येत राहिली. परंतु ती समाधानकारक नव्हती. जळती उल्का जमिनीवर कोसळली आणि पृथ्वीने तिला गिळून टाकले; उडत्या तबकडीचा हल्ला; किंवा एका छोट्या कृष्णविवराचा प्रवेश इत्यादी इत्यादी.

‘तेजाचा गोळा’ ज्या दिवशी कोसळला, त्याच दिवसापासून पुढे अनेक रात्री उत्तर गोलार्धात ‘उजळल्या’ होत्या. सैबेरियापासून चार हजार किलोमीटरवर रशियातील एका छायाचित्रकाराच्या लक्षात आले, की मध्यरात्रीसुद्धा तो ‘फ्लॅश’शिवाय फोटो काढू शकत होता. दुसऱ्या एकाने सांगितले, की ‘मी पहाटे सव्वा वाजता झोपेतून उठलो, तर बाहेर इतका प्रकाश होता, की मी त्या आतल्या खोलीत पुस्तक स्पष्टपणे वाचू शकत होतो. पावणेदोन वाजता सगळं आकाश गुलाबी रंगाचं झालं.’ दोन महिने असेच रात्रीचे ‘दिवस’ होणे चालू राहिले. परंतु त्याचा संबंध कोणीही त्या ‘तेजाच्या गोळ्या’शी जोडला नाही. नंतर सन १९३०मध्ये एका ब्रिटिश हवामानतज्ज्ञाने असा निष्कर्ष काढला, की तुंगस्काच्या स्फोटात जी लाखो टन धूळ आकाशात उडाली आणि सगळीकडे पसरली त्यांनी सूर्यप्रकाश साठवून, रात्रीच्या वेळी तो परावर्तित केला. रात्री उजळण्याचे कारण असे होते.

कुलिक या शास्त्रज्ञाने १९२७नंतर जेव्हा पुन्हा संशोधन सुरू केले, तेव्हा त्याच्या लक्षात आले, की अण्वस्त्र टाकल्याप्रमाणे उद्ध्वस्त झालेला सर्व भूभाग जळून जमीनदोस्त झाला होता. अडीच-तीन फुटी बुंधा असलेली सर्व झाडे उन्मळून पडली आणि आगकाड्यांप्रमाणे चिरली गेली. फक्त त्यांचा जमिनीखालील भाग टिकून राहिला होता. त्याने बराच काळ शोध घेतला; पण त्या विनाशाचे समाधानकारक कारण त्याला सांगता आले नाही. आकाशातून उल्का वगैरे तर मुळीच कोसळली नव्हती. तसला काहीच पुरावा आढळला नाही. निरनिराळे सिद्धांत (कल्पनाविलास) नंतर पुढे येत राहिले.

‘पार्टिकल फिजिक्स’च्या (कण भौतिकी) शास्त्रज्ञांनी अजून एक विलक्षण स्पष्टीकरण दिले. विश्वाुत जशी अनेक द्रव्ये (वस्तू - Matter) अस्तित्वात असतात, तशी प्रतिद्रव्येदेखील (Antimatter) असतात. उदाहरणार्थ, कार्बन हे मूलद्रव्य घ्या. त्याच कार्बनचे विशाल विश्वा्त कुठेतरी मूलप्रतिद्रव्य असते. जणू आरशातील प्रतिबिंबच. त्यांचा विद्युतभार मात्र वेगवेगळा (धन आणि ऋण) असतो. असे दोन विरुद्धधर्मी कण एकत्र आले, तर स्फोट होऊन प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. तशाच प्रकारचा महास्फोट सैबेरियात झाला असला पाहिजे (ही शक्यता).

आणखी एक मान्यता देण्यासारखे स्पष्टीकरण म्हणजे, पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या एका धूमकेतूचे ‘मस्तक’ इथल्या वातावरणात शिरताना घर्षण होऊन स्फोट झाला आणि प्रचंड उष्णता निर्माण झाली. तशीच शक्यता म्हणजे एखादी उल्का किंवा लघुग्रहाचा तुकडा पृथ्वीपासून एक-दोन किलोमीटर उंचीवर आला आणि वातावरणाशी घर्षण झाल्यामुळे तो पूर्णपणे नष्ट झाला. स्फोट आणि उष्णता हे त्याचेच परिणाम. पृथ्वीवर मात्र त्याचे काहीच अवशेष मिळू शकले नाहीत. बाहेरून, अंतराळातून काहीतरी अज्ञात वस्तू इथे येऊन कोसळली, यावर सगळ्यांचे एकमत आहे. शास्त्रज्ञांनी बांधलेला एक अंदाज म्हणजे त्या स्फोटकाचे वस्तुमान (वजन) ७० लाख टन असावे. अबब!

कदाचित त्या रहस्याचा कधीच उलगडा होणार नाही; पण आपल्याला त्यावर विचार करणे भाग आहे. कालौघात अशा घटना पुराणकाळी घडल्याही असतील. यापुढेही घडू शकतील. लाखो वर्षांपूर्वी डायनासॉर नष्ट झाले ते अशाच काही महाउत्पातामुळे. पूर्वकल्पना नसताना कोसळणाऱ्या संकटांपासून आपले रक्षण कसे होणार? ते आपल्या हाती नाही. अरिष्टोत्तर मदतकार्य आपण करू शकतो. सैबेरियासारख्या घटनांचा शास्त्रीय अभ्यास तेवढ्यासाठीच करायचा असतो. त्याच्या आधारे मानवाला कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध राहता येते. अंतरिक्ष संशोधन आता खूप प्रगत झाले आहे. ग्रहगोल, त्यांची गती, अवकाशात भरकटणाऱ्या वस्तू यांच्या सूक्ष्म नोंदी आणि अभ्यास होत असतो. त्यामुळे बाहेरून एखादी गोष्ट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असेल, तर त्याची पूर्वकल्पना आणि त्यावरची उपाययोजना आता आवाक्यात आली आहे.

अण्वस्त्र हल्ल्यासारखी मानवनिर्मित संकटे मात्र आपण प्रयत्नपूर्वक रोखली पाहिजेत.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 16 Days ago
How does it compare with the explosion of Vesuvius ? That of Krakatoa ?
0
0

Select Language
Share Link
 
Search