Next
डाऊन सिंड्रोमविषयक आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यात
प्रेस रिलीज
Wednesday, May 30, 2018 | 02:29 PM
15 0 0
Share this story

डॉ. सुरेखा रामचंद्रन
पुणे : ‘डाऊन सिंड्रोम हा जनुकीय विकार असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रेरणादायी ठरलेल्या ‘डाऊन सिंड्रोम फेडरेशन ऑफ इंडिया’ (डीएसएफआय) या संस्थेची दुसरी आंतरराष्ट्रीय डाऊन सिंड्रोम परिषद पुण्यात होणार आहे. येत्या ३१ मे ते २ जून या कालावधीत ‘द कोरिंथिअन्स रीसॉर्ट अँड क्लब’ येथे ही परिषद घेतली जाणार असून, डाऊन सिंड्रोमविषयी जनजागृती करणे आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे असा या परिषदेचा प्रमुख हेतू आहे’, अशी माहिती ‘डीएसएफआय’ संस्थेच्या संस्थापिका डॉ. सुरेखा रामचंद्रन यांनी दिली. या परिषदेच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ‘अॅक्टिव्हिटी रुम’च्या समन्वयक तेहनाझ रागी, श्वेता रांका या वेळी उपस्थित होत्या. 

‘या परिषदेत पुण्यातील डॉ. वामन खाडिलकर, डॉ. राजीव शारंगपाणी, डॉ. अर्चना कदम, डॉ. रंजन जोशी, डॉ. कौमुदी गोडबोले, डॉ. उषा प्रताप यांच्यासह इतरही तज्ज्ञ डॉक्टर डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींच्या पालकांशी संवाद साधणार आहेत. डाऊन सिंड्रोमविषयी काम करणाऱ्या सर्व मंडळींना एकत्र आणणे, अनुभवांच्या देवाणघेवाणीतून या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल कसा घडवता येईल याविषयी विचार करणे आणि डाऊन सिंड्रोम असलेल्यांना प्रगतीसाठी सहाय्यभूत ठरणारे कायदे आणण्यासाठी सरकारकडे मागणी करणे यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. पुण्यातील डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांची ३० कुटुंबे या परिषदेत भाग घेणार आहेत; तसेच १८२ पालक, डाऊन सिंड्रोम असलेली ८९ मुले व त्यांच्या भावंडांसह उपस्थित राहणार आहेत’, अशी माहिती श्वेता रांका यांनी दिली.

या वेळी बोलताना सुरेखा रामचंद्रन म्हणाल्या, ‘देशात दरवर्षी जन्मास येणाऱ्या डाऊन सिंड्रोम असलेल्या बाळांची संख्या जवळपास तीस हजार इतकी आहे. डाऊन सिंड्रोम हा आजार नव्हे, तर जनुकीय रचनेशी संबंधित अशी एक प्रकारची ‘मेडिकल कंडिशन’ आहे. डाऊन सिंड्रोम असलेली मुले ‘मेंटली रीटार्डेड’ असल्याचा सार्वत्रिक समजही तितकाच चुकीचा आहे. आम्ही ‘डीएसएफआय’ संस्थेच्या माध्यमातून सातत्याने पालकांशी बोलत असतो. जोडप्यांच्या दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा त्यांना होणाऱ्या बाळाच्या आरोग्याशी संबंध असतो, ही बाब त्यातून समोर आली. हल्ली आपण दररोज विविध प्रकारच्या किरणोत्सर्गास सामोरे जातो. त्याचा जनुकीय विकारांशी कसा संबंध आहे, तसेच देशाच्या विशिष्ट भागात अथवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासारख्या विशिष्ट प्रकारच्या व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींच्या बालकांमध्ये डाऊन सिंड्रोमसारखे जनुकीय विकार अधिक प्रमाणात आढळतात का, हे जाणून घेण्यासाठी सखोल संशोधन करण्याची आवश्यकता आहे.’  

‘डाऊन सिंड्रोम हा एक जनुकीय व जन्मजात विकार आहे. जागतिक स्तरावर दर आठशे जिवंत जन्मांपैकी एका बाळाला डाऊन सिंड्रोम असतो. या विकारासह जन्मास येणाऱ्या बाळास सर्वांगीण विकासाच्या मार्गात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या मुलांना शिक्षण घेण्यातील सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या समस्येसह (लर्निंग डिसअबिलिटी), हृदय वा पचनसंस्थेतील दोष किंवा इतरही विविध आरोग्य समस्या असू शकतात. विशिष्ट वैद्यकीय तपासण्यांमधून बाळाच्या जन्मापूर्वीही या विकाराचे निदान होऊ शकते’, असेही त्यांनी नमूद केले. 

(ही बातमी इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link