Next
अश्विनी करतेय ‘मेन्स्ट्रुअल कप’बद्दल जागृती
निसर्ग आणि स्त्रियांचे आरोग्य जपण्यासाठी उपक्रम
BOI
Saturday, September 29, 2018 | 03:43 PM
15 1 0
Share this article:

अश्विनी चौमालनाशिक : महिलांकडून वापरले जाणारे सॅनिटरी नॅपकिन बहुतांशी अविघटनशील पदार्थांपासून बनविलेले असल्याने त्या कचऱ्यामुळे प्रदूषण होते. शिवाय सॅनिटरी नॅपकिन महिलांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर मेन्स्ट्रुअल कप हा सहज वापरता येण्यासारखा, कमी खर्चाचा, प्रदूषणविरहित आणि कोणताही त्रास न होणारा पर्याय आहे. त्याच्या वापराबद्दल महिलांमध्ये जागृती करण्याचे व्रत नाशिकमधील अश्विनी चौमाल या तरुणीने स्वीकारले आहे. कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सांभाळून अश्विनी शहरी आणि ग्रामीण भागात त्याबद्दलचे कार्यक्रम घेत आहे.

महिलांच्या मासिक पाळीविषयी समाजात मोकळेपणे चर्चा होत नाही. जे लोक चर्चा करतात, त्यांच्याकडे पाहून समाज नाके मुरडतो. म्हणूनच अश्विनी यांनी याबद्दल जागृती करण्याचे ठरवले. 

एक महिला १२ सॅनिटरी नॅपकिन वापरते, तेव्हा तीन किलोचा कचरा जमा होतो. एक महिला वर्षाला जवळपास ३६ ते ३८ किलो कचरा निर्माण करते. देशाच्या लोकसंख्येचा विचार करता लाखो टन कचरा गोळा होतो. वापर झालेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. तसेच सॅनिटरी नॅपकिनचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची काही उदाहरणे आहेत. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरावेत, असा सल्ला अश्विनी चौमाल महिलांना देतात. 

मेन्स्ट्रुअल कप

मेन्स्ट्रुअल कप ही संकल्पना भारतात नव्याने रुजत आहे. सिलिकॉनपासून बनवलेला हा कप वापरून झाल्यावर पुन्हा धुता येतो. याचा पुनर्वापर महिला किमान दहा वर्षे तरी करू शकतात. हा कप आरोग्यासाठी हानिकारक नाही; त्याचा पुनःपुन्हा खर्च येत नाही आणि त्यामुळे कचराही होत नाही. हे त्याचे फायदे आहेत. 

अश्विनी चौमाल शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही याबद्दल जागृती करत आहेत. महिला बचत गट, महिला मंडळे, सरकारी कार्यालये, मेळावे, शाळा, महाविद्यालये येथे त्या मार्गदर्शन करतात. 

‘महिलांमध्ये गुप्तांगाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. सॅनिटरी नॅपकिन वापरणे आरोग्यपूर्ण नाही. शिवाय सॅनिटरी नॅपकिनमध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रदूषण होते. म्हणून महिलांनी शक्यतो मेन्स्ट्रुअल कप वापरावा किंवा विशिष्ट पद्धतीचे कापड वापरावे,’ असे अश्विनी सांगतात. त्यांच्या या उपक्रमामुळे महिलांना उपयुक्त अशी माहिती मिळत आहे.

(सॅनिटरी नॅपकिनची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे यंत्र पुण्यातील मुलींनी बनवले असून, त्याची इटलीतही दखल घेतली गेली. त्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search