Next
भुला नहीं देना...
BOI
Sunday, October 21, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

खलनायक म्हणून प्रसिद्ध होण्याआधी अभिनेते अजित म्हणजेच हमीद अली खान यांनी नायक म्हणूनही अनेक चित्रपटांत चांगल्या भूमिका केल्या होत्या. आज २१ ऑक्टोबर... अजित यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आस्वाद घेऊ या अजित यांच्यावर चित्रित झालेल्या ‘भुला नहीं देना’ या गीताचा...
.............
ऑक्टोबर महिना हा अमिताभ बच्चन यांच्या जन्माचा महिना. त्यांचा विषय निघाला, की ‘जंजीर’ हमखास आठवतो. ज्या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला ‘अँग्री यंग मॅन’ दिला तो चित्रपट. ‘जंजीर’ने फक्त एवढेच दिले?

नाही. जंजीरने हिंदी चित्रपटसृष्टीला एक पॉश, धूर्त, बेरकी, ‘कस्टमकिंग’ खलनायकही दिला. ‘जंजीर’मधील खलनायक ‘तेजा.’ अजित या अभिनेत्याने हा खलनायक साकार केला होता. २१ ऑक्टोबर हा ‘अजित’चा स्मृतिदिन. १९९८मध्ये त्याचे निधन झाले. खलनायकाच्या अनेक भूमिका मागे ठेवून तो या दुनियेतून निघून गेला. हे वाक्य खूप अपुरे आहे. कारण अजित चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून प्रसिद्ध होण्याआधी नायकही होता. 

मर्दानी, देखणे व्यक्तिमत्त्व अजितला लाभले होते. रांगडा अजित त्या काळातील ‘हिरों’च्या चेहऱ्याच्या जवळपास फिरकणारा चेहरा घेऊन आला नसला, तरी तो हिरो म्हणून पडद्यावर येत राहिला आणि हिरो म्हणून कुठे खटकलाही नाही. 

‘हातिमताई’ चित्रपटात तो नायक म्हणून प्रथम पडद्यावर आला. १९४७ हे ते वर्ष होते. वनमाला त्याची नायिका होती. चित्रपटाच्या नामावलीत आपल्याला ‘अजित’ हे नाव दिसत नाही, तर तेथे ‘हमीद’ असा उल्लेख आढळतो. हमीद अली खान हे अजितचे मूळ नाव.

या चित्रपटानंतर ‘बेकसूर’, ‘सम्राट’, ‘मेहरबानी’, ‘बडा भाई’ असे त्याचे चित्रपट येत राहिले. त्यामध्ये तो कधी मधुबालाचा नायक होता, तर कधी कामिनी कौशलचा. बिना रॉय, निम्मी, गीता बाली, मीनाकुमारी अशा त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर त्याने नायकाची भूमिका केली. 

...पण चित्रपटाचा नायक म्हणून त्याचा जेवढा प्रभाव पडला नाही, तेवढा प्रभाव दुय्यम भूमिकेत पडला. ‘नया दौर’मधील ‘किशन’ स्मरणीय बनला. आश्चर्य म्हणजे दिलीपकुमारसारखा अभिनयसम्राट पुढे असताना तो डगमगला नाही. आणि हेच दोघे ‘मुघल-ए-आझम’मध्ये पुन्हा एकत्र आले, तेव्हा अजितने साकार केलेला कडवा राजपूत ‘राजपूत जान हारते है, वचन नहीं’ या संवादासह लक्षात राहिला होता. 

मध्यंतरी ‘बाजीराव’ चित्रपटाचे वादळ झाले; पण त्या चित्रपटाच्या खूप आधी बाजीराव-मस्तानीच्या कथानकावर एक चित्रपट निर्माण होऊ घातला होता. त्यामधून अजित आपल्यापुढे ‘बाजीराव’ म्हणून आला असता; पण दुर्दैवाने तो चित्रपट पूर्ण झाला नाही. 

दुय्यम भूमिकेत शिरल्यानंतर अजित तसा मागे पडत चालला असतानाच राजेंद्रकुमार- वैजयंतीमालाच्या ‘सूरज’ चित्रपटातून तो खलनायक म्हणून पुढे आला. परंतु त्या चित्रपटातून खलनायक म्हणून त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यासाठी १९७२-७३ हे वर्ष उजाडावे लागले. 

त्याच वर्षी ‘जंजीर’चा तेजा आला आणि अजित एकदम चर्चेत आला. नायिकेवर व तिच्या संपत्तीवर डोळा ठेवणारा खलनायक हिंदी चित्रपटसृष्टीत १९७० ते १९८०च्या दशकाने जवळजवळ लयास घालवला. स्मगलिंग करणारा, भरपूर काळा पैसा मिळवून समाजात प्रतिष्ठेने वावरणारा, धूर्त, कावेबाज व निर्दयी असा खलनायक हिंदी चित्रपटसृष्टीत उदयास आला. हा खलनायक स्वत: हाणामारी क्वचित करे. त्याच्या हाताखालील माणसे नाचवत असे. हा नवीन खलनायक अजितने नटवून थटवून पडद्यावर आणला. त्याची एक खास स्टाइल त्याने निर्माण केली. 

तो आरडाओरडा करीत नसे. आदळआपट करीत नसे. सारे काही शांत डोक्याने करी. जंजीर, यादों की बारात, जुगनू, वॉरंट, कालीचरण, खोटे सिक्के, प्रतिज्ञा, पत्थर और पायल अशा अनेक चित्रपटातून अजितने साकार केलेला खलनायक स्मरणात राहणारा होता. तो नायकाला कधी घाबरत नाही, फक्त एक घुटका गिळतो त्याच्या खास पद्धतीने! आणि जोडीला एखादे वाक्य - ‘डू यू नो मिस्टर प्रभाकर? सारा शहर मुझे लायन नाम से जानता है!’

अजितचे हे असे संवाद चित्रपटप्रेमींना खूप भावले. ‘जंजीर’मधील त्याचा ‘मोना डार्लिंग’ हा संवाद आजही स्मरणात आहे. त्याचे संवाद हा त्याच्या दुसऱ्या इनिंगचा भाग आहे; पण त्याची गाणी हा त्याच्या नायक काळातील पहिल्या इनिंगचा भागही स्मरणात राहणारा आहे. 

‘मिस बाँबे’ चित्रपटात नलिनी जयवंतचे रहमानशी लग्न झाल्यावर तिच्या बंगल्याबाहेर रस्त्यावर बसून ‘जिंदगीभर गम जुदाई का मुझे तडपाएगा...’ असे दर्दभरे गीत गाताना तो दिसतो. ‘टॉवर हाउस’मध्ये ‘मैं खुशनसीब हूँ मुझे किसी का प्यार मिला...’ हे त्याचे सुनहरे गीत आवर्जून ऐकण्यासारखे आहे. १९५६च्या ‘हलाकू’ चित्रपटातील अजितवर चित्रित झालेल्या ‘आजा के इंतजार में....’ या गाण्याची गोडी वेगळीच आहे. १९६१च्या ‘ऑपेरा हाउस’मधील ‘देखो मौसम क्या बहार है’ हे चित्रगुप्त यांनी संगीत दिलेले गीत अनेक वेळा ऐकले जाते; पण ते गीत अजितवर चित्रित झाले होते, हे खूप कमी रसिकांना माहिती आहे. 

अजितच्या अशा काही ‘सुनहऱ्या’ गीतांपैकीच एक गीत आज त्याच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण बघू या! १९५५चा के. अमरनाथ प्रॉडक्शनचा ‘बारादरी’ हा चित्रपट वेशभूषाप्रधान होता. अजित आणि गीता बाली हे त्याचे नायक-नायिका होते. या दोघांवर चित्रित झालेले, गीतकार खुमार बाराबंकवी यांनी लिहिलेले एक सुखद प्रेमगीत या चित्रपटाकरिता संगीतकार ‘नाशाद’ (नौशाद नव्हे) यांनी संगीतबद्ध केलेले होते. लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या अनेक मधुर युगलगीतांपैकी हे एक गीत आहे. 

दोन प्रेमी जीवांचा सुखद संवाद, मनाची अवस्था हे सगळे काव्यात उतरवताना गीतकार साधे-साधे शब्द वापरून गीताची सुरुवात करतो.

‘त्या’च्या प्रेमामुळे ‘ती’ आनंदी आहे; पण मानवी मन मोठे विक्षिप्त असते. सौख्याच्या काळातही मनात भविष्यातील दुःखाचा विचार येतो. तशीच अवस्था ‘त्या’ प्रेयसीची झाली आहे. त्यामुळे ती आपल्या प्रियकराला म्हणते -

जमाना खराब है दगा नहीं देना जी दगा नहीं देना

(मी तुझ्यावर एवढ्या आत्मीयतेने प्रेम करते आहे; पण हे माझ्या प्रिया मला तू) विसरून जाऊ नकोस, विसरू नकोस (असे म्हणते कारण हे) जग, ही दुनिया खराब आहे (म्हणूनच भविष्यात तू मला) दगा देऊ नकोस, मला फसवू नकोस.

प्रेयसीच्या या बोलण्यावर प्रियकराचे उत्तर काव्यात उतरवण्याऐवजी गीतकार व संगीतकारांनी एक वेगळी युक्ती केली आहे व नायकालाच याच दोन ओळी नायिकेबरोबर गायला लावल्या आहेत. ओघानेच तोही नायिकेला ‘विसरू नकोस, दगा देऊ नकोस’ असे सांगतो.

या गीतात पुढे नायिका आजुबाजूचे वातावरण आणि आपल्या मनाची स्थिती व मागणे सांगताना म्हणते -

प्यार की मस्ती छाई हुई है 
नींद सी मुझको आई हुई है 
नींद से देखो जगा नही देना

(मला तुझे प्रेम मिळाल्यामुळे, असे जाणवते आहे, की चहूकडे, आजूबाजूला सर्वत्र या) प्रेमाची धुंदी भरून राहिली आहे. (आणि ओघानेच त्यामुळे) माझ्या नेत्रांवर प्रीतीची ग्लानी आली आहे. (प्रीतीच्या सौख्यामुळे मी एक सुखद निद्राच जणू काही घेत आहे) त्या झोपेतून मला जागे करू नकोस. (माझ्यावर फक्त प्रेम करत राहा.)

या कडव्यानंतर दोघे मिळून ध्रुवपद गातात आणि आता नायक सांगतो - 

आँखों में सपने झूम रहे हैं 
गीत लबों को चूम रहे हैं 
गीतों को आहें बना नहीं देना 

(माझ्या) डोळ्यांमध्ये (तुझ्या-माझ्या प्रीतीची सुखद) स्वप्ने नाचत आहेत. (त्यामुळेच माझ्या) ओठांवर (आपल्या प्रीतीची सुखद) गीते येत आहेत. (तू मात्र मला विसरून जाऊन अगर दगा देऊन या) गीतांचे रूपांतर दुःखाच्या, विरहाच्या उसाशांत करू नकोस.

आणि अखेरच्या कडव्यात प्रीतीच्या प्राप्तीमुळे झालेली अवस्था सांगताना ‘ती’ गाते -

जिंदगी आँखें मलने लगी है 
शमा सी दिल में जलने लगी है
शमा जलाके बुझा नही देना

(मी माझे) डोळे चोळत हेच माझे जीवन आहे का.. (हे पाहत आहे. कारण तुझ्या प्रीतीने मी एवढी आनंदी झाले आहे, की हे सत्य आहे याची खात्री करावी लागत आहे.) (माझ्या) हृदयात प्रीतीची एक दीपकलिका प्रज्ज्वलित झाली आहे. (मला विसरून जाऊन अगर दगा देऊन तू) ती प्रेमाची ज्योत विझवून टाकू नकोस.

उपमा अलंकाराचा वापर करून साध्या-साध्या दोन ओळींत मांडलेले आशयपूर्ण शब्द. त्याला साजेसे ‘नाशाद’ यांचे संगीत. स्वरसम्राज्ञी आणि भूलोकीचा गंधर्व यांचे साजेसे स्वर. सारेच सुनहरे. पडद्यावर देखणी गीता बाली आणि अजित.

...आणि अभिनेता अजित सांगतो आहे, की माझ्या संवादांनी अगर माझ्यावर चित्रित झालेल्या गीतांनी मी तुमच्या स्मरणात राहीन. काळाच्या ओघात मला... ‘भुला नहीं देना...’

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search