Next
ठाण्यात प्रथमच रंगणार सोलापूर फेस्ट
१७ ते १९ मेपर्यंत खाद्यजत्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
BOI
Thursday, May 16, 2019 | 03:26 PM
15 0 0
Share this article:

ठाण्यात होत असलेल्या सोलापूर फेस्टची माहिती देताना सहकार मंत्री सुभाष देसाई व अन्य मान्यवर.

ठाणे : सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी, कडक भाकरी, लांबोटीचा चिवडा, हुग्गी (गव्हाची खीर) अशा खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत, सोलापूरी चादर, सतरंजी, हातमागावरील साड्या अशा वस्तूंची खरेदी करण्याचा आनंद ठाणेकरांना ‘सोलापूर फेस्ट २०१९’ या महोत्सवाद्वारे घेता येणार आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे ठाणेकरांच्या आग्रहाखातर येत्या १७ ते १९ मे दरम्यान ढोकाळीच्या हायलँड मैदानावर हा महोत्सव रंगणार आहे. 


विविध प्रकारच्या १५० उत्पादनांसह ३०० उद्योजक यामध्ये सहभागी होणार असल्याने ठाणेकरांना एकाच ठिकाणी अनेक उत्पादने खरेदी करण्याची आणि सोलापूरी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. सोलापुरातील विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी ‘सोलापूर फेस्ट’ चे  आयोजन केले जाते. त्यातून सोलापुरातील स्थानिक व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतोच; सोलापुरातील उत्पादनांना राज्यपातळीवर बाजारपेठही मिळते. यापूर्वी पुणे व नवी मुंबई येथील फेस्टमधून सुमारे पाच कोटींची उलाढाल झाली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासालादेखील चालना मिळते. अनेक महिला उद्योजकांना मोठी संधी मिळत असल्याने, स्थानिक पातळीवरील उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे. 

नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या सोलापूर महोत्सवात दक्षिण सोलापूर तालुक्यातील लक्ष्मी बिराजदार या महिलेने सुमारे पंधरा हजार रुपयाच्या कडक भाकरी विकल्या आणि सोलापूरच्या कडक भाकरीचे ब्रँडिंग केले. जगप्रसिद्ध सोलापूरी चादरही येथे हातोहात संपल्या. 

‘उत्पादक व ग्राहकातील दलालांची साखळी मोडून माल थेट ग्राहकांच्या हातात येत असल्याने वाजवी दरात वस्तू उपलब्ध होतात,’ असे राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सोलापूर सोशल फाउंडेशनचे आधारस्तंभ सुभाष देशमुख यांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ठाणे, नवी मुंबई,कल्याण परिसरात राहणाऱ्या सोलापूर भागातील रहिवाशांनी या फेस्टला अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.  

‘सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, भगवंत मंदिर, तुळजाभवानी मंदिर या मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृती फेस्टदरम्यान उभारल्या जाणार असून, सामूहिक अग्निहोत्र, प्रवचन, भारूड यांसह लावणीचा कार्यक्रमही होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मान्यवरांचा ‘श्रीमंती सोलापूर’ची असा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील केसर आंबा, डाळींब, बेदाणा आदी दर्जेदार फळांचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या दुष्काळी झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याला या फेस्टच्या माध्यमातून दिलासा मिळेल,’ असेही सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी नमूद केले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search