पुणे : सुमधूर गायकी आणि त्याच्या जोडीला व्हायोलीन, सतारीचे सूर यांच्या साथीने स्त्री कलाकारांनी स्वरांचा सुरेख गोफ विणून रसिक श्रोत्यांना गुंतवून टाकले. निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचातर्फे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित ‘गोफ स्वरांचा’ या कार्यक्रमाचे. डॉ. राजश्री महाजनी, माधुरी करंबेळकर, जया जोग आणि डॉ. नीलिमा राडकर या गायक-वादक स्त्री कलाकारांनी सहगायन व सहवादनाचा हा सुरेल गोफ गुंफून अविस्मरणीय अनुभूती रसिकांना दिली.
या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे भास्कर गोखले, गायिका मनीषा लताड, निनाद ग्रुपच्या पद्मावती पारेकर, चतुरंग प्रतिष्ठानच्या पुण्यातील प्रतिनिधी वरदा बिवलकर, गुलाबराव ठाकूर, निवेदिका रत्ना दहीवेलकर, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, श्रीधर कुलकर्णी, शीळवादक आप्पा कुलकर्णी, शाल्मली व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पुरिया-कल्याण रागातील ‘बहुत दिन बीते...’ या बंदिशीने झाली. यानंतर संत गोरा कुंभार चित्रपटातील ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘समचरण सुंदर कासें ल्याला पितांबर...’ या अभंगाने रसिकांची मने जिंकली. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अबीर गुलाल उधळीत रंग...’ या अभंगाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. यानंतर दुर्गा रागातील झपताल व द्रुत तीनतालातील बंदिशी डॉ. नीलिमा राडकर यांनी व्हायोलिनवर, तर जया जोग यांनी सतारीवर सादर केले. या श्रवणीय वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. यानंतर डॉ राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांनी ‘आली कुठूनशी कानी’, ‘कानडाऊ विठ्ठलू...’, ,खेळ मांडियेला’ ही भक्तीगीते सादर केली. ‘तो म्या देखियला सये’ या गवळणीवर तर रसिकांनीही ठेका धरला. ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली.
उपेंद्र सहस्रबुद्धे (हार्मोनियम), अमोल माळी (तबला), वेदश्री कानडे (टाळ) यांनी साथसंगत केली. रंजना काळे यांनी निवेदन केले.