Next
देशाच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद सेनेचे योगदान महत्त्वाचे
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे प्रतिपादन
BOI
Monday, January 07, 2019 | 10:35 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यात सामान्य नागरिक, असहकार आंदोलन, चले जाव चळवळ या सगळ्या गोष्टींचे श्रेय आहेच; पण तितकेच, किंबहुना काकणभर जास्त श्रेय सुभाषबाबूंनी उभारलेल्या आझाद हिंद सेनेच्या फौजेचे आणि सर्व सैनिकांनी इंग्रजांना टक्कर देऊन, स्वतःचे बलिदान देऊन केलेल्या संघर्षाचेही आहे. ते विसरून चालणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी (सहा जानेवारी २०१९) त्यांनी पूर्वरंगात संत रामदास स्वामी, तर उत्तररंगात सुभाषचंद्र बोसांचे कार्य उलगडले.

‘इंग्लंडचे पंतप्रधान अॅटली यांनी त्यांच्या संसदेत सांगितले होते, की आम्ही भारताला स्वातंत्र्य दिले. कारण भारताचे सैन्य आमच्याशी एकनिष्ठ राहिले नव्हते. ते बंड करून उठले होते. त्यांना डांबून राज्य करण्याएवढी आपली ताकद शिल्लक राहिली नव्हती,’ याचे स्मरण चारुदत्त आफळेबुवांनी करून दिले.  

‘सुभाषबाबू आणि सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये तीन-चार विलक्षण साम्यस्थळे होती. सावरकरांप्रमाणेच सुभाषबाबूही इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊन सनद न घेता भारतात परतले. ते आयसीएस झाले होते. त्यांना कलेक्टरची, भरपूर पगाराची नोकरी सहज मिळू शकली असती. कारण ते इंग्लंडमधील विद्यापीठात पहिल्या पाच क्रमांकांत उत्तीर्ण झाले होते; पण ‘दारिद्र्यात मेलो तरी चालेल; पण शत्रूची सेवा करणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. तेव्हा त्यांना लोकांनी वेड्यात काढले होते. ‘दूसरा गधा मिल गया’ अशी प्रतिक्रिया तिथल्या लोकांकडून ऐकायला मिळाली होती. ‘पहला गधा कौन था’ असे विचारल्यावर त्यांना ‘सावरकर’ असे उत्तर मिळाले आणि इंग्रजांची चाकरी न केल्यामुळे सध्या ते अंदमानात काथ्या कुटत आहेत, असे कळले होते; पण तरीही सुभाषबाबूंनी आपला निर्धार सोडला नाही. १९२१ला ते सक्रिय राजकारणात आले. आपल्या कार्याची सुरुवात त्यांनी लोकमान्यांचा स्मृतिदिन साजरा करून केली. तसेच, सावरकरांप्रमाणेच परदेशी कपड्यांची होळी करूनच त्यांच्या कामाची सुरुवात धाली. सावरकरांप्रमाणेच सुभाषबाबूही अत्यंत कडवे, धर्माचारी आणि शस्त्राचारी होते,’ अशा शब्दांत या दोन नेत्यांमधील काही साम्यस्थळे आफळेबुवांनी मांडली.

‘सुभाषबाबू राजकारणातील पायऱ्या चढत गेले. १९२१ला सुरुवात करून १९२७पर्यंत त्यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण झाला होता. आधी बंगाल प्रांतिक काँग्रेसचे प्रमुख, कलकत्त्याचे महापौर, राष्ट्रीय सरचिटणीस आणि नंतर काँग्रेसचे तीन वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सायमन कमिशन आल्यानंतर त्यांनी काँग्रेसजनांना आंदोलन करण्याची परवानगी दिली आणि देशात सुमारे १०० ठिकाणी निदर्शने झाली. त्यांचा दबदबा खूप वाढला होता. गंभीर आजारामुळे बोस परदेशात उपचारांसाठी गेले असता, तिथे जर्मनचा हुकुमशहा हिटलरचा दूत त्यांना भेटायला गेला होता. ‘इंग्लंडशी युद्ध केले, तर भारतीय शस्त्रे उचलतील का,’ असे हिटलरतर्फे विचारण्यात आले होते. त्याला बोस यांनी होकार दिला होता. जर्मनीने भारतात जहाजभरून शस्त्रास्त्रे पाठवलीही होती; मात्र काही कारणामुळे ती उतरवून घेणे शक्य झाले नव्हते. तरीही सुभाषबाबूंचा महिमा सगळ्यांना कळला होता. इंग्लंडवर फ्रान्स, जपान, जर्मनी हे आक्रमण करणारच होते. या संधीचा उपयोग आपणही ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, असे बोस यांचे मत होते; मात्र अडचणींचा फायदा घेणे योग्य नाही, अशी महात्माजींची विचारधारा होती,’ असे आफळेबुवांनी सांगितले.

‘ब्रिटिशांची स्मारके उखडून टाकू, अशी घोषणा बोस यांनी केली. १९४०मध्ये बोस व सावरकर यांची भेट झाली. त्या वेळी सावकरांनी फ्रान्स, जपान, जर्मनी यांचे साह्य घेण्याची कल्पना सुचवली. देशासाठी लढणाऱ्या चांगल्या सेनापतीची गरज आहे. त्यामुळे बोसांनी परदेशात जाऊन फौजा उभाराव्यात, असे सुचविले. जपानमधून रासबिहारी बोस सावरकरांना पत्र पाठवायचे. रासबिहारी बुद्धविहारात जाऊन तिथले ग्रंथ विकत घ्यायचे. त्याच्या पुठ्ठ्याच्या आतमध्ये चिठ्ठी ठेवायचे व ते ग्रंथ दादरच्या बौद्धविहाराला भेट म्हणून पाठवायचे. अशा प्रकारे परदेशात होत असलेल्या पत्रव्यवहाराची माहिती सावरकरांनी सुभाषबाबूंना दिली; मात्र नंतर बोसांच्या घोषणेमुळे त्यांना ब्रिटिशांनी लवकरच अटक केली. नंतर ते स्थानबद्धतेत होते,’ असे बुवांनी सांगितले.

‘स्थानबद्धतेत बोस कोणाशीही बोलत नव्हते. दाराच्या पडद्याखालून त्यांना जेवणाचे ताट दिले जायचे. ते रिकामे परत यायचे. याच काळात बोस यांनी तिथे दुसरा माणूस ठेवला. त्याचे नाव अद्याप उजेडात आलेले नाही; पण त्याने प्राणाची बाजी लावली. तिथून तुरी देऊन निघाल्यावर दहा दिवसांतच ते काबूल, रशिया व पुढे जर्मनीत गेले. भारतीय सैन्य जर्मनी, जपानमध्ये लढण्यासाठी गेले व ठरल्याप्रमाणे त्यांनी शरणागती पत्करली. त्या सैन्याला त्या त्या देशांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यातूनच बोस यांची ५० हजारांची आझाद हिंद सेना जर्मनी आणि जपानमध्ये तयार झाली. महायुद्ध सुरू असल्याने प्रवास कसा करायचा हा प्रश्न बोस यांच्यासमोर होता. त्यांनी पाणबुडीत बसून जर्मनी ते जपान हे अंतर तीन महिने प्रवास करून, मोठी जोखीम घेऊन पार केले. या काळात काँग्रेसने ‘चले जाव’ आंदोलन जाहीर केले. ब्रिटिशांनी गांधींना आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले. १९४४पर्यंत वातावरण पेटते राहिले. दरम्यान, बोस यांनी अंदमानात भारतीय ध्वज फडकावला व तेथील बेटांना शहीद व स्वराज्य बेट अशी नावे दिली. त्यानंतर बोस यांचा स्वातंत्र्ययुद्धाच्या मोक्याच्या क्षणी दुर्दैवी मृत्यू झाला; पण तरीही त्यांच्या आझाद हिंद सेनेचे कार्य विसरता येत नाही,’ अशा शब्दांत बुवांनी हा इतिहास उलगडला. 

रामदास स्वामींचे कार्य
पूर्वरंगात बुवांनी संत रामदास स्वामींच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. ‘रूप पाहता लोचनी’ हा अभंग त्यांनी निरूपणासाठी घेतला होता. ‘रामदास स्वामींनी १० वर्षांत भारतभर ११०० मठांची स्थापना केली. त्यात ११ लाख सेवेकरी काम करू लागले. आज यातील १०० मठ सुरू आहेत. ‘चिंता करतो विश्वाचि’ असा विचार स्वामी लहानपणी करत होते. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत आपली क्षमता कमी झाल्यामुळेच आपण लांबचे पाहू शकत नाही. योग्य वेळी प्रत्युत्तर येत नाही, म्हणून दुर्जन माजतात. म्हणून उपासनेची गरज आहे,’ असे बुवा म्हणाले.

‘रामदास स्वामींनी नाशिक येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर भारतभ्रमण केले व नंतर महाराष्ट्रात कार्य सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभे करायला स्वामींच्या सेवेकऱ्यांचीही मदत झाली. त्यामुळेच महाराजांनी त्यांना परळीचा किल्ला म्हणजेच सज्जनगड दिला. त्यांनी ठिकठिकाणी श्रीराम, हनुमंताचे उत्सव सुरू केले. सेवेकऱ्यांनी राष्ट्रकार्य, संस्कार केंद्र आणि राजकारणाकडे लक्ष ठेवले पाहिजे, असा उपदेश स्वामींनी केला. 

रामचंद्रा तुझा वियोग, जय जय रघुवीर समर्थ, दीक्षा देतो रणयज्ञाची, आम्ही पुत्र भारताचे यासह आफळेबुवांनी आपले वडील गोविंदस्वामी यांच्या कीर्तनातील दोन पदे कीर्तनात म्हटली.

सात्यकी सावरकर यांचा सत्कार

सावरकरांचे नातू आणि पत्रकारांचा सत्कार
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू नारायण यांचे सख्खे नातू सात्यकी सावरकर कीर्तनसंध्या उपक्रमाच्या समरोपाच्या दिवशी उपस्थित होते. आफळेबुवांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या दिवशी असलेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांचा आफळेबुवांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, ‘सकाळ’चे पत्रकार आणि छायाचित्रकार मकरंद पटवर्धन यांचाही सन्मान करण्यात आला. कीर्तनसंध्या उपक्रमासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा, तसेच पाचही दिवशी कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन करणारे निबंध कानिटकर यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. 

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांचा सत्कार

मकरंद पटवर्धन यांचा सत्कार

उदंड प्रतिसाद
कीर्तनसंध्या उपक्रमाला दर वर्षीप्रमाणेच यंदाही रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दर दिवशी सुमारे तीन हजार आणि शेवटच्या दिवशी तर सुमारे साडेचार हजार जण कीर्तन ऐकायला उपस्थित होते. रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रमोद महाजन मैदानावर हा महोत्सव झाला.‘रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराने आठ वर्षे कीर्तन महोत्सवाचे शिवधनुष्य यशस्वीपणे उचलले. मी कीर्तनाच्या निमित्ताने भारतभर फिरतो; मात्र रत्नागिरीतील माध्यमांकडून कीर्तनांना चांगली प्रसिद्धी मिळाल्याचा अनुभव आला. आद्य पत्रकार देवर्षी नारदांच्या गादीचा योग्य तो मान येथील पत्रकार ठेवत असल्याचे हे द्योतक आहे आणि त्याचा आनंद वाटतो,’ अशी भावना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांनी व्यक्त केली.

(सोबत व्हिडिओ देत आहोत. पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दुसऱ्या दिवशीचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. तिसऱ्या दिवशीचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. चौथ्या दिवशीचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. २०१८च्या कीर्तनसंध्या उपक्रमातील कीर्तनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)


सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.


प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांचा आफळेबुवांच्या हस्ते गौरव
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 56 Days ago
The British Prime Minster , Clem Attlee was right . He realised that they could no longer depend on the Indian Forces . One reason for deciding to leave . So , the effect of INA was political . That was the contribution iNA made .
0
0
Balkrishna Gramopadhye About 176 Days ago
The real importance is political.
0
0

Select Language
Share Link
 
Search