Next
दत्तूला खुणावतेय ‘टोकियो’ पदक!
BOI
Friday, March 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

दत्तू भोकनळ

‘रिओ’मध्ये पात्र ठरणारा तो भारताचा पहिला आणि ऑलिंपिक इतिहासातील देशाचा केवळ नववा नौकानयनपटू ठरला. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठताना त्याला अपयश आले ते केवळ सहा सेकंदांच्या फरकाने, मात्र केवळ सहा महिने तयारी केल्यावर तो तिथपर्यंत पोहोचला हे ही महत्त्वाचे. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख नौकानयनपटू दत्तू भोकनळबद्दल...
................................
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत आजवर भारताच्या अनेक खेळाडूंनी अनपेक्षितरीत्या सरस कामगिरी केली आहे. यातील काही खेळाडू पदकविजेते ठरले, तर काहींना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. रिओ ऑलिंपिकमध्ये ज्या खेळाडूंना अपयश आले त्यापैकी एक खेळाडू आहे दत्तू भोकनळ. भारताचा अव्वल नौकानयनपटू (रोइंग चँपियन) असलेला दत्तू आता खूप सराव करत आहे तो टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यासाठी.

दत्तू भोकनळ वीरेंद्र सेहवागसोबत‘फीसा एशियन ओशिनिया ऑलिंपिक रिगाटा पात्रता स्पर्धा’ २०१५ला दक्षिण कोरियात झाली होती. या स्पर्धेत दत्तूने सात मिनिटे आणि सात पूर्णांक त्रेसष्ठ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले व ‘रिओ’ पात्रता फेरी पूर्ण केली.  ‘रिओ’मध्ये पात्र ठरणारा तो भारताचा पहिला आणि ऑलिंपिक  इतिहासातील देशाचा केवळ नववा नौकानयनपटू ठरला. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठताना त्याला अपयश आले ते केवळ सहा सेकंदांच्या फरकाने, मात्र केवळ सहा महिने तयारी केल्यावर तो तिथपर्यंत पोहोचला हे ही महत्त्वाचे. हे अपयश त्याच्या जिव्हारी लागले. आता ‘टोकियो’साठी पात्र ठरत पदक मिळवणारच, अशा जिद्दीने तो सराव करत आहे.

२०१२मध्ये भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून तो भरती झाला. त्यावेळी ‘तळेगाव’जवळच्या एका खेड्यातून आलेला दत्तू सैन्यदलाच्या खुल्या निवडीतून निवडला गेला. या नोकरीची त्याला आणि त्याच्या कुटूंबाला नितांत गरज होती. कारण त्याच्या एकट्याच्या कमाईवरच घर चालवायचे होते. वडिलांचे २०११मध्ये निधन झाले आणि आईसह इतर तीन भावंडांचा चरित्रार्थ कसा चालवायचा, हा खूप मोठा प्रश्न दत्तूसमोर निर्माण झाला होता. सैन्यातील भरतीपूर्वी घर चालविण्यासाठी त्यांना होती ती थोडी जमिन व ट्रॅक्टरही विकावा लागला होता.  २०१२ला दत्तू सैन्यात भरती झाल्यावर त्याला नौकानयनमध्येही आवड निर्माण होऊ लागली. त्याच्या वरिष्ठांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला ‘बाँबे इंजिनियरिंग ग्रुप’(बीईजी)च्या खडकी विभागात दाखल केले. दत्तू सिंगल स्कल प्रकारात नौकानयनद्वारे पाण्यात हात-पाय मारायला लागला. तेदेखील पोहता येत नसताना. तरीही वरिष्ठांनी त्याच्यावर विश्वास दाखवला.

दत्तू भोकनळ प्रशिक्षक इस्माईल बेग यांच्यासोबतचार पाच वेळा गटांगळ्या खाल्यानंतर दत्तू माशाप्रमाणे पोहायला शिकला. आपली बोट घेऊन रोज सकाळ-संध्याकाळ तो सराव करत. आधी त्याने स्थानिक स्पर्धेत चमक दाखवली. सुरुवातीला कुसरत अली यांच्याकडे तो सराव करत होता, आता द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक इस्माईल बेग यांच्याकडे तो सराव करतो. ‘आर्मी रोइंग नोड’ (एआरएन) येथे सराव व स्पर्धांतून तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आणि तिथे त्याने जाणकारांना आश्चर्याचा धक्का देत चक्क दोन सुवर्णपदके मिळवली. पुढे तो दक्षिण कोरियातील ‘रिओ ऑलिंपिक’साठीच्या पात्रता स्पर्धेसाठी निवडला गेला.

त्याच वेळी त्याची आई आशा यांना अपघात झाला व त्यांच्या मेंदूला मार लागला. त्यांच्यावर पुण्यातील सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. पात्रता फेरीसाठी आपली निवड झाल्याचेही दत्तूला आपल्या आईला सांगता आले नाही. अखेर तो परमेश्वराकडे आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करून दक्षिण कोरियाला रवाना झाला. तो परत येईपर्यंत त्याच्या आईची तब्येत सुधारली होती व तो ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्याची गोड बातमीही त्यांना समजली. ‘रिओ’मध्ये पदक मिळाले असते, तर आईला आणखी आनंद झाला असता याची खंतही दत्तूने व्यक्त केली. आगामी ‘टोकियो ऑलिंपिक’मध्ये पदक मिळवून तेच आईला भेट देईन असा दृढ विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

‘रिओ’वरून परत आल्यावर जेव्हा त्याची मुलाखत घेतली होती, तेव्हा तो, ‘टोकियोत पदक मिळवणारच, फक्त चार वर्षे थांबा..’, असे म्हणाला होता. टोकियोतील स्पर्धेला अजून जवळपास दोन वर्षांचा कालावधी आहे आणि त्याची सध्या ‘बीईजी’मध्ये जोरदार तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवले.  येत्या काळात त्याला सेनादल, सरकार, खासगी प्रायोजक यांनी मदतीचा हात पुढे केला, तर जपानला सरावासाठी जाऊन तेथील वातावरणाचा त्याला अनुभव घेता येईल. ‘रिओ’मध्ये बोट वल्हवताना त्याला तेथील जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागला होता. हा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता आणि सरावाला केवळ सहाच महिने मिळाले होते म्हणूनच पदकाने हुलकावणी दिली. जपानमध्ये हे टाळण्यासाठी तेथील काही स्थानिक स्पर्धा खेळणे महत्वाचे आहे.

ऑलिंपिकपूर्वी जर अशा स्थानिक स्पर्धा खेळायला मिळाल्या, तर फार मोठा अनुभव गाठीशी येईल आणि मग प्रत्यक्ष स्पर्धेत त्याला फायदा होईल. अर्थात यासाठी जपानला जाणे वगैरेसाठी मोठा खर्च येणार असल्याने सरकार, सेनादल व खासगी प्रायोजकांनी सढळहस्ते त्याला मदत केली पाहिजे.  

दत्तू केवळ सैन्यातील कामात किंवा नौकानयनाच्या सरावातच व्यग्र असतो असे नाही, तर वेळ मिळेल तेव्हा सामाजिक उपक्रमातही तो सहभागी होतो. अन्न सुरक्षा उपक्रमात ‘अन्न वाया घालवू नका’ यासारखी आवाहने करत दत्तूही काही सामाजिक कार्यात स्वतःला वहावून घेतो. यामुळे मानसिक समाधान मिळते व स्पर्धेसाठी एक नवी उर्जा मिळते, असे तो सांगतो. टोकियोतील पदकाचे त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे ही तमाम भारतीय क्रीडारसिकांची अपेक्षा आणि आकांक्षा आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link