Next
भेसळयुक्त अन्न पोषणाला मारकच
BOI
Wednesday, May 30 | 09:45 AM
15 0 0
Share this story


अन्न निरीक्षकांनी दुकाने, गोदामे, दुध डेअरी इत्यादी ठिकाणी धाडी घालून भेसळ युक्त माल पकडला, जप्त केला, अशा बातम्या अधूनमधून आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. धान्य, तेल, दूध व दुग्धजन्य पदार्थांत आजकाल सर्रास भेसळ सुरू असते व बहुतांश वेळा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते... ‘पोषणमंत्र’ सदरात या वेळी पाहू या अन्नातील भेसळीमुळे पोषणावर होणाऱ्या परिणामाबद्दल...
..................................................
साधारण सणवार, जसे गणपती, दसरा, दिवाळी जवळ आले, की छाप्याचे प्रमाण वाढते. भेसळ प्रामुख्याने दोन कारणांसाठी केली जाते.  एक म्हणजे जास्त नफा मिळविण्यासाठी व दुसरे म्हणजे अन्न पदार्थाचे रूप, रंग, आकर्षक बनवण्यासाठी. भेसळ केल्याने पदार्थाचे प्रमाणही वाढते. 

अन्नधान्य भेसळ अधिनियमानुसार एखादा घटक आरोग्याला धोकादायक असूनसुद्धा, तो पदार्थात मिसळला किंवा वापरला गेल्यास त्याला अन्नभेसळ असे म्हणतात. एखादा पदार्थ पूर्णपणे किंवा अंशतः दुसऱ्या एखाद्या स्वस्त किंवा निकृष्ट व आरोग्याला हानिकारक असलेल्या पदार्थाने बदलणे किंवा मिसळणे किंवा त्याचा कोणताही हिस्सा किंवा घटक पूर्णपणे किंवा अंशतः काढणे याला अन्नभेसळ म्हणतात.  

असे भेसळयुक्त अन्नपदार्थ लोकांना विकणे हा गुन्हा तर आहेच, पण याबाबत फार कोणी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. मग ह्याचे घातक परिणाम लोकांना भोगावे लागतात. परिणामी कर्करोग, मूत्रपिंड यांसारख्या आजारांचे प्रमाण खूप वाढल्याचे आपल्याला दिसते. त्याची  अनेक कारणे असली, तरी एक कारण भेसळयुक्त अन्नपदार्थ खाणे हे सुद्धा आहे. काही वेळा आपल्याला असाही अनुभव येतो, की विशिष्ट ठिकाणी जेवून किंवा खाऊन आपले पोट बिघडते. तर याचे कारण कदाचित तिथे भेसळयुक्त अन्नघटकांचा वापर होत असावा असे समजावे.  

अन्नामध्ये अपमिश्रक (अॅडल्टरन्ट – भेसळीसाठी वापरलेला पदार्थ) किंवा आसन्न (अॅडिटिव्ह – मिश्रित पदार्थ) असण्यामध्ये खूप सौम्य फरक आहे.  आसन्न पदार्थ मूळ पदार्थाचे रूप, रंग, टिकाऊपणा वाढविण्यासाठी वापरले जातात. कँडी, फळांचे रस, मिठाई, इत्यादींमध्ये आसन्न पदार्थ असतातच. मग त्याला आसन्न म्हणायचे की अपमिश्रक.? एक उदाहरण घेऊ या, कॉफीमध्ये चिकोरी मिसळली जाते. त्यामुळे त्याची किंमत कमी होते; पण कॉफीचा स्वादही वाढतो. मग चिकोरी हा आसन्न की अपमिश्रक पदार्थ.? जर कॉफीच्या वेष्टनावरील अन्नघटकांच्या विवरणात चिकोरीचा उल्लेख असेल, तर तो आसन्न पदार्थ, पण जर नसेल, तर तिथे तो अपमिश्रक पदार्थ झाला .

अपमिश्रक पदार्थांचे वर्गीकरण पाहू या :

१.      सहेतुक अपमिश्रण

वाळू, संगमरवराचे खडे, घातक रंगीत पाणी, खडूची पूड

२.      अनुषंगिक अपमिश्रण

कीटकनाशक, अन्नातील अळी

३.      धातू अपमिश्रण

पाण्यात शिसे व हवाबंद अन्नातील टीन

एवढेच नाही, तर असे अनेक किचकट निकष आहेत, पण रोजच्या जीवनात ज्या निकषांची आपल्याला माहिती हवी, ती दिलेली आहे. 


दैनंदिन जीवनात आपण रोज सकाळी उठल्यावर दूध, चहा, कॉफी, घेतो. तिथपासून ते रात्री कामाच्या ठिकाणावरून घरी येईपर्यंत, ज्या वाहनाने येतो, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेटोल, डीझेल यांमध्येसुद्धा भेसळ असू शकते, तशा बातम्याही आपण वर्तमानपत्रात वाचतो.  अशा भेसळयुक्त वस्तू व अन्नपदार्थ आपण रोजच्या जीवनात वापरत असतो. त्या कशाप्रकारे ओळखायच्या ते आपण बघू या. त्याचप्रमाणे त्यात कशाची भेसळ होते, तेसुद्धा तक्त्याद्वारे दिले आहे..
 

१.      पनीर, खवा, दूध 

खळ मिसळली जाते

२.      खाद्य तेल

आर्गीमोनी तेल

३.      चहा

वापरलेल्या चहाची पूड, इतर पाने, लाकडाचा भुसा

४.     जिरे, हळद, खसखस

अनैसर्गिक रंग लावलेल्या बिया

५.     हळद, मसाल्याचे पदार्थ

लेड क्रोमेट

६.      तूर डाळ

केसरी डाळ

७.     अन्नधान्य

खडे, संगमरवर दगडाचे तुकडे, वाळू

८.     तिखट

रंगवलेला लाकडाचा भुसा

९.     मोहरी

धोत्र्याच्या बिया

१०.मध

ग्लुकोज, गुळाचा पाक

  
याव्यतिरिक्त पाण्याची दुधात भेसळ, तेल काढून तेलबिया विकणे, फळांना ग्लुकोज व अनैसर्गिक रंगाचे इंजेक्शन देऊन विकणे, अशी अनेक भेसळीची उदाहरणे आपल्याला वरचेवर पाहायला मिळतात. ह्या भेसळीचे दुष्परिणाम ग्राहकांवर होतात. पोट बिघडणे, उलट्या, अॅनिमिया, मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग असे अनेक आजार ह्या भेसळीमुळे उद्भवू शकतात.  त्यामुळे आपण कष्ट करून मिळवलेले पैसे, खर्च करून विकत घेताना आपण खूप जागरूक राहणे गरजेचे आहे. 

- आश्लेषा भागवत
मोबाईल : ९४२३० ०८८६८
ई-मेल :  ashlesha0605@gmail.com 

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link