Next
‘टिकाराम जगन्नाथ’मध्ये सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन
BOI
Friday, October 12, 2018 | 12:42 PM
15 0 0
Share this story

‘टिकाराम जगन्नाथ महाविद्यालया’च्या सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन विजय वडवेराव यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण मोकाशी, विलासराव पंगुडवाले, गायिका स्मिता भद्रिगे उपस्थित होते.

पुणे : ‘साहित्य, संगीत, कला ही आपली संस्कृती जतन करण्याची माध्यमे आहेत. महाविद्यालयीन तरुणांना सांस्कृतिक कला मंडळे आपल्या संस्कृतीचा अभ्यास, संवर्धन व जतन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कला, साहित्य माणसाला समृद्ध करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक तरी कला अंगीकारावी’, असे प्रतिपादन गझलकार व संगीतकार विजय वडवेराव यांनी केले.

खडकी शिक्षण संस्था संचलित टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन वडवेराव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वरा इव्हेंट्स प्रस्तुत वडवेराव यांचा ‘गीत गझल बरसात’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम झाला. त्यांना अंबरनाथ येथील गायिका स्मिता भद्रिगे यांनी साथ दिली. या वेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विलासराव पंगुडवाले, चिटणीस आनंद छाजेड, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. महादेव रोकडे, प्रा. रुपाली अवचरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात ना. धो. महानोर, सुरेश भट, जगदीश खेबुडकर, गुलजार या गीतकारांच्या रचना सादर करण्यात आल्या. अरुण दाते यांना श्रद्धांजलीपर भावगीत सादर करण्यात आले. ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ या गीताने विशेष दाद मिळवली. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘फिर छिडी रात’, ‘अधीर मन झाले’ अशा सदाबहार गीतगझलांनी मैफिल रंगली. 

विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर वडवेरावांनी सादर केलेल्या ‘वेशीवरचा दगड’ या कवितेला भरभरून दाद दिली. एकाच कार्यक्रमात वडवेरावांनी तलत अजीज, महम्मद रफी, सुरेश वाडकर, किशोर कुमार, मुकेश, एस. पी. बालसुब्रहमण्यम, अरुण दाते अशा जवळपास सात गायकांची गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गायिका स्मिता भद्रिगे यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, श्रेया घोषाल यांची गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कलामंडळाचे फार मोठे योगदान आहे. सांस्कृतिक कलामंडळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याची महत्वाची कामगिरी करतात’, असे मत प्रा. महादेव रोकडे यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link