Next
आश्रमशाळेतील मुले गिरवणार जीवनकौशल्याचे धडे
शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
प्रशांत सिनकर
Saturday, July 13, 2019 | 04:26 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक आता मुलांना निरोगी आरोग्यासाठी पुरेसा आहार कोणता घ्यावा, स्वच्छता कशी बाळगावी, आपली निर्णयक्षमता कशी वाढवावी याचे शिक्षण देणार आहेत. यासाठी राज्यातील ५५७ आश्रमशाळांमधील अंदाजे दोन हजार २२८ शिक्षक विशेष प्रशिक्षण घेत आहेत. आदिवासी विकास विभाग, महिला बालविकास, आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

ठाणे-पालघर जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त असल्याने तेथे प्राधान्यक्रमाने हा उपक्रम  राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांतील ११२ शिक्षकांचे तीन सत्रांतील प्रशिक्षण नुकतेच पार पडले. आदिवासी विभागांत असलेली कुपोषणाची समस्या लक्षात घेता पौष्टिक आहार कसा मिळेल, दैनंदिन जीवनात स्वच्छता कशी बाळगावी याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले. 

आदिवासी मुलांमध्ये भाषेची अडचण मोठी असते. त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. मानसिकदृष्ट्या या मुलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल, याकडे शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, त्यांच्या करिअरसाठी योगदान देणे या गोष्टी शिक्षकांना शिकवण्यात आल्या. 

आदिवासी मुलांना मूल्यशिक्षण, संस्कार, स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्याची काळजी याबरोबर मुलांची मानसिक गरज, तसेच किशोरवयीन काळात त्यांच्यात घडत असलेल्या मानसिक व शारीरिक बदलांची त्यांना  जाणीव करून देणे, या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, मुलांना कसे समजावून सांगावे याची माहिती प्रशिक्षकांतर्फे आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षकांना देण्यात आली.

‘शिक्षक म्हणून आदिवासी क्षेत्रात आदिवासी मुलांबरोबर काम करताना त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावे लागते. त्यांच्याशी कसा संवाद साधावा, त्यांना काय शिकवावे याची माहिती या प्रशिक्षणामुळे मिळाली. आमच्या मनातील अनेक शंकांची उत्तरे यामुळे मिळाली, याचा उपयोग आदिवासी मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी होईल,’ असा विश्वास प्रशिक्षणासाठी आलेल्या एका शिक्षिकेने व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search