Next
दिग्गज कलाकारांच्या गायन आणि वादनाने रंगला ‘मित्र महोत्सव’
BOI
Wednesday, November 28, 2018 | 01:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : अवीट गोडीच्या सुरांनी रसिकांना संगीताचा एक अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या गायन व वादनाने ‘मित्र महोत्सव’ हा संगीत महोत्सव रंगला.

मित्र फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी राग पुरिया धनश्रीने गायनास सुरूवात करून ‘सुमिरो तेरो नाम’, ‘पायलिया झनकार मोरी’ या रचनांनी गायन खुलवत नेले. त्यानंतर त्यांनी ‘मिश्र काफी’ मधील टप्पा व तराणा सादर केला. ‘लगे री बरसात मोरे नैन’ या त्यांनी गायलेल्या रचनेने रसिकांची उत्स्फू्र्त दाद मिळवली. पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेला ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग गाऊन त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीवर, तर भरत कामत यांनी तबल्यावर साथसंगत केली.


या वेळी गेली ५० वर्षे संगीत शिकवणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कुसुमताई सोहनी यांना गौरव निधी प्रदान करून, त्यांचा ज्येष्ठ व्हायोलिन वादक एन. राजम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे धनंजय गोखले या वेळी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा शेवट एन. राजम यांच्या बहारदार व्हायोलिन वादनाने झाला. त्यांनी राग बागेश्री कानडा सादर केला. त्यांना सौरभ कर्डीकर यांनी तबल्याची साथ केली.    

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात प्रसिद्ध सरोद वादक अयान अली बंगश यांच्या सुश्राव्य वादनाने झाली. त्यांनी एक प्राचीन राग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राग ललिता गौरीने वादनास सुरूवात केली. त्यांनी आलाप, आडा चौताल व तीनतालातील रचना सादर केल्या. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या राग झिंजोटी आणि राग गौड मल्हारमधील अप्रतिम रचनांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. राग किरवाणीमधील रचनेने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. सत्यजित तळवलकर यांनी त्यांना तबल्याची साथ केली .

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पतियाळा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुमधुर गायनाने झाला. त्यांनी राग ‘जोग’ने आपल्या गायनास सुरूवात केली. त्यानंतर राग बिहागमधील काही बंदिशी व राग ‘भिन्न षड्ज’मधील रचनादेखील त्यांनी सादर केल्या. ‘सैया निकस गये मै ना लडी थी’ या लोकप्रिय रचनेने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर, तर तन्मय देवचक्के यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search