Next
बर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य
BOI
Tuesday, February 19, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this story


निसर्गनिर्मित साठ्यांचा लोभीपणाने दुरुपयोग करण्याची मानवी वृत्ती, आपांपसातले हेवेदावे, भोगवाद, चंगळवाद यांवर ‘बर्ड बॉक्स’ हा चित्रपट विचार करायला लावतो.जॉश मॅलरमनच्या ‘बर्ड बॉक्स’ याच नावाच्या पुस्तकातील कथासूत्राचा आकर्षक विस्तार करणारा हा नवा चित्रपट सुंदर पटकथा, उत्तम दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळे एक दर्जेदार अनुभूती ठरतो... ‘रसास्वाद’ या सदरात हर्षद सहस्रबुद्धे या वेळी लिहीत आहेत ‘बर्ड बॉक्स’ या हॉलिवूडपटाबद्दल...
...................................
‘बर्ड बॉक्स’ हा नवा चित्रपट नेटफ्लिक्सनं नुकताच वितरित केला आहे. हा चित्रपट ‘पोस्ट अॅपोकॅलिप्टिक’ प्रकारातला आहे. जगाचा अंत होण्यापूर्वीच्या घटना दाखवणारा चित्रपट असेल, तर त्याला ‘अॅपोकॅलिप्टिक मूव्ही’ म्हणलं जातं आणि जर चित्रपटात दाखविल्या जात असणाऱ्या घटना जगाच्या विनाशानंतरच्या असतील, तर त्या चित्रपटाला ‘पोस्ट अॅपोकॅलिप्टिक’ म्हणण्याचा सर्वसामान्य प्रघात आहे. 

२०१४मध्ये प्रकाशित झालेल्या जॉश मॅलरमनच्या ‘बर्ड बॉक्स’ नावाच्याच पुस्तकावर आधारलेला हा चित्रपट आहे. ‘बर्ड बॉक्स’ची नायिका मॅलरी (सँड्रा बुलक) ही गर्भवती आहे. नियमित तपासणीकरिता आपल्या बहिणीबरोबर ती घराजवळच्या एका रुग्णालयात आलेली आहे. साधारण त्याच वेळी बाहेर दंगल, लुटालूट, जाळपोळसदृश वातावरण आहे, अशा बातम्या टीव्हीवरून प्रसारित केल्या जात आहेत. बाहेर घडणाऱ्या हिंसेमागचे नेमके कारण कुणालाच ज्ञात नाही. माणसं अचानक हिंसक बनून आत्मघात तरी करत आहेत अथवा इतरांना इजा पोहोचवत आहेत, असं बातम्यांवरून कळतं. 

बहिणीबरोबर तपासणी करून परतत असताना, मॅलरीची बहीण बाहेर घडणाऱ्या अशा स्वरूपाच्या घटना पाहते. काही अदृश्य शक्ती बहिणीचा ताबा घेतात आणि ती आत्मघात करून घेते. हे पाहून धक्का बसलेली मॅलरी आपल्याच विचारात उभी असताना, बाहेर चाललेल्या प्रकाराची झळ तिला बसू नये या उद्देशाने जवळच्याच एका घरातली एक महिला, तिला आपल्या घरात बोलावते. मॅलरी घरात जाणार तोच, ती महिला एक प्रकारच्या ट्रान्समधे जाते आणि आत्मघात करून घेते. 

मॅलरी घरात आश्रयाला जाते तिथे आत आधीच आलेले काही लोक असतात. स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूला मॅलरीला जबाबदार मानणारा आत्मघात करणाऱ्या महिलेचा नवरा असतो. मॅलरी घरात येते त्या वेळी आणि त्यानंतरही काही लोक त्या घरात आश्रय घेतात. बाहेर घडणारा प्रकार नेमका काय आहे, कशामुळे घडतो आहे, यावर काय उपाय करता येईल, स्वतःचं रक्षण कोणत्या प्रकारे करता येईल, इत्यादी गोष्टींवर, जमलेल्या लोकांमधे चर्चा घडू लागतात. बाहेर होणाऱ्या घटना जर पाहिल्या नाहीत, तर त्यापासून हानी पोहोचत नाही आणि याच घटना बघितल्यावर आत्मघात करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते या निष्कर्षाला सर्व जण येतात. 

या दुर्घटनांपासून बचाव करण्याकरिता योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करतात. जमलेल्या लोकांचे वयोगट आणि स्वभाव वेगवेगळे असल्या कारणाने त्यांच्यात मतभिन्नता असते. वेळ जाईल तसं-तसं त्यांच्यात हळूहळू वादविवादही होऊ लागतात. तशातच, घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तू आपल्याला फार काळ पुरणार नाहीत, हे पाहून जवळच्या सूपरमार्केटला जाऊन आवश्यक सामान आणायची कल्पना निघते. न पाहता जीपीएसच्या साहाय्याने सुपरमार्केटला जात असताना या जमलेल्या लोकांपैकी काही जण अज्ञात अमानवी शक्तीचा अनुभव घेतात. सुपरमार्केटमध्ये पोहोचल्यावर तिथे असणाऱ्या वस्तूंपैकी कोण काय प्रकारची खरेदी करतो, कसा वागतो इत्यादी गोष्टी दिग्दर्शिका बारकाईने दाखवते. मानवी स्वभावावर तिच्या पद्धतीने टिप्पणी करते. सुपरमार्केटहून परत आल्यानंतर घडामोडी वेग घेतात. अशातच एका नव्या माणसाची घरात भर पडते. आलेला माणूस बाहेरच्या प्रकारामुळे बाधित झाला आहे अथवा नाही याबद्दल साशंकता असते. अशातच मॅलरी आणि सोबत असणाऱ्या महिलेच्या प्रसववेदना एकाच वेळी सुरू होतात. घरात नवीन दाखल झालेली व्यक्ती, घरात असणारी विचित्र स्वभावाची काही माणसे, दोन असहाय गर्भवती महिला आणि बाहेर सुरू असलेलं मृत्यूचं थैमान असे सगळे घटक मिळून हा टेन्शन ड्रामा सुरू राहतो. 

यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर ही कहाणी मागचा धागा पकडून पुढे सुरू होते. ‘बर्ड बॉक्स’ अगदी सुरुवातीपासूनच दोन टाइमलाइन्सवर सुरू राहतो. आत्ताचा काळ आणि पाच वर्षांच्या आधीचा काळ. पाच वर्षांपूर्वी जगाचा अंत ओढवलेला आहे. त्या वेळी एका घरात आश्रय घेतल्यामुळे मॅलरी वाचली आहे. घरात आश्रय घेण्याच्या काळात भेटलेला सोबती टॉम, त्याच वेळी जन्मलेलं मूल आणि मॅलरीसोबत प्रसूत झालेल्या महिलेची मुलगी अशा सर्वांसह ती कशीबशी जीवन कंठत आहे. जगाचा विनाश होऊन तब्बल पाच वर्षं उलटली आहेत, तरीही स्थैर्य नावालाही नाही. बाहेर पडताना डोळ्यांवर पट्टी बांधून राहावं लागत आहे. जिथे जिथे अन्न आणि आसरा मिळेल अशा जागांच्या शोधात भटकावं लागत आहे. छोट्या स्वरूपात अजूनही टोळीहल्ले सुरूच आहेत. मनुष्यजात जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

अशाच परिस्थितीत एकदा ‘वायरलेस’वर संदेश येतो, की मॅलरी राहत असलेल्या ठिकाणाहून काही किलोमीटर अंतरावर मनुष्यवस्ती आहे आणि ती व्यवस्थित तग धरून आहे. इथून पुढचं जीवन सुरक्षितपणे जगण्याकरिता मॅलरीला त्यांच्यातर्फे आमंत्रित करण्यात येतं. मॅलरीला त्या वस्तीपर्यंत पोहोचण्याकरिता एका नदीतून जावं लागणार आहे. तेही डोळ्यांवर पट्टी बांधून. सिनेमाच्या शेवटाकडे येणारा हा भाग एकदम थरारक आहे. जेमतेम पाच वर्षांची दोन मुलं आणि मॅलरी हा नदीतला जीवघेणा प्रवास डोळ्यांवर पट्टी बांधून सहीसलामत पूर्ण करू शकणार का? प्रवासाअंती मनुष्यवस्ती आढळणार का? शेवटी नेमकं काय होणार, इत्यादी प्रश्नांची पुरेशी समाधानकारक उत्तरं देऊन ‘बर्ड बॉक्स’ संपतो. परंतु त्याचा विषय मात्र डोक्यातून सहजी जात नाही. 

निसर्गनिर्मित साठ्यांचा लोभीपणाने दुरुपयोग करण्याची मानवी वृत्ती, आपापसांतले हेवेदावे, वर्चस्व स्थापन करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वाईट वृत्ती, निसर्गाप्रत कृतज्ञ नसणे, भोगवाद, चंगळवाद इत्यादी गोष्टींवर विचार करायला हा चित्रपट भाग पाडतो. ५८ वर्षीय सुझान बेयर या प्रतिभावान दानिश दिग्दर्शिकेचा हा चित्रपट, निव्वळ एक ‘डिझास्टर मूव्ही’ बनून न राहता विचारप्रक्रियेस चालना देतो. अशा प्रकारच्या चित्रपटांचं कथाबीज अत्यंत छोटं असतं. छोट्या कथाबीजावर इतक्या मोठ्या पृष्ठसंख्येचं पुस्तक लिहिणं हीच मुळात कमाल आहे. जॉश मॅलरमन ती साध्य करतो. पुस्तकातल्या घटना पडद्यावर साकारतानाचं आव्हानही महत्त्वाचं. 

‘फायनल डेस्टिनेशन’, ‘फाइव्ह’, ‘लाइट्स आउट’ यांसारखे भयपट लिहिणारा एरिक हेजरर हे आव्हान उत्तमरीत्या पेलतो आणि चित्रपट घटनाप्रधान बनवतो. ‘डिझास्टर’ अथवा ‘मॉन्स्टर’ मूव्ही हा प्रकार आपल्याला नवा नाही; पण फार कमी चित्रपट त्यांचा स्वतःचा असा वेगळा विचार घेऊन येतात. जगाचा सर्वनाश आणि त्या आसपासच्या घटना रूपकाद्वारे मांडून, मानवी वृत्तीवर लक्षणीय कमेंट करणारा ‘बर्ड बॉक्स’ या बाबतीत इतरांपेक्षा वेगळा ठरतो. ज्या वेगाने आपण सर्व जण धावतो आहोत, प्रगतीच्या व्याख्या वाढवताना आपली प्राचीन मूल्ये विसरत आहोत, साधन-संपत्तीचा दुरुपयोग करत आहोत, त्याचा अंत नेमका कुठे आहे? हा अंत कसा असेल? अंत झाल्यानंतर काय घडू शकेल, इत्यादी भेडसावणाऱ्या विषयांवर विचार करत असतानाच, ‘बर्ड बॉक्स’चा आणि त्यातल्या पात्रांचा जन्म झाला असावा. आसपासचीच काही उदाहरणं पाहून यातल्या पात्रांचे स्वभाव ठरले असावेत. 

सँड्रा बुलकसारखी समर्थ अभिनेत्री ‘बर्ड बॉक्स’च्या केंद्रस्थानी आहे. ती मॅलरीची भूमिका अक्षरशः जगते. कॅलिफोर्नियाच्या आसपासच्या प्रदेशात केलेलं चित्रण, स्मिथ नदीवर चित्रित केलेले साहसी प्रसंग, सर्वच कलाकारांचे उत्तम अभिनय, उत्तम पटकथा, पार्श्वसंगीत व दिग्दर्शन, मूळच्या सशक्त कथेला अधिकच उंचीवर नेतं. जगाचा विनाश होण्याचा काळ आणि आजच्या काळात असणारं पाच वर्षांचं अंतर आणि या काळात टॉम, मॅलरी आणि दोन लहान मुलांची गुजराण कशा पद्धतीनं होते, इत्यादी गोष्टी दाखवायच्या फंदात दिग्दर्शिका पडत नाही. ही सर्व्हायवलची गोष्ट आणि पाच वर्षांचा मोठा काळ मात्र पचनी पडत नाही. इतका एक मोठा लॉजिकल दोष सोडला, तर बाकी चित्रपट उत्तम आहे. लिनिअर पटकथा करण्याऐवजी दोन टाइमलाइन्सवर कथा सुरू राहणे ही एक चांगली क्लृप्ती ठरते. यामुळे उत्कंठा टिकून राहते. सुंदर पटकथा, उत्तम दिग्दर्शन, विचारपूर्वक योजलेलं ध्वनी आरेखन, तसंच पार्श्वसंगीत, सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, यामुळे जॉश मॅलरमनच्या पुस्तकातील कथासूत्राचा आकर्षक विस्तार करणारा हा नवा चित्रपट एक दर्जेदार अनुभूती ठरतो. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr. Asmita Phadke About 29 Days ago
Harshad, Thanks for the review. Will watch it now.
1
0
sunita pathade About 30 Days ago
Nice movie.liked it.nice article
1
0
Yoginee Bhide About 34 Days ago
मी बरेच वेळा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर बघून स्किप केला. दोन गोंडस लहान मुलांवर अत्याचार/ त्रास होतोय का..., असं वाटून पोटात गोळा येतो. पण हे वाचून आता असं वाटतंय की हा सिनेमा सुखांत असावा....
1
0
Prapurika About 35 Days ago
Fentastic, sendra bulok ..my fevorite one, i like her speed ,part1 and 2, moovie, will see this sure ..!nice artical
1
0

Select Language
Share Link