रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलचे २०१९ हे तपपूर्ती वर्ष असून, त्यानिमित्त ११ फेब्रुवारीला एका दर्जेदार सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये होणारा हा सोहळा रिंपा सिवा यांच्या तबलावादनाने रंगणार असून, या वेळी त्यांना मृत्युंजय मुखर्जी हे बासरीसाथ, तर योगेश रामदास हार्मोनियमसाथ करणार आहेत.
आर्ट सर्कलतर्फे गेली बारा वर्षे वैविध्यपूर्ण दर्जेदार कार्यक्रमांमधून रत्नागिरीकरांना अनोखी मेजवानी सातत्याने दिली आहे. थिबा संगीत महोत्सव, पुलोत्सव आणि यांसारख्या इतर कार्यक्रमांमधून आर्ट सर्कलने वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गज, तसेच उगवत्या कलाकारांसाठी रत्नागिरीमध्ये व्यासपीठ निर्माण केले आहे.
तपपूर्तीनिमित्त तबलावादन क्षेत्रातील एक उगवती तारका रिंपा सिवा रत्नागिरीमध्ये कार्यक्रम सादर करणार आहे. ज्या वयात मुली बाहुल्या आणि भातुकलीमध्ये रमतात त्या वयात रिंपा यांचे कान तबल्याच्या तालाचे आणि ठेक्याचे वेध घेत होते. वडील प्रख्यात तालवादक स्वपन सिवा यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या तिसर्या वर्षापासून त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. किशोरावस्थेतदेखील मैत्रिणींसोबत मौजमजा करण्याऐवजी रिंपा यांनी आपला संपूर्ण वेळ केवळ तबल्यासाठी दिला.

वयाच्या आठव्या वर्षी रिंपा यांनी पहिले सादरीकरण केले असून, त्या फरूखाबाद घराण्याच्या शिष्या आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक मानाच्या महोत्सवांमधून, संगीत सभांमधून सादरीकरण केले आहे. पेशकार, गत आणि कायदा अशा तबलावादनामधल्या वेगवेगळ्या वादानांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. अमेरिका, ब्रिटन आणि हॉलंडसारख्या अनेक देशांमधून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.
‘नारीशक्ती’ या संपूर्ण स्त्रियांच्या फ्युझन बॅंडमध्ये त्या तबलावादक म्हणून सामील झाल्या आहेत. त्यांच्यावर बनलेल्या एका फ्रेंच माहितीपटामध्ये त्यांना ‘प्रिंसेस ऑफ तबला’ अशा नामाभिधानाने गौरवण्यात आले आहे. वयाच्या १८ व्या वर्षी प्रतिष्ठेचा शामुख संगीत शिरोमणी पुरस्कार, तर वयाच्या २१ व्या वर्षी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. शास्त्रशुद्ध तबलावादनासोबतच तालवादनामध्ये अनेक विविध प्रयोग करणार्या रिंपा यांना प्रत्यक्षात ऐकणे ही रत्नागिरीकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
रिंपा यांना बासरीसाथ करणार आहेत तरुण बासरीवादक मृत्युंजय मुखर्जी. प्रा. देबप्रसाद बॅनर्जी आणि आणि श्यामल चटर्जी यांच्याकडून मार्गदर्शन घेत आता सध्या जगद्विख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली मृत्युंजय प्रशिक्षण घेत आहेत. या मैफिलीला संवादिनी साथ करणारे योगेश रामदास. गुरू अपर्णा हुनगुंद तसेच, प्रसाद शेवडे, पं. रामभाऊ विजापुरे यांच्याकडून मार्गदर्शन घेत योगेश यांची वाटचाल सुरू आहे. सध्या ते डॉ. स्नेहा राजुरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण सुरू आहे.
‘दशकपूर्तीच्या सोहळ्यावेळी उस्ताद झाकिर हुसैन यांनी थिबा राजवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूसमोर रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. हा तपपूर्ती सोहळाही तसाच अविस्मरणीय होईल,’ असा विश्वास आर्ट सर्कलने व्यक्त केला आहे.