Next
न्यायमूर्ती रानडे, वि. द. घाटे, डॉ. विजया वाड
BOI
Thursday, January 18 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रसिद्ध समाजसुधारक आणि बुद्धिमान न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ‘वाचनमाला’मुळे शाळाशाळांमध्ये प्रसिद्ध असणारे लेखक वि. द. घाटे, दिवाकर या नावाने ‘नाट्यछटा’ हा प्रकार मराठीत आणणारे शंकर काशिनाथ गर्गे आणि प्रसिद्ध कादंबरीकार आणि बालसाहित्यकार डॉ. विजया वाड यांचा १८ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा थोडक्यात परिचय...
.......
महादेव गोविंद रानडे 

१८ जानेवारी १८४२ रोजी निफाडमध्ये जन्मलेले महादेव गोविंद रानडे हे तत्कालीन भारतातले एक महान समाजसुधारक आणि अत्यंत बुद्धिमान न्यायमूर्ती आणि मार्मिक लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. ते मवाळ पक्षांमधले होते आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे सहकारी होते. 

त्यांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर वेळोवेळी लेखन केलं. १८७८साली लोकहितवादी रावबहादूर गोपाळ हरी देशमुखांबरोबर त्यांनी ‘मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी’ची स्थापना केली आणि मराठी ग्रंथकारांचं संमेलन पुण्यात भरवलं. ते महाराष्ट्र ग्रंथकार संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते. 

व्यापारासंबंधी व्याख्यानं, राइज ऑफ दी मराठा पॉवर, एकनाथी भागवतातले वेचे – असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१६ जानेवारी १९०१ रोजी त्यांचं निधन झालं. 
.............

विठ्ठल दत्तात्रेय घाटे

१८ जानेवारी १८९५ रोजी जन्मलेले विठ्ठल दत्तात्रेय घाटे हे अभ्यासू लेखक आणि कवी होते. 

त्यांनी लिहिलेली वाचनमाला प्रसिद्ध होती आणि शालेय अभ्यासक्रमात तिचा समावेश झाला होता.

१९५३ सालच्या अहमदाबादच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

दत्तांची कविता, नाट्यरूप महाराष्ट्र, नाना देशांतील नाना लोक, पांढरे केस हिरवी मने, दिवस असे होते, यशवंतराव होळकर अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

तीन मे १९७८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
................

शंकर काशिनाथ गर्गे

१८ जानेवारी १८८९ रोजी पुण्यात जन्मलेले शंकर काशिनाथ गर्गे हे ‘नाट्यछटाकार दिवाकर’ म्हणून अवघ्या मराठी जनमानसांत लोकप्रिय असणारे लेखक! 

वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, शेक्सपीअर हे त्यांचे आवडते साहित्यिक होते. 

लॉर्ड टेनिसन यांनी १८४२मध्ये पहिला ड्रामॅटिक मोनोलॉग लिहिला होता, जो पुढे मॅथ्यू अरनॉल्डने आणि रॉबर्ट ब्राउनिंगने लोकप्रिय केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन शंकर गर्गे यांनी दिवाकर टोपण नाव घेऊन हा नाट्यप्रकार लिहून मराठीत रूळवला आणि तो ‘दिवाकरांच्या नाट्यछटा’ या नावानेच ओळखला गेला आणि त्यांच्या ५१ नाट्यछटा ही मराठी साहित्याला मोठी देणगी ठरली. 

अरेरे! ओझ्याखाली बैल मेला!, अशा शुभदिनी रडून कसें चालेल?, अहो, आज गिऱ्हाइकच आलें नाही, एका नटाची आत्महत्या, काय! पेपर्स चोरीस गेले?, कार्ट्या! अजून कसें तुला जगातलें ज्ञान नाही?, कोकिलाबाई गोडबोले, चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच, पंत मेले - राव चढले, बाळ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें!, माझी डायरेक्ट मेथड ही!, मुंबईत मजा गमतीची।, म्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान, स्वर्गांतील आत्मे!, हें काय उगीचच?, हें काय सांगायला हवें! – अशा त्यांच्या एकूण ५१ नाट्यछटा लोकप्रिय आहेत. 

एक ऑक्टोबर १९३१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
................

डॉ. विजया विजय वाड

१८ जानेवारी १९४५ रोजी जन्मलेल्या डॉ. विजया वाड या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणून काम पाहिलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करत असतात.

‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषा शुद्धी प्रकल्प, प्रमाण भाषा प्रकल्प, पाठ्यपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प, नाट्यीकरण प्रकल्प, वाचनवेग प्रकल्प असे अनेक उपक्रम राबवले होते. 

आपल्या मुली वाढविताना, दहावी आता बिनधास्त, निबंधरचना तंत्र आणि मंत्र, गप्पागोष्टी, घर अंगण, गृहविष्णू आणि इतर कथा, मनमोर, मी वेणू बोलतेय..., प्रिय हा भारत देश, सावित्रीच्या लेकी, सय, उत्तम शिक्षक होण्यासाठी..., विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर, झंप्या झिम्माडे, आपली माणसं, बाल निसर्गायन, बिट्टीच्या बारा बाता, छोटुली छोटुली गाणी, डॅनी डेंजर, ढ, दिव्याचे दिव्य, किंजल, क्षणिका, मनाची उभारी, निरभ्र आणि श्रीगणेशा, ओजू एंजल, टिंकू टिंकल, तिसरी घंटा, आपली मुलं, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link