Next
देवेंद्र फडणवीस यांनी मानले धुळेकरांचे आभार
प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी व्यक्त केला आनंद
प्रेस रिलीज
Tuesday, December 11, 2018 | 01:22 PM
15 0 1
Share this article:

मुंबई : ‘धुळ्यातील जनतेने जो ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विकासाच्या राजकारणावर दाखविला, तो सार्थकी लावू आणि एक स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन तेथील महापालिकेच्या माध्यमातून ‘भाजप’ देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  

धुळे महानगरपालिकेत तीन जागांवरून ५० जागांपर्यंत भक्कम यश मिळवत ‘भाजप’ने निर्विवाद बहुमत प्राप्त केल्याबद्दल फडणवीस आणि ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी आनंद व्यक्त केला; तसेच  केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, राज्यातील मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांसह या यशासाठी परिश्रम घेणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

दोन महापालिका मिळून १४२ जागांपैकी सर्वाधिक ६४ जागा ‘भाजप’ने जिंकल्या आहेत. राज्यात सहा नगरपालिकांच्या निवडणुकीतही ‘भाजप’ने उल्लेखनीय यश मिळवले असून, एकूण १०९ पैकी सर्वाधिक ३७ जागा ‘भाजप’ने जिंकल्या आहेत. या सहा पालिकांपैकी तीन पालिकांमध्ये ‘भाजप’ची सत्ता आली असून, त्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा, नागपूर जिल्ह्यातील मौदा आणि जळगावमधील शेंदुर्णीचा समावेश आहे. शिवसेना, काँग्रेस आणि स्थानिक आघाडीला प्रत्येकी एका नगरपालिकेत सत्ता प्राप्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही ठिकाणी सत्ता प्राप्त करता आली नाही.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘अहमदनगर महापालिकेत ‘भाजप’ नऊ जागांवरून १४ जागांवर गेला आहे. जागा वाढल्या असल्या, तरी अपेक्षित यश ‘भाजप’ला मिळू शकलेले नाही. स्थानिक पातळीवर ‘भाजप’ कुठे कमी पडला, याचे चिंतन निश्चितपणे केले जाईल; पण, पूर्वीच्या तुलनेत ‘भाजप’ची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे आपण मन:पूर्वक अभिनंदन करतो. धुळे आणि नगर अशा दोन्ही जनादेशांचा आम्ही स्वीकार करतो. या दोन्ही शहरांच्या सुनियोजित विकासासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे.’

प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, ‘धुळे महापालिकेत ‘भाजप’ने गेल्या वेळच्या तीन जागांवरून झेप घेऊन ५० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नगर महापालिकेत गेल्या वेळच्या नऊ जागांवरून वाढ होऊन १४ जागा ‘भाजप’ला मिळाल्या. धुळे व अहमदनगर येथे ‘भाजप’च्या विजयासाठी परिश्रम करणाऱ्या पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो.’

२०१४च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये ‘भाजप’ची यशाची मालिका चालू आहे. धुळे–नगर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ही मालिका कायमच राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे काम, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली बळकट झालेली पक्ष संघटना यामुळे पक्षाला पुन:पुन्हा यश मिळत असल्याचे दानवे यांनी सांगितले.

२०१५पासून आजपर्यंत राज्यात सर्व २७ महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून, त्यामध्ये ‘भाजप’ने सर्वाधिक एक हजार १०० जागा जिंकल्या आहेत. ‘भाजप’विरोधी पक्षांच्या एकूण जागाही ‘भाजप’एवढ्या नाहीत. राज्यातील २७ पैकी २६ महापालिकांमध्ये ‘भाजप’च्या नगरसेवकांची संख्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे, तर एका महापालिकेत ही संख्या कायम राहिली. २७ पैकी १६ महारपालिकांमध्ये यापूर्वी ‘भाजप’ स्वबळावर किंवा युतीच्या माध्यमातून सत्तेवर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘भाजप’ने धुळे आणि नगर महापालिकांमध्ये यश मिळविले आहे,’ असे दानवे यांनी नमूद केले.
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search