Next
शिक्षणसंस्थाचालक आणि आमदारांची रत्नागिरीत सभा
रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघातर्फे आयोजन
BOI
Saturday, October 27, 2018 | 01:53 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : स्वतंत्र कोकण विद्यापीठासह विविध शैक्षणिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघातर्फे जिल्ह्यातील शिक्षणसंस्थाचालक आणि कोकणातील आमदार यांच्या महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन केले आहे. ही सभा २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता माळनाका येथील शासकीय विश्रामगृहात होणार आहे.

या सभेमध्ये कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ, मेरीटाईम विद्यापीठाचे उपकेंद्र आणि मत्स्य विद्यापीठ स्थापन करणे या महत्त्वाच्या विषयांबरोबरच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला विरोध, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी तात्काळ उठविण्यावर चर्चा होईल; तसेच शिष्यवृत्तीसाठीचे महाडिबीटी पोर्टल सुरू होत नाही, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती व ओबीसीना मिळणारी फी सवलत वेळेवर मिळत नाही, रोस्टरनुसार आरक्षण नसताना कोणत्याही प्रवर्गाचा अतिरिक्त उमेदवार शिक्षण खात्याकडून घेण्याबाबत सक्ती केली जाते, यावरही महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.

विनाअनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके व पोषण आहार मिळत नाही, वेतनेतर अनुदान पुरेसे मिळत नाही, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नियमित मुख्याध्यापक भरण्यात प्रशासकीय अडचणी आहेत. याबाबत खात्याकडून योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. केलेल्या नियुक्त्यांना मंजुरी मिळत नाही, कनिष्ठ महाविद्यालयांच्या बायोमॅट्रीक्स हजेरीमुळे अध्यापनावर परिणाम होतो. शिक्षक भरती बंदी काळात संस्थांनी आस्थापनेवर नेमलेल्या शिक्षकांच्या सेवेचा विचार शासन पातळीवर होणे आवश्यक आहे. अतिरिक्त शिक्षकांची नावे व माहिती पदाधिकार्‍यांच्या सही शिक्याच्या पत्रानेच स्वीकारण्याचा आग्रह धरावा, अशी संस्थाचालक संघाची मागणी आहे.

अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन व समावेशन परस्पर मुख्याध्यापकांना न कळविता ते संस्थेला कळविण्याबाबत आग्रह धरायला हवा. शिक्षकांची संख्या मागील वर्षीच्या पायाभूत पदानुसार न ठरविता ती उपलब्ध विद्यार्थी संख्या या निकषानुसार व आरटीई अ‍ॅक्टनुसार मंजूर करावी, शाळा बंद ठेवण्याबाबतही विचारविनिमय केला जाणार आहे.

‘शिक्षण संस्थाचालकांना आणि शैक्षणिक क्षेत्राला भेडसावणाऱ्या या समस्या विधानसभेत मांडण्यासाठी कोकणातील आमदारांनाही या सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या सभेला जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांनी उपस्थित रहावे,’ असे आवाहन संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कार्यवाह श्रीराम भावे यांनी केले.

सभेविषयी :
दिवस :
रविवार, २८ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी ११.३० वाजता
स्थळ : शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search