Next
१२ ते १८ ऑगस्टदरम्यान रत्नागिरीत कीर्तन सप्ताह
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे आयोजन
BOI
Monday, August 06, 2018 | 06:34 PM
15 1 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १८ ऑगस्ट २०१८ या कालावधीत दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत हा सप्ताह होणार आहे. मंडळाच्या जोशी पाळंद येथील कै. ल. वि. केळकर वसतिगृह इमारतीतील भगवान परशुराम सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

१२ ऑगस्ट, ह. भ. प. किरण फाटक, डोंबिवली : अहंकार (गर्वहरण पंडितांचे) यावर त्यांचे आख्यान असेल. कीर्तनातून लोककल्याण व लोकरंजनासोबत हरिस्मरण व्हावे या उद्देशाने त्यांनी कीर्तनक्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली असून, कैलासबुवा खरे यांच्याकडून त्यांनी कीर्तनाचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांच्या आजी गंगाबाई फाटक यासुद्धा कीर्तनकार होत्या.

१३ ऑगस्ट, ह. भ. प. कैलास खरे, घाणेकर आळी, रत्नागिरी : श्रीराम- हनुमंत युद्ध या विषयावर आख्यान. ते किरण फाटक यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असून, त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. पनवेल येथील नंदकुमार कर्वेबुवा यांच्याकडे ते कीर्तनाचे शिक्षण घेत आहेत. मुंबई, पुणे, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश येथे त्यांनी ५००हून अधिक कीर्तने केली आहेत.

१४ ऑगस्ट, ह. भ. प. राजेंद्र मुळे, चाफे, रत्नागिरी : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांवर आख्यान. राजकारणविरहित, भक्तिरसप्रधान व रसाळ निरूपण करण्यात त्यांची ख्याती आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते कीर्तनसेवा करत असून, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये त्यांनी दोन हजारांहून अधिक कीर्तने केली आहेत.

१५ ऑगस्ट, निहाल खांबेटे : मूळचे दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील युवा कीर्तनकार. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर त्यांचे आख्यान असेल. सध्या ते पुणे येथे पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्याकडे कीर्तनाचे शिक्षण सुरू आहे. ते हार्मोनियम व गायनाचे शिक्षण घेत असून, त्यांनी ५०हून अधिक कीर्तने केली आहेत.

१६ ऑगस्ट, डॉ. सौ. प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर, पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांवर कीर्तन. त्या संगीतात एमए झाल्या असून, गायनातील संगीत अलंकार पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. त्यांनी कीर्तनाचे मार्गदर्शन वडील डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्याकडून घेतले आहे. आधुनिक महिपती संतकवी दासगणूंच्या कीर्तन आख्यानातील सांगीतिक आयामांचा चिकित्सक अभ्यास या विषयावरील संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. २००९पासून त्या श्री दासगणू महाराजांच्या कीर्तन परंपरेचा महाराष्ट्रात प्रचार, प्रसार करत आहेत.

१७ ऑगस्ट, सौ. वसुधा दाते, कल्याण : मच्छिंद्रनाथ या विषयावर आख्यान. त्या बीए, बीएड असून, नागपूरचे अण्णाजी पात्रीकर व पुण्यातील नारद मंदिरातून त्यांनी कीर्तनाचे प्रशिक्षण घेतले आहे. नागपूर आकाशवाणी व महाराष्ट्राबाहेर मराठी, हिंदीतून त्या ४० वर्षे कीर्तन करत आहेत. कीर्तन हा व्यवसाय न मानता कीर्तन हे समाजप्रबोधन, भक्तीचे साधन, सांस्कृतिक संवर्धनाचे माध्यम आहे, अशी त्यांची धारणा आहे.

१८ ऑगस्ट, रोहित दांडेकर, मिरज : श्रीमनसुख चरित्र या विषयावर आख्यान. ते वारकरी व नारदीय पद्धतीने कीर्तन करतात. गोव्यातील गणपतीबुवा दांडेकर यांच्याकडून त्यांनी नारदीय कीर्तनाचे शिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी ६००हून अधिक कीर्तने केली आहेत.

या कीर्तन सप्ताहामध्ये ऑर्गनसाथ वरद सोहनी आणि तबलासाथ प्रथमेश शहाणे व हेमंत परांजपे करणार आहेत. कीर्तन सप्ताहातील सर्व कीर्तने किंवा एखाद्या कीर्तनासाठी आर्थिक साह्य (प्रायोजकत्व) करता येईल किंवा कीर्तन झाल्यानंतर प्रसाद रूपाने मदत देता येईल. त्यासाठी श्रीनिवास जोशी (९४०४३ ३२७०५) यांच्याशी संपर्क साधावा. श्रावण कीर्तन सप्ताहाला कीर्तनप्रेमींनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search