Next
देवगड पंचायत समितीने रचला इतिहास; सलग पाच वर्षे अव्वल कामगिरी
BOI
Monday, April 10, 2017 | 10:30 AM
15 4 0
Share this article:

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पंचायत समितीने पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात दुसरा, तर कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे यशवंत पंचायत राज अभियानात सलग पाच वर्षे अव्वल स्थानावर राहणारी देवगड ही एकमेव पंचायत समिती आहे. 

या पुरस्काराचे वितरण येत्या १३ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे. देवगड पंचायत समितीच्या सभापती जयश्री आडिवरेकर, उपसभापती संजय देवरुखकर आणि गटविकास अधिकारी विजय चव्हाण या वेळी उपस्थित राहणार आहेत.

देवगडच्या पंचायत समितीने गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात दुसरा क्रमांक प्राप्त करून, १७ लाख रुपयांचे बक्षीस आणि पुरस्कार मिळवला आहे. तसेच कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवून ११ लाख रुपयांचा पुरस्कारही प्राप्त केला आहे. त्यामुळे देवगड पंचायत समितीला एकूण २८ लाख रुपये बक्षिसाच्या रूपाने मिळणार आहेत. 

या पंचायत समितीला गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत आतापर्यंत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम बक्षीस म्हणून प्राप्त झाली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीतून मिळालेले हे यश सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखेच असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे पंचायत समितीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विविध उपक्रमांत यश 
देवगड पंचायत समितीने रोजगार हमी योजनेत राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे. देवगड हा कोकणातील पहिला हागणदारीमुक्त तालुका आहे. पंचायत राज अभियानात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गौरव झालेल्या  देवगड पंचायत समितीचे सर्व विभाग आयएसओ मानांकित आहेत. 

विजय चव्हाण यांचे विशेष प्रयत्न 
विजय चव्हाण‘गुरुजी मला माणूस बनवा’ आणि ‘सॅल्यूट टू शिपाई’ अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांतही देवगड तालुका आघाडीवर राहिला आहे. आता किशोरवयीन मुलींसाठी ‘उत्कर्ष किशोरींचा-विकास देवगडचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रमही यशस्वी झाला आहे. पर्यावरण योजनेत काम करून देश पातळीवर पुरस्कार मिळवणारी या तालुक्यातील सर्वच गावे ‘पर्यावरण ग्राम’ झाली आहेत. या सगळ्या यशात गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचा वाटा मोठा आहे. एकंदरीत, सिंधुदुर्गाच्या विकासाचा पाया देवगडने रचला आहे, असे या यशामुळे म्हणता येईल.
 
15 4 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search