Next
आपत्कालीन आर्थिक नियोजन महत्त्वाचे
BOI
Saturday, May 05 | 03:45 PM
15 0 0
Share this story

अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे आर्थिक नियोजन करता येते, हे आपण मागील लेखात पाहिले; मात्र याचबरोबर आपत्कालीन गरजांचेही नियोजन करणे आवश्यक असते. ते कसे करावे, हे पाहू या ‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात...
............
आर्थिक नियोजनाचा विचार करताना सर्वप्रथम आपत्कालीन आर्थिक नियोजन करणे योग्य ठरते. सर्वसाधारणपणे अकाली मृत्यू, अपघात व आजारपण या तीन आपत्तींसाठीचे आर्थिक नियोजन करून मगच अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या गरजांसाठीचे नियोजन करणे योग्य असते.

वर उल्लेखलेल्या आपत्कालीन गरजांसाठींचे आर्थिक नियोजन प्रामुख्याने इन्शुरन्सच्या माध्यमातून करता येते. इन्शुरन्समुळे आपत्ती टाळता येत नसली, तरी अशा आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून काढता येते.

अकाली मृत्यू ही तर सगळ्यात मोठी आपत्ती असून, यामुळे कुटुंबावर मोठा आघात तर होतोच. शिवाय घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे आर्थिक संकट उभे राहते. आयुर्विमा पॉलिसी घेऊन आर्थिक संकट काही प्रमाणात कमी करता येते व ओढवलेल्या दुर्धर प्रसंगावर मात करता येऊ शकते; मात्र यासाठी कमीत कमी प्रीमियम व जास्तीत जास्त कव्हर असणारी विमा पॉलिसी घेणे आवश्यक असते. यासाठी सर्वसाधारणपणे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १२ ते १५ पट कव्हर असणारी पॉलिसी घेणे आवश्यक असते. दरमहा ५० ते ६० हजार रुपये इतके उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीने किमान एक कोटी रुपयांचे कव्हर असणारी विमा पॉलिसी घेणे योग्य होईल. अशी पॉलिसी टर्म प्लॅनच्या स्वरूपात घेणे परवडू शकते. २५ वर्षे वयाच्या निरोगी व्यक्तीस एक कोटी रुपये कव्हर आणि ३० वर्षे मुदतीची पॉलिसी सुमारे १० हजार रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये मिळू शकते. वाढत्या वयानुसार प्रीमियम वाढत जातो, हे विचारात घेऊन अशी पॉलिसी शक्य तितक्या लवकर घेणे योग्य असते. या पॉलिसीमुळे मुदतीनंतर काहीच रक्कम मिळत नाही व भरलेला प्रीमियम वाया जातो अशी समजूत जाणूनबुजून करून दिली जाते. तसेच याऐवजी मनीबॅक किंवा एंडोवमेंट यांसारख्या पॉलिसी घेण्यास भरीस पाडले जाते. परिणामी १० हजार रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये केवळ दोन ते अडीच लाख रुपयांचेच कव्हर मिळू शकते. यामुळे अकाली मृत्यूनंतर आवश्यक असणारी आर्थिक तरतूद तर होत नाहीच, शिवाय मुदतीनंतर सुमारे चार ते पाच लाख रुपये इतकीच रक्कम मिळते. तीस वर्षांनंतर मिळणाऱ्या या रकमेचे आजचे मूल्य केवळ ४० ते ५० हजार रुपये इतकेच असते, हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे. याउलट एक कोटी रुपयांचा टर्म प्लॅन असल्यास अकाली मृत्यूनंतर आवश्यक असणारी तरतूद निश्चितपणे होते आणि मुदत संपल्यावर काहीही रक्कम मिळाली नाही, तरी फारसे नुकसान होत नाही. असे असले, तरी काहींना टर्म इन्शुरन्स हा पर्याय पटत नाही व त्यांना पारंपरिक मनी बॅक व एंडोवमेंट यांसारख्या पॉलिसी घेणेच योग्य वाटते.

आयुर्विमा ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने ‘आयआरडीए’ने एक जानेवारी २०१४पासून नव्याने देण्यात येणाऱ्या आयुर्विमा पॉलिसींमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. परिणामी सध्या देऊ करण्यात येत असलेल्या बहुतांश आयुर्विमा पॉलिसी या वर्षाअखेर रद्द झाल्या असून, आता नवीन सुधारित नियमानुसार आयुर्विमा पॉलिसी देण्यात येतील. तथापि आधीच्या पॉलिसी त्यांच्या अटी व शर्तींनुसार त्यांच्या मुदतीपर्यंत चालू राहतील. नव्याने होणारे बदल खालीलप्रमाणे असतील.

सरेंडर व्हॅल्यू : प्रचलित नियमानुसार पॉलिसी मुदतपूर्व सरेंडर केली, तर सरेंडर व्हॅल्यू काढताना पहिल्या वर्षाचा प्रीमियम विचारात घेतला जात नाही; मात्र आता नवीन नियमानुसार, भरलेल्या प्रीमियमच्या किमान ३० टक्के इतकी सरेंडर व्हॅल्यू देणे बंधनकारक असेल. पॉलिसी चार वर्षांनंतर सरेंडर केली, तर भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किमान ५० टक्के इतकी सरेंडर व्हॅल्यू देणे बंधनकारक असेल. अखेरच्या काही वर्षांत पॉलिसी सरेंडर केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किमान ९० टक्के इतकी सरेंडर व्हॅल्यू मिळू शकेल. तसेच प्रचलित नियमानुसार, किमान तीन वार्षिक प्रीमियम भरल्याशिवाय पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू मिळण्यास पात्र होत नाही; मात्र नवीन नियमानुसार पॉलिसी टर्म (कालावधी) १० वर्षांपेक्षा कमी असेल आणि दोन वार्षिक प्रीमियम भरले असतील, तर अशी पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू मिळण्यास पात्र असेल. तथापि पॉलिसी टर्म (कालावधी) १० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तीन वार्षिक प्रीमियम भरल्यानंतरची पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू मिळण्यास पात्र असेल.

- पॉलिसी कव्हर( विमा संरक्षण) : नव्या नियमानुसार आता ४५ वर्षांच्या आत वय असणाऱ्या व्यक्तीस वार्षिक प्रीमियमच्या किमान १० पट पॉलिसी कव्हर द्यावे लागणार आहे. तथापि ४५पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीस वार्षिक प्रीमियमच्या सात पट कव्हर मिळू शकेल; मात्र इथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, की आयकर नियमानुसार आपल्या पॉलिसीचे कव्हर वार्षिक प्रीमियमच्या १० पटींपेक्षा कमी असेल, तर सदर पॉलिसीचा प्रीमियम ‘आयकर नियम क्रमांक ८० सी’ अंतर्गत करसवलतीस पात्र होत नाही. थोडक्यात ४५ वर्षांवरील वयाच्या व्यक्तीस वार्षिक प्रीमियमचा करसवलतीच्या दृष्टीने उपयोग होणार नाही.

- प्रीमियम : नवीन नियमानुसार आता सर्व विमा कंपन्यांना ‘आयआरडीए’चे  २००६-०८वर आधारित असलेले मॉरटॅलिटी टेबल वापरून प्रीमियम काढावा लागणार आहे. यामुळे प्रामुख्याने ‘एलआयसी’चे प्रीमियम सध्या पेक्षा कमी होतील. कारण सध्या एलआयसी १९९४-९६च्या मॉरटॅलिटी टेबलचा वापर करत असून, त्या दरम्यानच्या काळात सरासरी आयुर्मर्यादा वाढली आहे. त्यामुळे ‘आयआरडीए’चे २००६-०८वर आधारित असलेले मॉरटॅलिटी टेबल वापरून प्रीमियम काढणे ‘एलआयसी’लाही बंधनकारक असेल. यामुळे एलआयसीचे प्रीमियम सध्यापेक्षा काही प्रमाणात कमी होतील.

अपघात विमा आणि मेडिक्लेम : यासोबत किमान १० लाख रुपयांची अपघात विमा पॉलिसी घ्यावी. त्यासाठी सुमारे ८०० ते एक हजार रुपये इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. याशिवाय सुरुवातीला सुमारे दोन ते तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी. यासाठी तीन हजार रुपये वार्षिक प्रीमियम पडू शकतो. वयाच्या पंचेचाळिशीनंतर आपल्या मेडिक्लेम पॉलिसीला किमान पाच लाख रुपये कव्हर असणारी टॉप अप पॉलिसी घ्यावी. यामुळे आपल्याला वाढत्या वयात पुरेसे मेडिक्लेम कव्हर मिळेल. यासाठी सुमारे चार ते पाच हजार रुपये इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. 

याच बरोबर किमान पाच लाख रुपयांची क्रिटिकल केअर पॉलिसी घ्यावी. यासाठी निरोगी तरुण व्यक्तीला वार्षिक तीन ते पाच हजार रुपये इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. प्रीमियम हा आपले वय व आरोग्य यावर अवलंबून असतो आणि म्हणून तो कमी-अधिक असू शकतो. अशा रीतीने योग्य इन्शुरन्स घेतल्याने अकाली मृत्यू, अपघात, आजारपण यांसारख्या कारणांनी होणारे आर्थिक नुकसान आपल्या इन्शुरन्सच्या प्रमाणात भरून काढले जाते.

वरीलप्रमाणे आपत्कालीन खर्चाच्या तरतुदींसाठी आवश्यक त्या इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावरच सेवानिवृत्ती नियोजन (रिटायरमेंट प्लॅनिंग), मुलांच्या शिक्षणासाठीच्या खर्चाचे नियोजन, तसेच मुलामुलींच्या लग्नासाठीच्या खर्चाचे नियोजन करणे योग्य ठरते.


- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link