Next
‘राजकीय वाटचालीबाबत मी समाधानी’
BOI
Wednesday, January 03, 2018 | 12:52 PM
15 0 0
Share this article:

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपुणे : ‘मी मनाला येईल, पटेल तेच करतो. कोणाच्या सल्ल्याने आणि कोणाच्या दबावाखाली काम करण्याचा माझा स्वभाव नाही. यामुळे मी अनेकदा अडचणीत आलो आहे. परंतु याचमुळे मी अशक्य कामे देखील शक्य करून दाखवली आहेत. माझ्यातली हिंमत आणि धाडस या स्वभाववैशिष्ट्यांमुळे राजकारणात मला अपेक्षेपेक्षा अधिक पदे मिळाली असून, मी माझ्या राजकीय वाटचालीबाबत पूर्णतः समाधानी आहे,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय वाटचालीचे पदर उलगडून दाखवताना सांगितले. 

जागतिक मराठी अकादमीतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘शोध मराठी मनाचा’  या १५व्या जागतिक संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी एक जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. या मुलाखतीत ते राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याविषयी बोलले. रेणुका देशकर आणि रामदास फुटाणे यांनी गडकरी यांच्याशी संवाद साधला. 

आपल्या कुटुंबाविषयी ते म्हणाले, ‘मी फार कमी काळ कुटुंबासाठी उपलब्ध असतो. कुटुंबातील लग्न-समारंभांना उपस्थित राहायला फारसे जमत नाही. परंतु जेव्हा संधी मिळते, तेव्हा कुटुंबासोबत वेळ व्यतीत करायलाही आवडतो.’ 

या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विजय जोशी, खासदार अनिल शिरोळे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष असलेले भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, कार्याध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर, कार्यकारिणीचे उपाध्यक्ष यशवंतराव गडाख, ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यकारिणी सदस्य मधू मंगेश कर्णिक, कार्यकारिणीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, मार्गदर्शक रघुनाथ येमूल, नितीन गुप्ता, कोषाध्यक्ष उदय लाड, कार्यकारिणी सदस्य केसरी पाटील, मोहन गोरे, कुमार नवाथे, जयराज साळगावकर, चंद्रकांत नाईक, सिसिलिया कार्व्हालो, राजीव मंत्री, भारताचे फिजीमधील राजदूत विश्वास सपकाळ, सनदी अधिकारी आनंद पाटील, अनिल सोमलवार, योगेश गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलाखतकर्त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे देताना गडकरी म्हणाले, ‘मी नेहमी विकासाचे राजकारण केले. म्हणून मला नागपूरमधील मुस्लिमबहुल भागातूनदेखील मोठ्या संख्येने मते मिळाली. माझ्या निवडून येण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. अलीकडील राजकारणात निवडून येणे, हा सर्वांत मोठा निकष तिकीट देताना लक्षात घ्यावा लागतो. त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. परंतु मी कधीच माझ्या कुटुंबीयांकरता तिकीट मागितले नाही. माझे कुटुंबीय त्यांच्या व्यवसायात आणि समाजकारणात व्यस्त आणि आनंदी आहेत. माझ्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे. जातीचे राजकारण करणाऱ्यांची मला प्रचंड चीड येते. आमच्या पक्षात कोणी जातीचे कार्ड घेऊन माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तर मी त्याला हाकलून लावतो. कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येण्यात त्याच्या कुटुंबीयांपेक्षा, त्याच्यामागे उभे असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असतो. कार्यकर्ते तो उमेदवार निवडून यावा म्हणून आयुष्य खपवतात. तरी तिकीट वाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून आलेला तोच उमेदवार कुटुंबातील व्यक्तीची शिफारस करतो, त्या वेळी मनस्वी चीड येते.’

(संमेलनाच्या उद्घाटनाचा आणि त्या वेळी नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search