Next
सेंद्रिय कलिंगड उत्पादनातून चार लाखांचा नफा
मावळ तालुक्यातील घारे कुटुंबीयांनी घेतले कमी पाण्यात उत्पादन
BOI
Tuesday, May 21, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यामधील बेबडओहळ गावातील संदीप घारे या शेतकऱ्याने ठिबक सिंचन वापरून कलिंगडाची सेंद्रिय पद्धतीने शेती करून दोन एकर क्षेत्रातून दोन महिन्यांत चार लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आशादायी उदाहरण आहे.


संदीप घारेइंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ भागातील बेबडओहळ गावातील घारे कुटुंबामुळे आता हा परिसर कलिंगडासाठीदेखील प्रसिद्ध होत आहे. संदीप घारे यांनी घरातील शेतीचा वसा पुढे चालू ठेवला आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची. त्यांचे आजोबा वामनराव घारे आणि वडील संपतराव घारे यांनी शेतीत प्रयोग करून प्रगतीशील शेतीचा वसा आपल्या मुलांना दिला. वामनराव घारे यांनी शेतीत केलेल्या प्रयोगांमुळे त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देखील गौरवण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीदेखील घारे कुटुंबाच्या या शेतीला भेट दिली होती. प्रगत शेतीचा वारसा चालवणाऱ्या घारे कुटुंबातील नव्या पिढीने आणखी एक पाऊल पुढे टाकून सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचन वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत अत्यंत योग्य ठरला. या शेतीतून त्यांना तब्बल चार लाख रुपये नफा मिळाला. सगळ्या घारे कुटुंबीयांचे कष्ट फळाला आले.

संदीप घारे म्हणाले, ‘पारंपरिक पद्धतीने शेती करत होतोच; पण सध्याच्या काळात सेंद्रिय उत्पादनांना असणारी मागणी, पाण्याची कमतरता या बाबी लक्षात घेऊन कमी पाण्यात येणारे पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कलिंगडाचे पीक घेण्याचे ठरवले. सुरुवातीला दोन एकर शेतजमीन नांगरून, त्यात ३६ ब्रास शेणखत घातले. सात फुटांचे अंतर सोडून सरी तयार केल्या. कलिंगडाच्या बियांपासून रोपे तयार करून त्यांची लागवड करण्यात आली. निंबोळी अर्क, जीवामृत यांचाही वापर केला. लागवड करताना जमिनीवर मल्चिंग पेपरच्या साह्याने आच्छादन केले. त्यामुळे तण वाढत नाही आणि पाण्याचे बाष्पीभवनही प्रतिबंधित होते. पाणीबचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. या लागवडीसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च आला. ५५ दिवसांत पीक तयार झाले.’


‘दोन एकर क्षेत्रात साधारण साठ टन पीक आले. एक कलिंगड सरासरी दोन ते साडेचार किलो वजनाचे होते. मार्चअखेरीस लागवड केली होती. मे महिन्यात पीक हाताशी आले. उन्हाळ्यामुळे बाजारात कलिंगडाला चांगली मागणी आहे. त्यामुळे चांगला भावही मिळाला. कलिंगड विक्रीसाठी नेल्यावर त्याला १३ रुपये किलो भाव मिळाला. त्यातून सुमारे सात लाख रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता चार लाख रुपयांचा नफा झाला,’ असे घारे यांनी सांगितले.

 

‘प्रत्येकाने एकच पीक घेऊ नका’
‘आपले वाडवडील सेंद्रिय शेतीच करत होते. आता रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर करून आपण आरोग्याला घातक असलेले कृषी उत्पादन घेत आहोत. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून आम्ही सेंद्रिय शेती करत आहोत. आमची सगळी शेती सेंद्रिय नसली, तरी घरच्यापुरता किंवा थोडा अधिक भाजीपाला, फळे, धान्ये या पद्धतीने घेत आहोत. आजूबाजूचे शेतकरी, मित्र यांच्याशीही नेहमी चर्चा करून सेंद्रिय शेती करण्याबाबत सल्लामसलत होत असते. अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेती करत आहेत. एखाद्या शेतकऱ्याने घेतलेले पीक फायदेशीर ठरले की सगळे शेतकरी तेच पीक घेण्याकडे वळतात. यामुळे उत्पादन जास्त होते आणि भाव घसरतात. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सल्ला देतो की, एकाचे बघून सगळ्यांनी तेच पीक घेऊ नका. प्रत्येकाने वेगवेगळे पीक घ्या. त्यामुळे सगळ्यांनाच चांगला भाव मिळेल,’ असे संदीप यांनी सांगितले.

‘शेतीत जुन्या-नव्याचा योग्य मेळ हवा’
‘सेंद्रिय शेती कशी करायची, त्याचे फायदे काय, पीक पद्धत कशी असावी याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. पुढच्या पिढीला विषमुक्त अन्न मिळाले पाहिजे, असे मला वाटते. त्यामुळे शक्य तेवढी सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आंबा, नारळ, चिंच अशी झाडे लावली, तर म्हातारपणी त्यांना त्याद्वारे आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. एकाप्रकारे ते त्यांचे निवृत्तिवेतन असेल. सरकार, मुले-बाळे यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. शेती योग्य पद्धतीने आणि नव्या-जुन्याचा योग्य मेळ घालून केली, की नक्कीच लाभदायी होते, यावर माझा ठाम विश्वास आहे. हेच मी सर्वांना सांगतो,’ असेही घारे यांनी आवर्जून नमूद केले.

राज्यात सध्या अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळून निघत आहेत. या पार्श्वभूमीवर घारे कुटुंबाचे उदाहरण शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सेंद्रिय पद्धत आणि ठिबक सिंचन यांच्या वापराद्वारे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीमध्ये असे प्रयोग ठिकठिकाणी होण्याची गरज आहे. 

(घारे कुटुंबाची कलिंगडाची शेती आणि त्यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mohan About 116 Days ago
Very nice I am at paud pls send your no 9850164390
0
0

Select Language
Share Link
 
Search